विश्वासघात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २०१५

विश्वासघात - मराठी कथा | Vishwasghaat - Marathi Katha

अघोऱ्याने ते भस्म त्याच्या दिशेने फुंकताच त्या आत्म्याने मुर्त रूप धारण केले आणि अघोऱ्या समोर येऊन तरंगु लागले. ते भयानक पिशाच्च पाहुन सुनीलची तर बोबडीच वळली.

मंत्र पूर्ण होताच त्याने ते भस्म फुंकर मारून सगळीकडे उडवले त्याबरोबर त्याला आजुबाजुला वावरणारे सर्व आत्मे दिसू लागले. त्यातील काही शांत होते तर काही अस्वस्थ पणे येरझाऱ्या घालत होते, काही भेसुर रडत होते तर काही मुसमुसत होते. त्यातील जे सर्वात जास्त अस्वस्थ हालचाली करत भेसुर रडत होते त्याला त्याने आपल्या कामासाठी निवडले कारण त्याच्या इच्छा अतृप्त असल्यामुळे त्याला वश करणे सोपे होते. त्याने पुन्हा दारुमधे दोन बोटे बुडवून त्या बोटांच्या चिमटीत भस्म धरून मंत्र उच्चारण सुरु केले त्यासरशी तो आत्मा अधिकच किंचाळु लागला व वेगाने हालचाल करू लागला. अघोऱ्याने ते भस्म त्याच्या दिशेने फुंकताच त्या आत्म्याने मुर्त रूप धारण केले आणि अघोऱ्या समोर येऊन तरंगु लागले. ते भयानक पिशाच्च पाहुन सुनीलची तर बोबडीच वळली. ते पिशाच्च आळीपाळीने अघोरी आणि सुनीलकडे पाहात किंचाळत म्हणाले, ‘अघोरी! तुने मुझे बंदी क्यु बनाया हैं? मुझे आजाद करदे वरना मैँ तुम दोनोंको जान से मार डालुंगा’। त्यावर अघोरी म्हणाला, ‘तुम्हे मेरा एक काम करना होगा उसके बाद मैँ तुम्हे आजाद कर दुंगा। पर तुमने मुझे धोका दिया तो तुम्हे बहुत पिडा दुंगा और तुम मेरा कुछ भी नहीं बिगाड़ सकते इस लिये जो कहता हु वो कर’। अघोरीच्या बंधनातुन सुटका होणे अशक्य आहे याची जाणीव झाल्यावर ते पिशाच्च त्याला म्हणाले, ‘ठीक हैं बताओ मुझे क्या करना हैं’? अघोरीने त्याला कविताच्या शरीरात शिरून तिला आणि तिच्या नवऱ्याला त्रास द्यायला सांगितले जेणे करुन राज कंटाळून तिला सोडुन देईल आणि मग तिला वश करणे सोपे होईल.

बेडरूम मधील वातावरण अचानक खुप थंड आणि जड झाल्यामुळे कविताची झोप चाळवली गेली ती कुस बदलून पाठीवर वळली. तहानेने घसा कोरडा पडला असल्यामुळे तिला जाग आली आणि आपल्या शरीरावर तरंगत असलेल्या त्या हिडिस आणि भयंकर अशा पिशाच्चाला पाहुन तिच्या तोंडातील किंकाळी तोंडातच विरली.

