Download MarathiMati.com's New Android App from Google Play

विश्वासघात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २०१५

विश्वासघात - मराठी कथा | Vishwasghaat - Marathi Katha

जमिनीपासून फुटभर उंचीवर तरंगणारा मांत्रिकाचा सुक्ष्म देह पाहुन अघोरी समजुन चुकला की त्याचा सामना एका प्रचंड शक्तिशाली मांत्रिकाशी झालाय आणि त्याला हरवणे त्याच्या शक्तीच्या पालिकडचे आहे.

मांत्रिकाने कविताच्या कपाळावर विभुति लावुन मंत्र म्हणत उजवा अंगठा दाबुन ठेवल्यामुळे ते पिशाच्च केवळ गुरगुरत कविताच्या शरीरात निपचित पडले होते. ही संधी साधुन राजने कविताला बेडला जखडुन टाकले. मांत्रिकाने एक ताईत मंत्रुन तिच्या गळ्यात घातला आणि समाधी लावुन जमीनीवर बसला. इकडे झाला सर्व प्रकार ध्यानस्थ अघोऱ्याला त्याच्या मंत्र सामर्थ्यामुळे समजला होता. मांत्रिकाने आपल्या साधनेच्या जोरावर आपले शरीर राजच्या फ्लॅटवरच सोडुन सुक्ष्म देह धारण केला आणि क्षणात त्या अघोऱ्यासमोर येऊन ऊभा राहीला. जमिनीपासून फुटभर उंचीवर तरंगणारा मांत्रिकाचा सुक्ष्म देह पाहुन अघोरी समजुन चुकला की त्याचा सामना एका प्रचंड शक्तिशाली मांत्रिकाशी झालाय आणि त्याला हरवणे त्याच्या शक्तीच्या पालिकडचे आहे. मांत्रिकाने त्याला त्या पिशाच्चास मुक्त करण्यास आणि तिथुन कायमचे दूर निघुन जाण्यास सांगितले. त्याबरोबर अघोऱ्याने कसलेही आढेवेढे न घेता भस्म चिमटीत धरून काही मंत्र पुटपुटत ते हवेत फुंकले आणि त्या पिशाच्चास बंधनमुक्त केले. खात्री पटताच मांत्रिकाने पुन्हा एकदा अघोऱ्यास तेथुन निघुन जाण्यास बजावले आणि क्षणात तिथुन गायब होऊन राजच्या फ्लॅटमधील आपल्या शरीरात प्रवेश केला कारण अघोऱ्याच्या बंधनातुन मुक्त झाल्यावर पिशाच्चावरील त्याची मालकी संपल्यामुळे ते राज आणि कविताला हानी पोहोचवु शकत होते तसेच मांत्रिकाने सुक्ष्म शरीर धारण करुन आपला देह तिथेच सोडल्यामुळे त्याच्या देहाचाही ते ताबा घेऊ शकत होते.

परत सचेत होताच त्या मांत्रिकाने आपल्याकडील छोट्या अग्नीकुंडात अग्नी प्रज्वलित केला आणि मंत्र म्हणत त्यात काही समिधा टाकल्या नंतर त्याने आपल्या झोळीतुन एक बाहुले काढले. आपल्याकडील विभुतिने त्याने जमिनीवर एक मंडल काढले त्यामधे कुंकवाने एक तारा काढला. त्याच्या ५ त्रिकोणात ५ कवड्या ठेवल्या आणि मधल्या पंचकोनात ते बाहुले ठेवले. नंतर कविताच्या आणि त्या बाहुल्याचा कपाळावर काळी हळद चोपडली आणि मंत्र म्हणत गोमुत्र शिंपडले त्याबरोबर कविता प्रचंड तडफडू लागली तिच्या तोंडून जंगली श्वापदांसारखी गुरगुर ऐकू येत होती. मांत्रिकाने आव्हान करताच ते पिशाच्च कविताच्या शरीरातून अनिच्छेनेच बाहेर पडले आणि त्याने त्या बाहुल्यामधे प्रवेश केला. पिशाच्चाने कविताचे शरीर सोडताच ती एकदम शांत झाली आणि इकडे ते बाहुले सजीव झाले. बाहुले जीवंत होताच क्षणी त्या मांत्रिकाने मंत्र म्हणत त्या बाहुल्याला उचलून अग्निकुंडात टाकले आणि पिशाच्चमुक्ति मंत्र म्हणत विभुती फुंकु लागला. भयाण किंचाळत ते पिशाच्च तिथुन नाहीसे झाले आणि त्या अग्नीत ते बाहुले जळुन नष्ट झाले. कविता आता पुर्णपणे मुक्त झाली होती. राजने तिचे बंध सोडताच ती राजची माफी मागत त्याच्या मिठीत शिरली आणि तिने आपल्या आसवांना वाट मोकळी करुन दिली. राजने देखील तिला माफ करुन आपल्या हृदयाशी धरले. काम यशस्वीरित्या पुर्ण झाल्याचे समाधान मांत्रिकाच्या चेहऱ्यावर विलसत होते. त्याने राजच्या वडिलांना सर्व काही ठीक झाल्याचे सांगितले आणि राज व कविताला आशीर्वाद देऊन तो आपल्या गावी जाण्यासाठी मार्गस्थ झाला.

सुनीलसारख्या विश्वास घातकी माणसावर विश्वास ठेऊन आपली वैयक्तिक माहिती सांगण्याची मोठी किंमत राज आणि कविताला मोजावी लागली होती पण ‘अंत भला तो सब भला’ या उक्तिनुसार झाले गेले सर्व काही विसरून त्यांनी नव्याने आपला संसार सुरु केला आणि इकडे सुनील, पिशाच्च बनुन त्या गिधाडे बसलेल्या झाडाच्या, वठलेल्या फांदीवर उलटा लटकुन अघोऱ्याची वाट पाहु लागला...

Download MarathiMati.com's New Android App from Google Play