कापूरआरती

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ सप्टेंबर २००८

कापूरआरती - मराठी कविता | Kapuraarti - Marathi Kavita

देह झाला कापूरारती
क्षणसुगंधी निघून गेले
आठवणींचे कृष्ण व्रण
मनी मानसी दिसू लागले!
स्पटिकासम शुभ्र रंग तो
बालपणीचा ठेवा ठरला
तारुण्याचे रंग रंगिला
कापूरवासामध्ये मिसळले ।
उग्र भेदक तरी हवेसे
श्वासामध्ये लपून राहिले
चैतन्याला कवटाळीत ते
आठवणींच्या कुपीत बसले ।
आयुष्याच्या सारीपटावर
सारे गंध उडून गेले
आठवण कसली, श्वास कसले
मनामनाला फसवीत गेले ।
जळून गेल्या भावभावना
डोळ्यांमधल्या ज्योती विझल्या
देह झाला कापूरारती
क्षण सुगंधी विरून गेले!