मध्यरात्रीच्या सुमारास ते पिशाच्च राजच्या घरासमोर आले आणि अदृश्य रुपात दरवाज्यातून आरपार गेले. ते कविताला शोधत घरातील बेडरूममध्ये आले. राज आणि कविता आपल्या भांडणाचा त्या दिवसाच्या कोटा पुरा करुन एकमेकांकडे पाठ करुन झोपले होते. ते पिशाच्च कविताच्या शरीरावर फुटभर अंतरावर तरंगत होते. बेडरूम मधील वातावरण अचानक खुप थंड आणि जड झाल्यामुळे कविताची झोप चाळवली गेली ती कुस बदलून पाठीवर वळली. तहानेने घसा कोरडा पडला असल्यामुळे तिला जाग आली आणि आपल्या शरीरावर तरंगत असलेल्या त्या हिडिस आणि भयंकर अशा पिशाच्चाला पाहुन तिच्या तोंडातील किंकाळी तोंडातच विरली. भीतीने तिचे शरीर थरथर कापु लागले. मदतीच्या आशेने तिने राजकडे पाहिले तर तो पांघरुण अंगावर ओढुन गाढ झोपला होता. तिची नजर परत त्या पिशाच्चाकडे गेली, तिच्याकडे पाहुन ते कुत्सित हसले. ‘अब तुम्हे तुम्हारा पति तो क्या भगवान भी बचा नहीं सकता’, म्हणत एक विकट हास्य केले. कविताला आपल्या शरीरावर प्रचंड दबाव त्यावेळी जाणवला ती घुसमटली हात पाय झाडत तिने राजला हाक मारायचा प्रयत्न केला पण घशातुन आवाजच फुटत नव्हता. तिने राजला हलवण्यासाठी आपला हात त्याच्या दिशेने सरकवायचा प्रयत्न केला पण तो तसुभरही हलला नाही. तिच्या शरीरावर जणु तिचा कंट्रोलच उरला नव्हता. अत्यंत आगतिक अवस्थेत ती राजकडे पाहात होती. आज खऱ्या अर्थाने तिला राजची गरज वाटत होती पण तो तिच्या जवळ असुनही खुप दूर होता. त्या पिशाच्चाने सुक्ष्म रूप धारण करुन तिच्या शरीरात प्रवेश केला आणि त्याचा पूर्ण ताबा घेतला. आपल्याच शरीराच्या एखाद्या कोपऱ्यात आपण कैद होत असल्यासारखे तिला जाणवू लागले. तिचे मन राजला साद घालत होते पण तिचा आवाज राजपर्यंत पोहोचणे केवळ अशक्य होते.

सकाळ होताच त्या पिशाच्चाने कविताला आपल्या तालावर नाचवायला सुरवात केली. एक सणसणित लाथ झोपलेल्या राजच्या पाठीत बसली आणि तो बेडवरुन खाली फेकला गेला. झोपेत बेसावध असताना जमिनीवर दणकण आदळल्यामुळे त्याला चांगलाच मार बसला. वेदनेने कळवळत त्याने कविताकडे पाहिले, ती त्याच्याकडे पाहात खुनशी हसत होती. तिच्या डोळ्यात त्याला प्रचंड तिरस्कार आणि द्वेष दिसला. खाऊ की गिळू अशा नजरेने ती राजकडे पाहात होती. तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहुन क्षणभर राजही मनातुन चरकला. तिला जाब विचारायचे धाडस काही त्याला झाले नाही. पाठ चोळत तो कसाबसा उठला आणि बाहेर जाऊ लागला तशी कविता खदाखदा भेसुर हसु लागली. तिचा तो अवतार पाहुन ही आपली पत्नी नसुन दुसरीच कोणीतरी असल्याचे राजच्या मनात आले. पण तो विचार मनातुन झटकुन टाकत मानसोपचार तज्ञाची मदत घ्यायची त्याने ठरवले आणि किचन मधे ब्रेक फास्ट बनवण्यासाठी गेला. इकडे कविता आतल्या आत रडत होती भेकत होती की राज मला माफ कर, मी नाही तुला लाथ मारली रे! पण ती पूर्णपणे त्या पिशाच्चाच्या कह्यात गेली होती. राजने पटापट आवरुन आपला आणि कविताचा नाष्टा आणि डबा बनवला. कपडे बदलण्यासाठी तो बेडरूम मधे गेला तर कविता त्याच्याकडे रागाने पाहात बाहेर निघुन गेली. राजच्या टिफिन मधील भाजीत तिने दोन तिन चमचे मिरचीपुड बेमालुमपणे मिसळली आणि आवरायला निघुन गेली. तिला बाय न करताच तो आपला टिफिन घेऊन चुपचाप निघुन गेला. पुर्ण रस्ता तो कविताला नक्की झालय तरी काय हाच विचार करत होता.