ओढ

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

ओढ - मराठी कविता | Oadh - Marathi Kavita

इंद्रियाच्या पल्याड एक झाड
हाकारत राहते सतत
समुद्र हैलकावत राहतो स्वप्नांचा
रात्रीच्या तंबोऱ्यातून.
करुणा बरसत राहते अध्यात्मावर
भुरुभुरु गळत राहतात शब्द पत्रातून.
तरीही मी पोहचू शकत नाही तुझ्यापर्यंत.
तू मुळाक्षरांच्या पल्याड तर उभी नाहीस?
ह्या इवल्याशा प्रदेशात
सर्वस्वाचे किती घोडे सैरभैर झाले?
कुणाच्या शोधात वाऱ्याने शोषून घेतले
आपले प्रचारकी संबंध?
गळून पडतोय मोहर इच्छाशक्तिचा नकळत.
ह्या वादळातूनही तुझे मातीचे घर
सुरक्षित राहिले किनाऱ्यावर तर,
ओल्या पावलांनी ये,
माझ्या कोलमडलेल्या अहंकाराच्या आवर्तनात.