Download MarathiMati.com's New Android App from Google Play

फिरी येता परतुनी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ सप्टेंबर २०१५

फिरी येता परतुनी - मराठी कविता | Phiri Yeta Partuni - Marathi Kavita

नोकरी निमित्त आपली आई आणि गावापासून दूर असलेल्या मुलाला आपल्या आई विषयी वाटणारी ओढ आणि त्याच्या मनाची व्याकुळता व्यक्त करणारी कविता म्हणजेच ‘फिरी येता परतुनी’.

ओढीने घरट्याच्या
उडे पाखरू सांजेला
मन धावे तुझ्याकडे
कुशी घे ग लेकराला

ढोरं कष्ट उपसुन
जीव थकला भागला
न्हाऊ माखु घाल मज
डोळे आले हे निजेला

मागे लागुन सुखाच्या
जरी गाव मी सोडला
क्षणभर ना मला
तुझा विसर पडला

व्याकुळला जीव माझा
आई तुझ्या ग भेटीला
आठवाने तुझ्या आज
गळा माझा ग दाटला

घाम गाळुन बहुत
जरी पैका हा साठला
कागदाच्या तुकड्याने
लेक आईला मुकला

वाटे सगळे सोडुन
गाव आपला गाठावा
सेवा करताना तुझी
देह मातीत मिळावा

दिस सुखाचे दावण्या
लेक परतून आला
पुरे झाले ते राबणे
थोडा घे आता विसावा
थोडा घे आता विसावा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play