Download MarathiMati.com's New Android App from Google Play

ओल्या मातीचा सुवास

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ एप्रिल २०१७

ओल्या मातीचा सुवास - मराठी कविता | Olya Maticha Suvas - Marathi Kavita

आज दुपारी सूर्य एकाकी नाहीसा झाला
माध्यान्हीच्या वेळी देखील संध्येचा भास झाला
पाहता पाहता ढगांनी गर्दी केली नभात
काय सांगू तुला, आज भिजले मी पावसात

मोत्यांची माळ तुटावी, तशी सर धरणीवर आली
फुले, पाने सारी मग चिंब न्हाऊन गेली
चिंब झाले मीही, उतरला पाऊस रोमारोमात
काय सांगू तुला, आज भिजले मी पावसात

थेंब अंगावर नाचवत आज रस्ताही भिजला
ओल्या मातीचा सुवास, आसमंतात भरून गेला
प्राजक्ताचा गंध गुंतला, माझ्या ओल्या केसांत
काय सांगू तुला, आज भिजले मी पावसात

थेंब थेंब ओवून ठेवत, पावसाची लडी आली
पाना-पानाच्या देठात हिरवा चुडा भरून गेली
अन् मी चढवला अंगावर, हा हर्ष सप्तरंगात
काय सांगु तुला, आज भिजले मी पावसात

आई म्हणाली, “मोठी झालीस, तरी अजून पावसात भिजतेस ?”
मी म्हणाले, “अगं आई, पावसाला वयाचे बंधन नसतेच...”
मग मी तरी का अडकावं जगाच्या या बंधनात
काय सांगू तुला, आज भिजले मी पावसात...

  • TAG
Download MarathiMati.com's New Android App from Google Play