वारसाहक्क

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ ऑगस्ट २०१६

वारसाहक्क - मराठी कथा | Varsa Hakka - Marathi Katha - Page 4

घरी सुन आल्यावर कांबळे साहेबांनी राजीनामा दिला आणि घरीच राहु लागले. लवकरच राधिकाच्या सासुरवासाला सुरवात झाली. समीर सकाळी लवकर घर सोडत असे. तो गेल्यावर सरोजिनी बाई आपल्या यजमानांचे कान भरण्याचे काम मोठ्या इमानेइतबारे करत असत. आधीच तापट डोके असलेले राधिकाचे सासरे मग तिला घालुन पाडून तोंडाला येईल ते बोलत असत. ती बिचारी निमुटपणे सगळे ऐकुन घेत असे, कधीच त्यांना उलट उत्तर देत नसे. सोहन आणि सरला मात्र त्या प्रसंगांचा मनमुराद आनंद लुटत असत. राधिकाला कधीच पोटभर जेवायला मिळत नसे. ती जेवायला बसली की तिचे सासरे तिच्या पुढ्यात बसत. आमच्या घरात कोणीच जास्त जेवत नाही असे सुचक टोमणे मरत असत, त्यामुळे तिची भुकच मरत असे. पण सोहनसाठी मात्र तिला पहाटे चार वाजता उठुन डबा बनवावा लागत असे. त्याच्या बकासुरी खाण्यामुळे त्याला चार थरांचे मोठे डबे भरून ती देत असे. त्या व्यतिरिक्त कंपनीच्या कँटीन मध्ये सवलतीच्या दरात मिळणारे वडे, भजी, पोहे, उपीट तसेच चिकन, मटण आणि माश्याची थाळी वगैरे तो चापायचा ते वेगळेच. बिचारी राधिका आली आणि कामवालीला कायमची सुट्टी मिळाली हे सांगायला नकोच. लग्न करून रांधा, वाढा आणि उष्टी काढा एवढेच तिच्या नशिबी आले होते. सगळे आवरून झोपायला तिला बारा वाजत, समीर तोपर्यंत तिची वाट पाहुन झोपुन गेलेला असे. परत सकाळी तिला चार वाजता उठावे लागायचे. माहेरी चांगली तब्येत असलेली राधिका अपुऱ्या अन्नामुळे आणि झोपेमुळे सासरी मात्र बहरण्याऐवजी सुकत चालली होती.

समीरने ओळखीच्या जोरावर सोहनला एका फाईल्स बनवणाऱ्या कंपनीत शिकाऊ कामगार म्हणुन चिकटवले होते. बोबड्या सोहनला इथेही कामगारांच्या आणि वरिष्ठांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. सोबतचे कामगार सतत त्याची मस्करी करायचे. एकदा तर दोघा तिघांनी मिळुन जबरदस्तीने त्याची पॅन्ट काढुन घेतली आणि ती मिळवण्यासाठी त्यांच्या मागे तो धावत असताना वरिष्ठांनी त्याला पहिले आणि तडकाफडकी कामावरून काढुन टाकले. समीरने आपली ओळख वापरून आणि त्यांच्या हातापाया पडून सोहनची नोकरी वाचवली होती. पण त्या बदल्यात त्याचे उपकार मानायचे दूरच राहिले उलट सोहन त्यालाच पाण्यात पाहायचा. सोहनच्या उदरातील अग्निहोत्र अहर्निश पेटलेले असल्यामुळे घरातील अन्न कमी पडायचे की काय म्हणुन कंपनीतुन नाश्त्याची आणि जेवणाची जास्तीची कुपन्स घ्यायचा. मित्रांना फुकटात खाऊ घालणे, बक्षीस लागेल या अपेक्षेने लॉटरीची बेसुमार तिकिटे खरेदी करणे, आगाऊ पगार उचलणे या सगळ्या उद्योगांमुळे सोहनच्या हातात पडणारा पगार कायम तुटपुंजा असायचा. सोहनला मिळणारा पगार चांगला असुनही त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमुळे नेहेमी समीरकडे हात पसरावे लागायचे, आणि समीर त्याला वेळोवेळी पैसे द्यायचाही. घरात आपल्या कमाईचा हिस्सा देणे किंवा घराची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेणे तर दूरच राहिले उलट घरातुनच वरखर्चाला तो पैसे घेत असे. हलक्या कानाच्या सोहनला आपले परके काही कळत नव्हते. समीर त्याला खुप समजवायचा पण इतरांचे ऐकुन तो समीरचाच द्वेष करायचा. समीरबद्दल सतत कागाळ्या करून आपल्या वडीलांचे त्यांच्याबद्दलचे मत कलुषित करायची एकही संधी तो सोडत नसे, आणि त्याला साथ द्यायला सरला तत्पर असायचीच.