प्रेमाचा चकवा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ फेब्रुवारी २०१८

प्रेमाचा चकवा - मराठी कविता | Premacha Chakwa - Marathi Kavita

वय होतं ते अल्लड
आणि मन होतं कोवळं
चंचल स्वभाव तिचा
पण हृदय होतं सोवळं

अगदी उगाच सहज
ती बघून हसली होती
त्याच्या खोट्या शपथेला
पूरती फसली होती

निरागस तिला
निर्मळ प्रेमाची तहान होती
त्याची प्रेमाची भाषा
अगदीच वेगळी होती

त्याचा तो स्पर्श
हीन हिंस्त्र वाटला तिला
तिच्यातल्या स्त्रीनं
तत्पर तो ओळखला

नाजूक एकांतात तिनं
स्वतःला सावरलं होतं
अवघड क्षणाला
संयमानं जिंकलं होतं

संबंध त्याच्याशी
कायमचे तिने तोडले
वाईट स्वप्न समजून
पानच ते फाडले

स्पर्शाच्या जाणीवा
धुतल्या तिने आसवानं
चुरगळलेल्या मनाला
सावरलं अलगद धीरानं

बोहल्यावर चढण्यापूर्वी
सावध ती झाली
सीतेची अग्नीपरिक्षा तिला
द्यावी नाही लागली

सुंदर नवीन जीवनात
अगदी आनंदाने रमली
अन्‌ प्रेमाच्या चकव्याला
पून्हा कधी नाही भुलली

  • TAG