एक दृष्य

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

एक दृष्य - मराठी कविता | Ek Drushya - Marathi Kavita

मी सिनेमागृहात प्रवेश करतो
समोरच्या पांढऱ्या पडद्यावर
प्रकाश झोत पडतो आता नायकाची एंन्ट्री वगैरे
होईल या भ्रमात मी बेसावध
आणि अचानक हजारोंचा लोंढा
छाती फुटेस्तोवर सुसाट धावतानाचे दृश्य
पडद्यावरून परावर्तीत माझ्या शरीरावर
काय झालेय हे न कळताच लोकं
धावताहेत बेछूटपणे.
साऱ्या प्रेक्षकांच्या मेंदूचा ताबा घेतलाय
धावत्या गर्दीने. सेक्स विषयी सजग असणारी ही माणसं
अशी नागडी का धावताहेत?
शहराच्या बिळांबिळातून धावताहेत लोकं
वाटेतील झाड छातीशी बांधून हातातलं कमावलेलं सर्व भिरकावून
काल जन्मलेलं मूल ही धावतंय सर्वशक्तीनिशी
धावण्याचा वेग किंचितही कमी होत नाही उल्टा वाढतोय रेटा दुप्पटीने
कोणाचीच कशी दमछाक होत नाहीये ?
पडद्यावर तसुभरही जागा नाही
दुसऱ्या कुठल्याही स्थिरचित्रासाठी.
कोणाचीच कशी दमछाक ओत नाहीये?
यांन जायचंय कुठे?
या प्रश्नाची अधांतरी उत्तरे मेंदूत धक्काबुक्की
करताना हॉलमध्ये झुंबर पेटते आणि इंटरवल होतो.
धपापणाऱ्या छातीत ही सर्व गर्दी कालवून मी सिनेमागृहाच्या बाहेर हेलपाटतो
बाहेरचा आश्वासक उजेड माझ्या पावलांना बळ देत राहतो.