MarathiMati.com - Android App on Google Play Store

बळीराजा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ जानेवारी २०१६

बळीराजा - मराठी कविता | Baliraja - Marathi Kavita

अनाथाला राजा बनवुन, व्यर्थ दर्प का वाढविला,
राजा नव्हताच कधी, राजा म्हणुन छळ का चालविला

मध्यम नव्हताच कधी व्यापार, आणि दुय्यम नौकरी
कनिष्टच होती शेती, उत्तम म्हणुन छळ का चालविला

मान नाही, सन्मान नाही, सत्ता नाही, नाही ताज
कसा हा राजा पहा, कष्ट करुनही अन्नाला मौताज

शेतकर्‍यांची मुलं चालविती सरकार
अनुदान देऊन, जगविती कास्तकार

पारतंत्र गेले, स्वातंत्र आले, घेतला समृद्धीचा ध्यास
राष्ट्राचा हा अन्नदाता, कवटाळतो मृत्युचा फास

शिक्षीत नाही सोबत, प्राध्यापक, साहित्यिक ना भांडवलदार
स्वतःच्या कष्टावर, निसर्गाच्या अवकृपेवर, अन्नदाता आहे निराधार

जवान लढतात देशासाठी, नेते लढतात सत्तेसाठी
कास्तकार लढतो सर्वासाठी, पण मरतो फक्त स्वतःसाठी

नेता नाही, नेतृत्व नाही, नाही कोणी सरदार
अनुदानासाठी दरवर्षी झिजवितो शासकिय दरबार

जय जवान, जय किसान शब्दछल वाटतात सारे
दिवसरात्र कष्ट करुनी, गरिबीचे भोग नशिबी आले

म्हणे लोकशाहीचा ध्यास हा, सर्वांचा समान विकास
दलाल येथे श्रीमंत होती, कष्टकरी होती भकास

देशाचे पोशिंदे आम्ही, दर्जा आमचा सर्वाहुनी लहान
कसे म्हणावे स्वातंत्र याला, कसा हा आमचा भारत महान

MarathiMati.com - Android App on Google Play Store