भाषा व्यवहार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

भाषा व्यवहार - मराठी कविता | Bhasha Vyavahar - Marathi Kavita

मला भाषा जेवढी येते
तेवढा व्यवहार येत नाही
म्हणून माझे उच्चार हीच असते माझी भाषा
उदाहरणार्थ मी नु क सा न शब्द बोलतो ‘नुस्कान’
काहीही खाक झाल्यानंतर.
गोविंदला अटक झाली काय किंवा गोपीनाथला
वळवळते माझी जीभ तीच असते माझी भाषा.
अटकेशी संबंध नसतो
गोविंद उर्फ गोपीनाथच्या.
भाषा संस्कार करते माझ्यावर
सहस्त्र आवर्तनासारखी
तिला चुकीची समजणारे आपण
कोण असतो, भाषेचे दलाल?
भाषा देते एक विश्वास
तेव्हा मी कोणत्यातरी चित्रपटाची
ऐकत असतो कथा बोबड्या बहिणीकडून
प्राण पाण्यात पडला...
भाषेला कुठे कळते चांगले वाईट
चांगले वाईट आपणच ठरवतो भाषेशिवाय.
मध्येच आली भाषेची जाहिरात
तर आपण जगतोय
मन मारून
इतकं समजण्यापुरतीच भाषा मला येते
आणि तेवढा व्यवहार येत नाही.