मनातलं वादळ

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ सप्टेंबर २००८

मनातलं वादळ - मराठी कविता | Manatala Vadal - Marathi Kavita

तुझ्या मनातल्या वादळानं
ज्या शब्दांचं रूप घेतलं
त्या शब्दानीच,
माझ्या मनाची माती
विस्कटून गेली
तिचा फोफाटा झाला
मनाची जमीन सोडून
विचारांचा कोश मोडून
तुझ्या शाब्दिक वादळाला
न जुमानता
माझं मन
उंच उंच गेलं.
आता,
ते तुझ्या बंधनात
कधीच अडकणार नव्हतं!
मूकपणांन मी,
तुझ्यासमवेत उरले
मनाशिवाय देहानं
गंध नसलेल्या फुलासारखं
ज्याला
कोण हुंगणार
याची भीती नसते
मी यापेक्षा वेगळी नव्हते
आता तुझ्या मनातल्या वादळाला
तुलाच पेलावं लागणार आहे.