विश्वासघात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २०१५

विश्वासघात - मराठी कथा | Vishwasghaat - Marathi Katha

कविता एक कर्तुत्ववान आणि हुशार मुलगी होती. हसतमुख आणि उमद्या व्यक्तिमत्वाच्या राजला पाहाताच क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली.

राज एक उंचपुरा देखणा युवक. शिक्षणात मन रमत नसल्यामुळे कसेबसे पदवीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे नोकरीच्या शोधार्थ शहरात आला. काही कोर्सेस करुन त्याने एका नामांकित कंपनीत जॉब मिळवला. वर्ष सरत होती एकामागुन एक कंपनी आणि प्रोफाईल बदलत तो नुकताच एका कंपनीत रुजू झाला होता. तिथे एका ट्रेनिंग दरम्यान त्याची भेट कविताशी झाली. कविता एक कर्तुत्ववान आणि हुशार मुलगी होती. हसतमुख आणि उमद्या व्यक्तिमत्वाच्या राजला पाहाताच क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली. कविता सतत त्याच्या संपर्कात राहून त्याला आपल्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न करायची पण तो तिला केवळ मैत्रीण मानत असल्याने थोडे अंतर राखुनच असायचा.

राजच्या आईची खात्री पटली की हीच मुलगी आपल्या मुलाचा संसार नेटाने करू शकेल. कविता गेल्यावर तिने राजला कविताबद्दल विचारले, तेव्हा राजने कविता केवळ आपली मैत्रीण असुन तिच्याबद्दल तशा भावना नाहीत असे सांगुन विषयाला बगल दिली.

राजच्या घरी त्याचे लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते पण मुलींच्या पित्यांच्या अवाजवी अपेक्षांमुळे ते काही जमत नव्हते. एक दिवस राजची आई त्याला भेटायला शहरात त्याच्या रूमवर आली असताना अचानक कविता तिथे येऊन पोहोचली. राजने तिची आईशी ओळख करुन दिली. कविताच्या वागण्यातुन तिला राजबद्दल वाटणाऱ्या भावना राजच्या आईच्या चाणाक्ष नजरेतुन सुटल्या नव्हत्या. राजला दुकानातून काही तरी आणायला सांगून त्याच्या आईने त्याला बाहेर पाठवले आणि कविताला राजबद्दल काय वाटते असे विचारले, तेव्हा कविताने पण न लाजता तो आवडत असल्याचे राजच्या आईला सांगितले पण त्याला मी आवडत नाही हे सांगताना मात्र तिचे डोळे पाणावले. राजच्या आईची खात्री पटली की हीच मुलगी आपल्या मुलाचा संसार नेटाने करू शकेल. कविता गेल्यावर तिने राजला कविताबद्दल विचारले, तेव्हा राजने कविता केवळ आपली मैत्रीण असुन तिच्याबद्दल तशा भावना नाहीत असे सांगुन विषयाला बगल दिली. गावी परतल्यावर राजच्या आईने सर्व विषय त्याच्या वडीलांच्या कानावर घातला व कविता राजसाठी योग्य वाटल्याचे सांगितले. जातपात मानत नसल्यामुळे अडचण काहीच नव्हती. राजच्या वडीलांनी फोनवर राजला कविताशी लग्न करण्यास काय अडचण आहे असे विचारले, तेव्हा त्याच्या पत्नीबद्दलच्या अपेक्षात ती बसत नाही असे त्याने सांगितले. राज तीस वर्षांचा झाला होता. आधीची दोन लग्न जुळून तुटल्यामुळे त्याचे वडील त्याच्यावर जरा नाराजच होते. ते त्याला म्हणाले, जातीत इतक्या मुली पाहिल्या पण कुठेच काही जमले नाही. मुलगी सुशिक्षित आहे, तुझ्यावर प्रेम करते, तुला व्यवस्थित सांभाळेल, दिसायलाही ठीकठाक आहे आणि तुमची जोडी पण चांगली वाटते. तिला विचार जर हो म्हणाली तर तिच्या घरच्यांशी बोलुन लग्न पक्के करू. वडीलांच्या शब्दापुढे मान तुकवुन राजने कविताला लग्नाबद्दल विचारले तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने लगेच होकार दिला. पुढे महिन्याभरात बोलणी, साखरपुडा वगैरे होऊन लग्न झाले सुद्धा.

राजच्या कोणा मैत्रिणीचा चुकुन जरी फोन आला तर तिच्या तळपायाची आग मस्तकात जात असे. मोकळ्या स्वभावाच्या राजला ती बंधने सहन होईनासे झाले. त्याची घुसमट होऊ लागली.

जेमतेम सहा महीने गेले असतील, कविता आणि राजमध्ये वाद व्हायला सुरवात झाली. कविता खुप तापट आणि संशयी स्वभावाची होती. राजचे कोणत्याही मुलीशी वा स्त्रीशी साधे बोलणेही तिला सहन होत नसे. राजच्या कोणा मैत्रिणीचा चुकुन जरी फोन आला तर तिच्या तळपायाची आग मस्तकात जात असे. मोकळ्या स्वभावाच्या राजला ती बंधने सहन होईनासे झाले. त्याची घुसमट होऊ लागली. रोजच्या कटकटीने, त्याला आता लग्नाला होकार दिल्याबद्दल पश्चात्ताप होऊ लागला. तेव्हाच वडीलांना स्पष्ट नकार कळवला असता तर बरे झाले असते असे राजला वाटु लागले. कविताचा स्वभाव त्याने काही प्रसंगातुन ओळखला होता म्हणुनच त्याला ती मैत्रीण म्हणुन ठीक वाटली पण आयुष्याची जोडीदारीण म्हणुन योग्य वाटत नव्हती. आई वडिलांना तो विरोध करू शकला नाही, हे शल्य त्याला सतत टोचत होते. पण लग्न तर करुन बसलो आता कोणाला दोष देण्यात काय अर्थ? नशीब आपले, आता भोगा! अशी स्वतःचीच समजुत घालुन तो दिवस ढकलु लागला. हळुहळु त्यांची भांडणे वाढु लागली आणि राजच्या आणि कविताच्या घरच्यांच्या कानावर त्यांची कुरबुर जाऊ लागली पण नवरा बायकोत भांडणे तर होतातच या अलिखित नियमावर विश्वास ठेऊन दोन्ही कुटुंब होईल सर्व ठीक म्हणुन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती. याचा परिणाम म्हणुन राज आणि कविता एकत्र राहत असुनही मनाने मात्र एकमेकांपासून दूर जात होते. जिथे मनच जुळली नाहीत तिथे शरीरे तरी एकत्र कशी येणार त्यामुळे दोघांचीही चिडचिड अधिकच वाढत होती. अशीच रडतखडत लग्नाला चार वर्ष उलटुन गेली पण मुल काही झाले नाही. वेगळे होण्याचा विचार मनात जोर धरत असल्यामुळे चुकुन माकुन कधी एकत्र आलेच तर मुल होणार नाही याची काळजी राज घेत होता कारण घटस्फोट दयायचा तर पोटगी, मुलांचा हक्क आणि पुढील कटकटी त्याला नको होत्या. अशातच राजने आपली नोकरी पुन्हा बदलली, कविताला सुद्धा सरकारी नोकरी लागली पण दोघातील धुसफुस काही कमी होण्याची चिन्हे दिसेनात याचा परिणाम म्हणुन दोन्ही कुटुंबात अशांतता पसरली.