न ढळलेले अश्रू

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ फेब्रुवारी २०१८

न ढळलेले अश्रू - मराठी कविता | Na Dhalalele Ashru - Marathi Kavita

शब्दांचे अर्थ शब्दांकडे
हवे तसे वळलेच नाहीत
तिचे ते हलके इशारे
त्याला लवकर कळलेच नाहीत

निरागस तिचा चेहरा
त्याने जेव्हा पाहिला होता
जुन्या शब्दांचा नवा अर्थ
तेव्हा त्याला उमगला होता

तरीही न जाणो का नंतर
तो रेंगाळतच राहीला
समाजातील अंतर जणू
तो न्याहाळत राहीला

तिला मात्र समाजाच्या दरीत
डोकावयाचे नव्हते
परिमाण ते वास्तवाचे
तिला असे तोलायचे नव्हते

तिला कसे मुक्त
बेधुंद गायचे होते
स्वप्नांच्या झुल्यावर
ऊंच ऊंच झुलायचे होते

सुंदर स्वप्न तिचे ते
मग स्वप्नच राहिले
कोमल विश्व तिचे
ते हळूहळू मुरझले

निरपेक्ष प्रेमाचे झरे
आता आटले होते
पंख गोड स्वप्नांचे
अलगद तिने छाटले होते

अल्लड भावनांना
तिने मग आवरले होते
मनात उठलेलं तुफान
एकटीनेच सावरले होते

त्याच्या मनात काय होते
तिला अजून कळले नाही
पण डबडबलेल्या डोळ्यातुन
अश्रू कधीही ढळले नाही

  • TAG