वारसाहक्क

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ ऑगस्ट २०१६

वारसाहक्क - मराठी कथा | Varsa Hakka - Marathi Katha - Page 21

त्याच्या मनातील भितीला आपले हत्यार बनवत त्या पिशाच्चाने अजुनच भयानक रूप धारण केले आणि अनुजच्या अंगावर धावुन गेले. घाबरलेला अनुज राधिकाच्या मागे लपण्यास गेला पण गडबडीत तोल जाऊन तो मिठाच्या मंडलाबाहेर पडला आणि तिथेच त्या पिशाच्चाने डाव साधला. त्याने अनुजच्या शरीरात प्रवेश केला. अनुज उभ्या भिंतीवर चढत छताला जाऊन उलट लटकला ते पाहुन गोसावी नाही म्हणेपर्यंत राधिका मोठमोठ्याने आक्रोश करत मंडलाबाहेर पडली. त्याबरोबर अनुजने तिच्याकडे झेप घेत तिचा गळा आवळण्यास सुरवात केली. गोसाव्याच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत समीर मंडलातुन बाहेर पडला आणि उजवा हात जायबंदी असल्यामुळे आपल्या डाव्या हाताने अनुजच्या पकडीतुन राधिकाला सोडवायचा अयशस्वी प्रयत्न करू लागला त्याबरोबर अनुजने दुसऱ्या हाताने समीरचा गळा पकडला व तो राधिका आणि समीरचा जीव घ्यायचा प्रयत्न करू लागला. अनुज लहान असल्यामुळे त्या पिशाच्चाला आपली पुर्ण ताकद त्याच्या माध्यमातुन वापरता येत नव्हती हे लक्षांत येताच त्या गोसाव्याने आपल्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ मंत्रुन अनुजच्या गळ्यात घातली आणि मंत्र म्हणत तो गोमुत्रात दुर्वा बुडवून अनुजवर गोमुत्र शिंपडु लागला. रुद्राक्षाची माळ गळ्यात असल्यामुळे ते पिशाच्च अनुजच्या शरीरातुन बाहेर पडुन आपली सुटका करू शकत नव्हते आणि गोमुत्राच्या शिडकाव्यामुळे तर ते पुरते भाजुन निघत होते. पण तरीही त्याने समीर आणि राधिकाला सोडले नव्हते. ते पाहुन गोसाव्याने मंत्रोच्चारण सुरूच ठेऊन आपल्या झोळीतील विभुती अनुजच्या कपाळावर लावली, त्यासरशी अनुज भयकारी आवाज करत किंचाळु लागला. तोंडातुन विचित्र आवाज करत तो गोसाव्याला आपणास सोडण्याची विनंती करू लागला. तेव्हा पुन्हा कांबळे कुटुंबीयांना त्रास न देण्याच्या अटीवर गोसाव्याने त्या पिशाच्चास मुक्त करण्याचे कबुल केले.

अनुजने समीर आणि राधिकाच्या गळ्याभोवतीची पकड ढिली करताच गोसाव्याने त्यांना परत मिठाच्या मंडलात जाण्यास सांगितले. मोठमोठ्याने श्वास घेत आणि खोकत ते पुन्हा मंडलात गेले. नंतर गोसाव्याने अनुजच्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ काढुन घेतली पण मंत्रोच्चारण सुरूच ठेवले. अनुजच्या शरीरातुन बाहेर पडताच ते पिशाच्च तिथुन क्षणात नाहीसे झाले आणि अनुज शुद्धीवर आला. समीर आणि राधिकाला सरोजिनी बाई आणि कृष्णाने सावरले. थोडे पाणी पिताच त्यांना हुशारी वाटु लागली. अनुज राधिकाला बिलगला व रडु लागला, तिनेही त्याला छातीशी कवटाळले. आता सर्व काही ठीक झाल्याचे समीरने गोसाव्याच्या प्रसन्न मुद्रेवरून ताडले. सर्वांनीच गोसाव्याला नमस्कार केला आणि मोठ्या संकटातून वाचवल्याबद्दल त्याचे आभार मानले. सर्वांना आशीर्वाद देऊन तो गोसावी आपली दक्षिणा घेऊन मार्गस्थ झाला. समीरच्या घरातुन निघाल्यावर त्या प्रचंड भडकलेल्या पिशाच्चाने थेट स्मशानाची वाट धरली. सुदैवाने हा सर्व प्रकार सुरु असताना समीप मंडलातच थांबला होता आणि शांतपणे जे काही चालले होते ते पाहत होता. तोही बाहेर पडला असता तर मोठा अनर्थ ओढवला असता. सरोजिनी बाईंनी मोठ्या प्रेमाने त्याला जवळ घेतले, त्यांचा मायेचा स्पर्श जाणवुन तोही त्यांना बिलगला.