गणपती विसर्जनावरुन परतताना

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

गणपती विसर्जनावरुन परतताना - मराठी कविता | Ganapati Visarjanavrun Paratatana - Marathi Kavita

गणपती विसर्जनावरून परतताना
मी मोहनसाठी मुलगी पहायला गेलो
सोबत होता
माझा गुलालाने माखलेला शर्ट
आणि व्हाईट कॉलर मोहन.
मोहनला राहायचे होते चकाचक
तसे आमच्यात आधीच खूप अंतर
आणि आता रिक्शामध्येही.
त्याच्या डोक्यात गुलालाने न माखलेली कचकडी मुलगी
माझ्या तोंडात वाऱ्यावर फुलारलेली सिगारेट.
दाढ्या केल्या होत्या तातडीने दोघांनी
जसे लग्न जमणे केवळ अवलंबून असते, दाढीवर.
रिक्शाने दाबले ब्रेक्स तरी आडवी गेली मांजर.
मोहन हबकायचा तेवढा हबकला
म्हणाला,
‘आजकाल कोणीच पाळत नाही कुणाचंही आडवं जाणं’
रिक्शाला थांबवत पुन्हा म्हणाला,
‘म्युनिसिपाल्टी स्कूल नं. ३ जवळ’
मोहनसाठी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात
मुलीची मान खाली. मुलगी दबल ग्रॅज्युएट. नोकरीवाली.
मोहन बोल बोल बोलला
पॉझिटिव्ह संधीच्या प्रकाशात.
मुलगी गप्प गप्प गप्प राहिली
पॉझिटिव्ह संधीच्या प्रकाशात .
मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात
मी गणपती विसर्जनावरून परतल्यानंतरची उदासी वागवत
मोहन प्रचंड आवाजाचा फटाका फुटण्यापूर्वी
कानात बोट घालून

मुलगी पाहून परतताना
मोहन रंगलेला, मला अधिक खेटून.
विसर्जनानंतर राहायचे नव्हते चकाचक
डबल ग्रॅज्युएट मुलीलाही मान वर करून

- आणि मी
रिकाम्या झालेल्या मख्ररातील सजावट
रिक्शा रिकामी करताना.