एकोणतीस दहा नंतर लिहिली नाही एकही कविता

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

एकोणतीस दहा नंतर लिहिली नाही एकही कविता - मराठी कविता | Ekontis Daha Nantar Lihili Nahi Ekahi Kavita - Marathi Kavita

म्हणजे बघा, दहा महिने उलटून गेलेत
शेजारच्या मांजरीची पिल्लं मोठी होऊन सैरभैर झालीयत
रांगणारी मुलगी दुडूदुडू चालू लागलीय
कौलाच्या खनपटीला जन्मलेली पाखरं उडून गेलीत
घरामागचं गवत लंबूटांग झालंय
दारातलं गटार तुंबून मलेरिया होऊन गेलाय.
बायकोचं एक ऍबॉर्शन झालं.
आणि प्रेयसीशी असलेला संबंध लोंबकळत राहिलाय
पण एकोणतीस/दहा नंतर लिहिली नाही एकही कविता म्हणजे बघा
लिहून झालं खूप, खूप म्हणजे खूप
वाचून झालं खूप, खूप म्हणजे खूप
दारू पिऊन झाली खूप, हे खूप म्हणजे काय फार नाही
तट्ट फुगून आलो प्रवासातून, कोजागिरीच्या चंद्रासारखा
सिग्रेटि फुंकल्या झुरक्या झुरक्याने
जागरण करून करून बागडलो मित्रांच्या ओसरीवर
रोमॅण्टिक मित्र म्हणाले, ही तर विकृती
विकृत मित्र म्हणले , हे तर रोमॅण्टिक सालं!
तर सवय झाली, असी जागरणाची
जशी उसाला पिवळवून घेण्याची
शहाळ्याला छिलवून घेण्याची
आणि मग झोपेच्या गोळ्या घेऊन गेलो झोपी. सांगायचं काय,
एकोणतीस/दहा नंतर लिहिली नाही, एकही कविता.
हे तुम्हाला का सांगतोय मी
ही काही माझी ओळख नाही
ही काही तुमची ओळख नाही
जगताना थोडसं खरचटलं त्याची ही ओळख आहे
आणि बघा, या ओळखीच्या व्रणालाही कैक महिने चिघळले गेलेत.
शेजाऱ्यांच्या मांजरीची पिल्लं मोठी होऊन
पोत्यातल्या पोत्यात गुदमरत विसर्जनासाठी गावाबाहेर चाललीहेत.