वारसाहक्क

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ ऑगस्ट २०१६

वारसाहक्क - मराठी कथा | Varsa Hakka - Marathi Katha - Page 16

साधारण पाच तास प्रवास करून दुपारी तीन वाजता ते सर्व आपल्या घरी पोहोचले. घराला कुलुप होते. आपल्याकडील दुसऱ्या चावीने दार उघडून ते आत गेले. बेडरूममध्ये समीप पलंगावर झोपला होता. "अरेच्या! म्हणजे सोहन समीपला घरात एकट्यालाच सोडुन बाहेर गेलाय तर! बिचारा आईविना पोर! आज सीमा असती तर समीपची अशी अवस्था नसती झाली", सरोजिनी बाईच्या या वाक्याने राधिकाला सीमाच्या आठवणीने एकदम भरून आले. राधिकाने स्वतःला सावरले आणि किचन मधले डबे उघडुन पाहिले तर सगळेच रिकामे होते. तिने आपल्या मोठ्या मुलाच्या हातुन थोडे वाण सामान मागवले आणि फटाफट स्वयंपाक केला. भुकेलेल्या समीपला आणि सर्वानाच तिने गरम गरम पोटभर जेऊ घातले आणि सर्वच जण आराम करण्यासाठी लवंडले. तेवढ्यात सोहन तेथे आला. समीर आणि त्याचे कुटुंब तेथे आलेले पाहुन, शिकार स्वतःहुन जाळ्यात अडकायला चालत आली आहे याचा त्याला आनंद झाला. त्याने समीरला विचारले, "काय ठरवलेस? मला झिडकारण्याचा परिणाम बघितलास ना काय झाला तो? हा तर फक्त नमुना होता, तु जर तयार नाही झालास तर आज रात्री तुमच्यापैकी कोणीही वाचणार नाही." त्यावर सरोजिनी बाई पुढे आल्या आणि त्यांनी सोहनच्या एक कानाखाली लगावली. म्हणाल्या, "नालायका वडीलांच्या जागी असलेल्या भावाला असा त्रास देताना तुम्हाला जरा देखील शरम नाही वाटली? त्यानेच तुला नोकरीला लावले ना? सरलाचे लग्न व्हावे म्हणुन किती प्रयत्न केले. तुमच्या दोघांसाठी त्याने लहानपणापासुन किती काय केले, तुमच्यासाठी वडीलांचा मारही खाल्ला. त्याचे उपकार स्मरायचे सोडून तुम्ही दोघे त्याच्याच जिवावर उठलात! आत्ताच्या आत्ता जे काही तुम्ही बहीण भावानी समीरवर उठवले आहे ते पाहिलं जाऊन नाहीसे करा, नाहीतर दोघांना पोलिसात देईन मी! .

त्यासरशी सोहन आपला गाल चोळत, दात ओठ खात म्हणाला, "माझ्या कानाखाली मारलंस काय म्हातारे! आता यांच्या बरोबर तुला पण जिवंत ठेवत नाही. फक्त काही तास थांब आणि बघ मला मारल्याचा काय परिणाम होतो ते! सीमाला तर वर पाठवले आहेच आता तुम्हाला सगळ्यांना पण तिच्याकडे नाही पाठवले तर सोहन नाव नाही लावणार." असे म्हणुन सोहन फणकाऱ्याने तेथुन निघुन गेला. हा सर्व प्रकार चार डोळे गडग्याच्या आडुन गुपचुप पाहात होते. सरोजिनी बाई स्वतःच्या नशिबाला दोष देत होत्या. समीरने त्यांचे सांत्वन केले. सर्व काही ठीक होईल असे आश्वासन देऊन तो आपल्या आईला घेऊन आत गेला. प्रवासाने थकलेले ते जीव अन्न पोटात गेल्यावर सुस्तावले आणि अलगद झोपेच्या अधीन झाले. थोडा वेळ गेला असेल तोच समीरच्या धाकट्या मुलाच्या ओरडण्याने सर्वच जण दचकुन जागे झाले. लहानगा अनुज हवेत तरंगत होता. मधेच तो वर जात होता तर मधेच वेगात खाली येत होता. जमिनीपासुन दोन इंचावर येऊन परत वेगाने वर जात होता. कोणीतरी त्याला एखादे खेळणे वर फेकुन झेलावे तसे झेलत होते आणि पुन्हा वर फेकत होते. पण कोणीही दिसत नव्हते. तो बिचारा मात्र जिवाच्या आकांताने "आई, बाबा! मला वाचवा", असे ओरडत होता.