MarathiMati.com - Android App on Google Play Store

कविता समजदार माणसाची

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ डिसेंबर २००९

आता तुम्ही समजदार झाले असाल. सर्व साधारण आयुष्यातील अनन्यसाधारण अडचणींवर मात केल्यामुळे आपला आत्मविश्वास प्रसरण पावला असेल.
सहाजिकच भुतकाळ म्हणजे काय हा प्रश्न नव्याने निर्माण झालाही असेल एव्हाना
पण असो.. त्याचा काही उपयोग आहे का? आता..

“भुतकाळावर मात करणे हेच एका सुंदर भविष्याचे द्योतक” ही तुमची नवी सिंह गर्जना असेल.
आता कसं सगळ हवं-तसं, त्यामुळे शांतता असेल तुमच्या सृजनशिलतेच्या परसदारात.

या शर्यतीत आपण जिंकलो अखेर, हा अभिमान.. तुमचे डोळे पाणावेल त्यामुळे आरश्यात तुम्ही स्वत:ला ओळखु शकणार नाही.
तेव्हा पाणावलेले डोळे मिटून तुम्ही आरश्यासमोर उभे असाल काही काळ!

अचानक तुम्ही तुमचीच पाठ थोपटाल पण मिटलेल्या डोळ्यांनीच.
शर्यत जिंकलेली असुनही तुम्ही स्वत:ला ओळख देणे टाळाल एकांतात, यापूढे.

त्यात काय! त्यानं काय होतय! असो.
असे काहीसे प्रश्न स्वत:लाच विचारून बघाल नकळत, पण उत्तर सापडणार नाही.

तेव्हा “मौनम्‌ सर्वर्थ साधनम्‌” हा उखाना घ्याल स्वत:च्याच मनाच्या खातर आणि निर्लज्जपणे उंबरठा ओलांडून प्रवेश कराल स्वत:च्याच मनात आणि संसारही सुरू कराल तुमचा तुमच्या मनाबरोबर पण अस्सल बेगडी.

आणि हो एवढ्यावर तुम्ही थांबणार नाही, कारण आता तुमची सृजनशिलता पुन्हा जागी झालेली असेल, तुमचा शोध पुन्हा सुरू झालेला असेल, माझ्या नकळत!

‘माझ्या नकळत’? हा तुमचा गोड-गैरसमज असेल.
हो, हा तुमचा गोड-गैरसमज असेल

MarathiMati.com - Android App on Google Play Store