Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मंगलचंदन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ ऑक्टोबर २०१६

मंगलचंदन - मराठी कविता | Mangal Chandan - Marathi Kavita

स्निग्धसकाळी कोकिळेच्या भूपाळीतील आरोही तू
संध्याकाळी समईमधल्या प्रकाशातलं नवचिंतन तू
छबी पाहता डोळ्यामध्ये हरवून जातो मी अवकाशी
ठोके देणे विसरुन जाऊन हृदयही रमते तुझ्याच देशी

वसंतपहाटे सूर्याच्या त्या दवांत लक्षो प्रतिबिंबी तू
कृष्णचुड्याच्या लाल थव्यागत दरवळणारी लाली ही तू
तळहातावर हात ठेवता विद्युतलहरी नसानसांतून
वितळून जाण्या तव स्पर्शाने मंगलचंदन आलो लिंपून

शुभ्र ढगांच्या गर्द गारवी ओठ तुझेही मृदुलमालती
हसताना तू रेशीमधारा मुसळधारमम हृदयावरती
थंड करुनिया विश्वाग्नी मग स्पर्श तुझाही बिलगून जातो
भूलवून तांबूस आकाशाला मिठीत तुझ्या मी स्वर्ग पाहतो

नक्षत्रांच्या शांत प्रकाशी करशील ना स्पर्शाने सोने
शुक्रासम तू चंचल आणि अचल धृवासम माझे असणे
शोधून वेचून फुलविन शिंपून तुझ्याचसाठी शब्दवेली ह्या
श्वास होऊनी तुझ्या सभोवती तूच मला मग पूर्ण कराया

Download MarathiMati.com's New Android App from Google Play