हे सांज नभाचे देणे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ मार्च २०१८

हे सांज नभाचे देणे - मराठी कविता | He Sanj Nabhache Dene - Marathi Kavita

हे सांज नभाचे देणे
नितळ निळाई डोळी
त्या जास्वंदी ओठांवर
भाळते संध्या भोळी

ते निळे तुझेच डोळे
अन जलाशयाची कांती
का थेंबांवरती उतरे
त्या श्रावणातील राती

ते पाण्यावरती संथ
येई चिंब तरंग
ती खळी तुझ्या गालावर
लेऊन सांजचे रंग

तू सांज बावरी अवघी
अन चिंब चिंब भिजलेली
तू जाता अंधारेल
हि सांज इथे थिजलेली

डोळ्यात येई घनगर्द
दाटून तुझा हा अबोला
तू जाऊ नको ना सखये
मी उरतो निळसर ओला

  • TAG