Download MarathiMati.com's New Android App from Google Play

रेल्वेच्या खिडकीतून

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

रेल्वेच्या खिडकीतून - मराठी कविता | Railwaychya Khidkitun - Marathi Kavita

रेल्वेच्या खिडकीतून
मी माझ्या मुलीला
समजावून सांगतो
बाहेरच्या चौकटीतलं दृश्य
तिने खिडकीवर हात ठेवू नये याची मी घेतो पुरेपूर दक्षता
नाहीतर सरकेत किंवा नष्टच होईल. बाहेरच्या दृश्याची चौकट
मी बोलतो, तिच्यासाठी रुसून बसलेल्या माझ्या भाषेत
हे किन्नई तुझ्या बाबाचं स्टेशन
ते किन्नई तुझ्या आईचं स्टेशन
या दरम्यान येईल खूप काळोखाचा बोगदा
मग घरघर लागेल गाडीला
मग घरघर लागेल गाडीला
मग पुन्हा उजेड येईल
काळोखाला घाबरायचं नाही
नव्याने भेटणाऱ्य आभाळाला दचकायचं नाही
ते बघ, लुकलुकणारे दिवे, जे हमेशा असतात लांब
ते बघ, पक्षी उलटे-सुलटे, घट्ट विजेचा धरतात खांब
तो बघ काऊ, हम्माच्या आरामपाठीवर बसलेला
तो बघ काळा काळा ढग स्वतःवाच रुसलेला
मी तिच्याशी संवाद करताना
ती शेंबूड पुसते माझ्या शर्टाला
मी तिच्या मनाच्या इवल्याशा
भांड्यात
उकळतो नागरिकशास्त्र
तिच्या भुकेने वासलेल्या ओठांकडे माझे लक्ष नसते
गाडीतल्या आकसलेल्या समाजाकडे माझे लक्ष नसते
तिचे कैक प्रश्न दडवून ठेवल्याचा मला मात्र त्रास होतो
त्याक्षणी ती मोकळा श्वास घेत, बागडत असल्याचा भास होतो.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play