Download MarathiMati.com's New Android App from Google Play

रूपांतर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ एप्रिल २०१५

रूपांतर - मराठी कविता | Rupantar - Marathi Kavita

कंठातून गाण्यात आणि
गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर

अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी

वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य

एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास

सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता

स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया

हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम

इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री

स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव

मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण

Download MarathiMati.com's New Android App from Google Play