वारसाहक्क

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ ऑगस्ट २०१६

वारसाहक्क - मराठी कथा | Varsa Hakka - Marathi Katha - Page 18

“जाऊबाई, समीपची तुम्ही काळजी घ्याल यात मला काडीचाही संशय नाही. त्या तिघांचा प्लॅन मी तुम्हाला कळवण्या आधीच त्यांनी मला मारले त्यामुळे तुम्हाला हे सर्व सांगण्यासाठीच मी अजुन थांबले होते," असे म्हणत सीमाने सगळी हकीकत राधिकाला सांगितली. सोहन, सरला आणि विजयने समीरची जागा बळकावण्यासाठी केलेले प्लॅनिंग, ते सीमाला कळल्यावर त्यांनी सीमाचा केलेला खुन, त्या खुनाला दिलेले नैसर्गिक मृत्युचे स्वरूप, सरोजिनी बाईंना घोळात घेऊन जागा आपल्या नावावर करून घेता न आल्यामुळे मांत्रिकाच्या मदतीने समीरला त्रास देण्याकरिता त्याच्या मागे सोडलेले पिशाच्च याबद्दल तिने इतंभुत माहिती दिली. ती ऐकून सगळेच सुन्न झाले. सीमाने पुढे सांगितले की,'' जर का समीर भाऊजींनी त्यांची जागा त्या तिघांच्या नावावर नाही केली तर आज अमावास्येला त्या पिशाच्चाला भोग चढवुन त्याच्याकरवी आपल्या पुर्ण कुटुंबालाच मारण्याचा प्लॅन त्या तिघांनी केला आहे." हे ऐकताच समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. “माझे काम झाले, मला आता जायला हवे तुम्ही काळजी घ्या,” असे म्हणुन सीमाचा आत्मा अदृश्य झाला.

असल्या मुलांना जन्म दिल्याबद्दल सरोजिनी बाईंनीही लाजेने आपली मान खाली घातली. ज्यांच्यावर आपण जिवापाड प्रेम केले ते आपले सख्खे बहीण-भाऊ आपल्याच जिवावर उठले तेही आपल्या जागेसाठी, ही गोष्ट समीरला अत्यंत दुःखी करून गेली. आयुष्यात प्रथमच त्याला आपल्या भावंडांचा इतका राग आला होता. आपल्या वहिनीला मारून आता आपल्यासह आपली आई, पत्नी आणि लहान मुलांना पण मारण्याचा प्लॅन आपल्या भावंडानी केल्याचे कळताच समीरच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. इतक्यात दरवाज्याची बेल वाजली म्हणुन राधिकाने दरवाजा उघडला. दारात राधिकाचे आईवडील होते. सोबत भिकारी वाटावा असा पण तेज:पुंज माणुस काखेत झोळी अडकवुन प्रसन्न चित्ताने दारात उभा होता. राधिका आईला बिलगली आणि तिने आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. सरोजिनी बाईंनी फोनवर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मैत्रिणीने म्हणजेच राधिकाच्या आईने आपली कामगिरी चोख बजावली होती. अगदी योग्य वेळी ती ओळखीच्या एका सिद्ध गोसाव्याला सोबत घेऊन आली होती. घरात शिरताच त्या तेजस्वी गोसाव्याला आपसुकच सर्व काही ज्ञात झाले. रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी अमावास्या सुरू होणार होती त्यामुळे आता घाई करायला हवी होती हे त्याने ताडले. त्या गोसाव्याने राधिकाच्या आईवडीलांना तेथुन निघण्यास सांगीतले आणि पुढच्या तयारीला लागला.