भेट

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

भेट - मराठी कविता | Bhet - Marathi Kavita

आभाळ भरून आल्यानंतर
एकमेकांना भेटण्याचा संकेत अगदी अलीकडचा.
सर्व ऋतू खुडून तिच्या तळहातावर मी.
नजरेतील व्याकूळ प्रार्थना ती मला नजराणा देते.
संध्याकाळ मंद मंद चुळबुळत राहते
आकाशाभोवती.
बागेतल्या बुटक्या गवतावरून
सरपटत राहतो
मनातला हिरवा साप.
नुसत्या आभाळाकडे पाहून
पावसाचे अनुमान करता येत नाही.
म्हणून तिच्या तळहातावरची आरास
मी विस्कटून टाकतो.
ती आक्रोश करत राहते, मौनातून मौनात.
इथल्या तांबूस संबंधातला पालापाचोळा
झटकत ती उठते आणि
शब्दांचा नजर बंद करून
चालू लागते प्रार्थनेकडे.

आता
चर्चबेल अधिक जोरात
घणघणत राहते
माझ्या निरभ्र मेंदूत.