सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ सप्टेंबर २००८

सप्तपदी - मराठी कविता | Saptapadi - Marathi Kavita

सप्तपदीच्या वेळी
पुढं असणारं पाऊल
संसार सुरू होताच
अडखळलं
तू माझ्या पुढं झालास
मागं बघितलही नाहीस
जरा धीट झाले
तुझ्या पावला बरोबर
पाऊल पडू लागलं
तेव्हाची तुझी नजर...?
मी नाही लक्ष दिलं
तशीच चालत राहिले
पायांना गती आली
तुझी ती नजर दिसेना
माझा वेग वाढला
तुझ्यापुढं...
तू मात्र मागं फिरलास
माझ्या बरोबर चालायचं
तुला मान्य नसावं...
सप्तपदीची आठवण झाली
तेव्हा हात हातात होता
आता तो सुटला होता
मग ठरवलं
आता असंच चालायचं
मोकळं मोकळं...
क्षितिजाला कवेत घेण्यासाठी!
मागं वळूनही पहायचं नाही.