सांजवात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ सप्टेंबर २००८

सांजवात - मराठी कविता | Sanjvaat - Marathi Kavita

त्याचे आग ओकणारे
डोळे बघतच
तिनं देवापुढं
सांजवात लावली
सांजवातीकडं बघत
त्यानं शब्दाची लाखोली
सुरू केली.
कानावर हात ठेवत
तिनं मुलांना बोलावलं,
शुभंकरोति म्हणायला!
मुलांच्या आवाजात
तिनंही आवाज मिसळला
शुभंकरोतिचा!
त्या आवाजात
त्याचे शब्द विरून गेले.
भगभगणारे डोळ्यांचे दिवे मिटत
तो बाहेर गेला.
तिच्या डोळ्यांची निरांजन
शांतपणे तेवत होती
मुलांच्याकडं बघत
तीच झाली
सांजवात!.