वारसाहक्क

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ ऑगस्ट २०१६

वारसाहक्क - मराठी कथा | Varsa Hakka - Marathi Katha - Page 22

दुसऱ्या दिवशी कुणीतरी अजस्त्र ताकदीने पिरगळुन टाकावे तसे पिरगळलेले मांत्रिकाचे कलेवर स्मशानाच्या फाटकाबाहेर पडलेले सरला, सोहन आणि विजयला आढळले. ते पाहुन त्यांची बोबडीच वळली. आल्या-पावली ते घरी परतले तर दारात त्यांच्या स्वागताला कांबळे कुटुंबीय व इन्स्पेक्टर शिंदे वॉरन्टसह सज्ज होते. समीरने तिघांच्या विरोधात FIR नोंदवली होती. इन्स्पेक्टर शिंदेनी त्या तिघांवर सीमाच्या खुनाचा कट आखणे, खुन, जादूटोणा करणे, पुरावे नष्ट करणे असे विविध आरोप लावले होते. सीमाचा मृत्यू झाल्यापासून इन्स्पेक्टर शिंदे या तिघांच्या विरुद्ध गुप्तपणे पुरावे गोळा करत होते. चौकशी करत असताना बरेच पुरावे हाती आले. मुख्य दरवाज्याजवळ बोळा करून टाकलेले एक बिल इन्स्पेक्टर शिंदेंना सापडले. त्या बिलावरील तारीख ही तीच होती ज्या दिवशी सीमाचा मृत्यु झाला होता, बिलावरून ज्या दुकानामधुन मच्छर अगरबत्ती खरेदी केली गेली त्या दुकानामध्ये इन्स्पेक्टर शिंदेनी चौकशी केली. मच्छर अगरबत्तीच्या एकाच ब्रॅन्डचे दोन बॉक्स खरेदी केलेहोते. मच्छर अगरबत्तीच्या बॉक्स वरील बार कोड घरातील आणि कचऱ्यात टाकलेल्या मच्छर अगरबत्तीच्या बॉक्सवरील बार कोडशी मॅच झाले होते. आणि घरातील बॉक्स मध्ये केवळ दोनच कॉइल्स शिल्लक होत्या. एकाच रात्रीत तब्बल १८ कॉइल्स जाळण्यात आल्या होत्या. कचऱ्यात फेकलेल्या मच्छर अगरबत्तीची राख सीमाच्या रूममध्ये आढळलेल्या राखेशी मॅच झाली होती. सरलाने सर्व राख एका पुडीत बांधून घराबाहेर टाकली होती. आणि त्यातील राखेचे प्रमाण हे एका कॉईलच्या राखेपेक्षा अनेक अनेक पटीने जास्त होते.

फॉरेन्सिक रिपोर्टनुसार सीमाला मारताना तिच्या हातापायावर उमटलेले हातांचे ठसे आणि पाण्याच्या ग्लासवरून जमा केलेले सरला आणि सोहनच्या बोटांचे ठसे एकमेकांशी मॅच झाले होते. आणि सर्वात मोठा पुरावा होता तो म्हणजे रात्री लघुशंकेसाठी उठलेल्या शेजारच्या घरातील सावंतांनी रात्री कांबळेच्या बेडरूम मधील दिवा सुरू असल्याचे आणि विजयने खिडकी उघडल्यावर मोठ्या प्रमाणात धुर बाहेर पडल्याचे पाहिले होते. तसेच विजय आणि सोहनला सीमाला जमिनीवरून उचलुन बेडवर ठेवताना आणि सरलाला घराबाहेर काहीतरी टाकताना देखील पाहिले होते. पण असेल काहीतरी म्हणुन त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले होते. सावंतांची साक्ष मोलाची ठरली. तसेच सोहनच्या मागावर असलेल्या इन्स्पेक्टर शिंदेनी सोहनला, समीर आणि पुर्ण कुटुंबाला सीमा प्रमाणेच ठार मारण्याची धमकी देताना आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले होते. पोलिसी खाक्या दाखवल्यावर तिघांनीही आपला अपराध कबुल केला. तिघांचा कबुली जबाब, उपलब्ध आणि परिस्थितीजन्य पुरावे आणि शेजारी सावंत यांची साक्ष या आधारे न्यायालयाने त्या तिघांना दोषी ठरवुन आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली व खडी फोडायला पाठवले. समीपसोबत सरलाच्याही दोन्ही मुलांची जबाबदारी राधिका आणि समीरने स्वतःवर घेतली आणि त्यांना पोरके होण्यापासुन वाचवले. अशा रितीने कांबळे कुटुंबीय आपल्यावर कोसळलेल्या संकटातुन थोडक्यात वाचले होते. समीरने आपल्या भावंडांचा कुटील डाव त्यांच्यावरच उलटवला होता. झाले गेले सर्व काही विसरून कांबळे कुटुंबीय पुन्हा नव्या उमेदीने चांगले आयुष्य जगण्याची स्वप्ने पाहत होते, आणि तिकडे जेलमध्ये सोहन, सरला आणि विजय आपल्या पापांची शिक्षा भोगत पश्चात्तापाऐवजी सुडाग्नित जळत होते. सुंभ जळले पण दुर्दैवाने पिळ मात्र तसाच होता. पण आता मात्र त्यांच्या नशिबी उरली होती ती फक्त प्रतिक्षा.