विश्वासघात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २०१५

विश्वासघात - मराठी कथा | Vishwasghaat - Marathi Katha

नवीन कंपनीत राजची ओळख सुनीलशी झाली. सुनील एक वाया गेलेला मुलगा होता. सिगरेट, तंबाखु, दारु, वेश्या म्हणाल ते व्यसन त्याला होते.

नवीन कंपनीत राजची ओळख सुनीलशी झाली. सुनील एक वाया गेलेला मुलगा होता. सिगरेट, तंबाखु, दारु, वेश्या म्हणाल ते व्यसन त्याला होते. निर्व्यसनी आणि सरळ मार्गी राज त्याला वेळोवेळी व्यसनांपासुन दुर राहण्यास आणि आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यास सांगायचा पण सुनीलमध्ये काडीमात्रही फरक पडत नव्हता. दिसायला सुमार असलेला सुनील बोलण्यात उस्ताद होता, समोरच्याला तो आपलेसे करून घ्यायचा आणि मग त्याच्या चांगुलपणाचा फायदा उचलायचा. दुर्दैवाने राज त्याच्या गोड बोलण्याला त्याचा चांगुलपणा समजला आणि त्याच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करुन आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी त्याच्याशी शेयर करू लागला. अगदी कविता आणि त्याच्या संबंधांबद्दलही सुनीलकडे त्याने सर्व काही सांगुन आपले मन मोकळे केले. सुनीलने राजचे पाणी जोखले होते. सरळ साधा राज आपले काहीही वाकडे करू शकणार नाही हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. राजवर खाण्यापिण्यात थोडाफार खर्च करुन त्याला आपलेसे करुन घेतले आणि त्याच्या बद्दल सर्व काही माहिती मिळवली. बोलण्यात ज्या ज्या मुली किंवा स्त्रियांचा उल्लेख राज कडुन झाला होता त्यांची नावे आणि संदर्भ त्याने नीट लक्षात ठेवले. आई आजारी असल्याचे सांगुन त्याने राजकडुन तेरा हजार रुपये उसने मागितले. राजने आपली एफडी तोडून त्याला ते कविताच्या नकळत दिले सुद्धा.

आपापसात संभाषण नसल्यामुळे राज आणि कविता सुनीलच्या षडयंत्राला बळी पडून एकमेकांपासून अधिकाधिक दूर जात होते.

एक दिवस त्याने राजला जेवणाचे सपत्निक आमंत्रण दिले. एका मोठ्या हॉटेलमधे दोघांना बोलावून यथेच्छ खावू घातले. कविताला पाहुन त्याच्या मनात एक कुटील डाव शिजू लागला. राज आणि कविताच्या भांडणाचा गैरफायदा घ्यायचे त्याने मनोमन ठरवले. त्याने कविताला फेसबुक वर शोधुन काढले नुकतीच ओळख झाल्याने तिने देखील त्याला फ्रेंडलिस्ट मधे अ‍ॅड केले. हळुहळु त्याने तिचा विश्वास संपादन केला. ती सुद्धा त्याच्या बरोबर सर्व काही शेयर करु लागली. त्याने हळुहळु तिच्या मनात राजबद्दल विष कालवायला सुरवात केली. एकीकडे कविताला तो राज विरोधात भडकवत होता तर दुसरीकडे राजला कविताला सोडण्यासाठी प्रोत्साहित करत होता. आपापसात संभाषण नसल्यामुळे राज आणि कविता सुनीलच्या षडयंत्राला बळी पडून एकमेकांपासून अधिकाधिक दूर जात होते. मतभेदांची जागा आता द्वेषाने घेतली होती. दोघे सुनीललाच आपला हितचिंतक समजत होते. सुनीलने राजशी बोलण्यात ज्या मुली व स्त्रियांचा उल्लेख झाला होता त्यांच्याशी राजचे अनैतिक संबंध होते हे कविताला संदर्भासहीत पटवुन दिले. आधीच संशयी असलेल्या कविताला आता खात्री पटली होती की राज व्यभिचारी आहे आणि ती त्याला सर्वांसमोर बेईज्जत करण्याची एकही संधी सोडत नव्हती. दोन्ही कुटुंबासमोर राजची छी थु होऊ लागली. तो खोट्या बदनामीमुळे मनाने खचू लागला होता, स्वतःच्या निरपराधित्वाचे पुरावे देऊन तो थकला होता. त्याला हेच कळत नव्हते की कविताला ही सगळी माहिती कोण पूरवत होते.

एवढे सगळे उद्योग करूनही सुनील कविताला आपल्या जाळ्यात अडकवण्यात असफल झाला होता त्यामुळे त्याची खुप चरफड होत होती. कविता राजचा द्वेष करत होती पण त्याला सोडण्याचा विचार तिच्या मनाला शिवतही नव्हता, तिला फक्त त्याला धडा शिकवायचा होता. सुनीलबद्दल तिला काहीच वाटत नव्हते हे लक्षात येताच काहीही करुन कविताचा उपभोग घ्यायचाच असे ठरवुन तो सकाळीच घराबाहेर पडला. शहराबाहेरील एका स्मशानाजवळ राहणाऱ्या एका अघोरी संप्रदायातील साधुच्या झोपडीजवळ तो आला. वातावरणातील तणावाने त्याच्या कपाळावर घर्म बिंदु जमा झाले होते. वारा पडला होता आणि जळत असलेल्या एका चितेच्या दुर्गंधीने सारा आसमंत भरला होता. त्या अघोऱ्याच्या झोपडीसमोरील एका वठलेल्या विशाल वृक्षावर बसलेली दोन गिधाडं मान वाकडी करुन त्याच्याकडेच पाहात असल्याचे लक्षात येताच सुनील नाखशिखांत हादरला. ती गिधाडे त्याला एकटक पाहात होती जणु काही त्याच्या मरण्याचीच ती वाट पाहात होती. नकळत सुनीलची नजर पण त्यांच्या नजरेत गुंतली आणि तो भारल्यासारखा बराच वेळ त्यांच्याकडे पाहात ऊभा होता; इतक्यात कावळ्यांच्या कर्कश कावकावीने दचकुन तो भानावर आला आणि अघोऱ्याच्या झोपडीच्या दिशेने पावले टाकू लागला. जसजसा तो झोपडीच्या जवळ जाऊ लागला तसतसा त्याच्या मनावरील ताण अधिकाधिक वाढत होता.