MarathiMati.com - Android App on Google Play Store

एक कविता मुडमुडची

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

एक कविता मुडमुडची - मराठी कविता | Ek Kavita Moodmoodchi - Marathi Kavita

गॅरेजमधून ट्रायलसाठी
काढलेल्या गाडीसारखा
खडखडाट
तुमच्या रोजच्या मुडचा.
उसने घेतलेले पैसे
आणण्यासाठी जातानाचा
तुमचा मुड
आणि पैसे न मिळताच
परततानाचा मुड
यामध्ये असतो,
पैशाचे काय काय करायचे?
याचा हिशेब.
दाढी केल्यावर बाई जवळ येते
जाहिरातीतल्या दंतकथेसारखी
किंवा दाढी वाढवूनही बाई जवळ येते
यात बाईच्या मुडचा प्रश्न
अधिक टोकदार.
तुमचा मुड असतो कुत्रा
तुमचा मुड असतो डुक्कर
तुमचा मुड असतो ससा
तेव्हा तुम्ही धाडस करता
एक पेग अधिक रिचवण्याचं.
जग जिंकल्याचा आनंदात
तुम्ही कविता वाचता
सार्वजनिक ठिकाणी
खरं तर असं नसते.
सर्व श्रोते बहिरे समजून
तुमचा कलकलाट
थोडा वाढलेला आसतो
इतकेच
अपघात होणाऱ्या गाडीतच
प्रवासाला निघण्याचा तुमचा मूड
काही वेळ का होईना
विंडोजवळ निवांत कोलमडलेला.
तुमचा मुड असतो नदी
तेव्हा काय पार करायचं
याचा विचार करता.
तुमचा मुड असतो डोंगर
तेव्हा काय काय पोखरायचं
याचा विचार करता.
सूर्याचं ओझं डोक्यावर मिरवीत
तुम्ही मावळून जाता कधीतरी
आणि तुमचा मुड होतो गतिमान
हायवेवरून धावणाऱ्या नव्या कोऱ्या
गाडीसारखा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store