वारसाहक्क

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ ऑगस्ट २०१६

वारसाहक्क - मराठी कथा | Varsa Hakka - Marathi Katha - Page 15

रात्री जेवणानंतर बेडवर लवंडला असता, समीर झाल्या प्रकाराची मनात उजळणी करू लागला. त्याने ती मानवसदृश्य आकृती आपल्या डोळ्यांनी पहिली होती. तो भास नक्कीच नव्हता. त्याचा भुताखेतांवर विश्वास नव्हता पण तो भयानक चेहरा आठवल्यावर त्याच्या अंगावर काटाच आला. एकदम थंडी भरून आली. घरातील आवरा आवार करून राधिका झोपायला आली तेव्हा तिला समीरला हुडहुडी भरून ताप भरल्याचे लक्षात आले. तिने त्याला तापाचे औषध दिले पण ताप वाढतच होता. रात्रभर ती त्याच्या डोक्यावर मीठ घातलेल्या थंड पाण्याच्या घड्या बदलत होती. पहाटे चार वाजता समीरचा ताप उतरला आणि मग त्या दोघांना झोप लागली. साधारण दोन तास झाले असतील आणि काही विचित्र आवाजांमुळे राधिकाची झोप चाळवली. डोळे चोळत तिने समीरकडे पाहिले तर समीरच्या छातीवर एक मानव सदृश्य भयानक पांढुरकी आकृती बसलेली तिला दिसली. ती आकृती समीरचा गळा आवळत होती आणि समीर बेडवर असहाय पडुन श्वास घेण्यासाठी धडपडत होता. त्याच्या तोंडातुन बाहेर पडणाऱ्या विचित्र आवाजानेच राधिकाची झोप चाळवली होती. ते दृश्य पाहिल्यावर राधिका किंचाळलीच. त्यासरशी ती आकृती समीरच्या छातीवरून गायब झाली आणि समीर मोठमोठ्याने श्वास घेऊ लागला. समीरचे दैव बलवत्तर म्हणुन तो दुसऱ्यांदा वाचला होता. पण या दुसऱ्या घटनेमुळे त्याची खात्री पटली की त्याला भास झाला नव्हता. कोणीतरी नक्कीच त्याच्या जिवावर उठलय.

राधिकाच्या किंचाळण्यामुळे सरोजिनी बाई जाग्या झाल्या आणि गडबडीने समीरच्या बेडरूममध्ये आल्या. राधिकाकडुन झाला प्रकार कळल्यावर त्याही धास्तावल्या. आपल्या धाकट्या लेकाचे आणि लेकीचेच हे प्रताप असावेत हे त्यांनी मनोमन ओळखले पण राधिका घाबरेल म्हणुन त्या काही बोलल्या नाही. ह्या प्रकरणाचा लवकरच छडा लावला पाहिजे नाहीतर समीरच्या किंवा घरातील कोणाच्या तरी जिवावर बेतेल हे त्यांनी ओळखले आणि राधिकाला धीर देऊन मनाशी काहीतरी ठरवत त्या त्यांच्या खोलीत गेल्या. काही फोन केल्यावर त्या पुन्हा समीरच्या बेडरूममध्ये आल्या आणि राधिकाला जवळ घेऊन समजावणीच्या सुरात म्हणाल्या, “अजुन काही मोठा अनर्थ व्हायच्या आधी आपल्याला समीरला घेऊन लवकरात लवकर आपल्या गावी जायला पाहिजे. आपल्याला जी काही मदत लागणार आहे ती आपल्या गावातच उपलब्ध होईल”. माझे बोलणे झाले आहे तु लवकरात लवकर निघायची तयारी कर. आपण आजच आपल्या गावी जाऊया. सरोजिनी बाईंचा विचार समीर आणि राधिका दोघांनाही पटला. मुलांनाही सुट्या लागल्या होत्या त्यामुळे काहीच अडचण नव्हती. राधिका पटकन तयारीला लागली. समीरने आपल्या सिनियर मॅनेजरला फोन करून आपल्या अपघाताबद्दल सांगीतले आणि आपण एक आठवड्याच्या सिक लिव्हवर जात असल्याचे कळवले. समीरची उजवी बाजु पुर्णपणे काळी निळी झाली होती. त्याची अवस्था बघता राधिकाने बसऐवजी एक खाजगी ऍम्ब्युलन्स मध्ये समीरला झोपवुन आपल्या सासु आणि दोन्ही मुलांसह ती आपल्या गावी निघाली.