वारसाहक्क

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ ऑगस्ट २०१६

वारसाहक्क - मराठी कथा | Varsa Hakka - Marathi Katha - Page 17

अनुजची ती अवस्था पाहुन राधिकाला भोवळ यायची काय ती बाकी होती. नवऱ्याची अवस्था ती अशी आणि आता पोटाच्या गोळ्याच्या बाबतीतही असला अमानवी प्रकार घडताना पाहुन ती माऊली बिचारी थिजुन गेली होती. अचानक अनुजच्या जवळ तीच भयानक पांढरी आकृती आकार घेऊ लागली, तिने अनुजची मानगुट धरली होती. तिच्या भयानक रूपाचे दर्शन या वेळी सर्वांनाच झाले आणि सगळ्यांचीच बोबडी वळली. आपला भयानक चेहरा आणखीनच भयानक करत ती आकृती भेसुर हसली आणि त्याच वेळी घराबाहेर कुत्रे विव्हळू लागले, उघड्या खिडकीतून एक वटवाघुळ आत आले आणि अनुजच्या डोक्यावरती घिरट्या घालू लागले. सर्व वातावरण एकदम जड झाले होते जणु त्या घरावर अवकळा पसरली होती. त्या भयानक आकृतीने अनुजला समोरच्या भिंतीवर जोरात फेकले. सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. पण काय आश्चर्य! अनुज भिंतीवर आपटला नाही उलट तो एखाद्या पिसासारखा तरंगत अलगद राधिकाच्या मांडीवर विसावला. ती भयानक आकृती त्या भिंतीच्या दिशेने पाहात दात ओठ खाऊ लागली, भेसुर आणि कर्णकटू आवाज काढु लागली ते पाहुन सर्वांचीच नजर ती आकृती पाहात असलेल्या दिशेकडे गेली. तिथे एक तेजस्वी प्रकाशरुपी गोळा तरंगताना त्यांना दिसला.

जसजसा तो प्रकाश अधिकाधिक तेजस्वी होऊ लागला तसतसा त्या भयानक आकृतीचा आकार संकुचित होत गेला आणि मोठी किंकाळी फोडुन ती आकृती गायब झाली. वातावरणातील ताण झर्रकन ओसरला होता. जणु काय काळरात्र सरून सहस्त्ररश्मीचे आगमन झाले होते. वातावरण एकदम प्रसन्न झाले. कुत्र्यांचे विव्हळणे एखादे बटन दाबावे तसे बंद झाले. ते वटवाघुळही नकळत नाहीसे झाले होते. त्या दिव्य प्रकाशाला आता आकार प्राप्त होऊ लागला होता. तो सगळा प्रकार सर्वचजण डोळे विस्फारून पाहात होते. आयुष्यात प्रथमच या अतर्क्य घटनांचा सामना करावा लागत असल्यामुळे राधिका आणि समीर दोघेही पुरते गोंधळून गेले होते. त्या प्रकाशातुन सीमाची आकृती बनली. तो सीमाचा आत्मा होता. सीमाला पाहिल्यावर राधिकाचे डोळे भरून आले. सीमामुळे आपला अनुज वाचला हे लक्षात येताच कृतज्ञतेने ती ओक्सा बोक्शी रडु लागली. रडण्याचा भर ओसरल्यावर राधिकाने अनुजचे प्राण वाचवल्याबद्ल सीमाचे आभार मानले. सीमा म्हणाली, "जाऊ बाई, माझ्या उपाशी मुलाला, माझा नवरा घरात डांबून निघुन गेला पण तुम्ही त्याला मायेने खाऊ घातलेत, तुमच्या मुलाच्या जिवाला मी कसा काय धक्का पोहोचु दिला असता?” राधिका म्हणाली," “सीमा, तुझे दिवस कार्य तर आम्ही केले होते मग तुला मुक्ती का नाही मिळाली? तुझी कोणती इच्छा अपुर्ण राहिली आहे ते मला सांग. मी ती नक्की पुर्ण करेन. तु समीपची काळजी करू नकोस, या पुढे मी त्याचा आपल्या मुलांप्रमाणेच संभाळ करेन".