वारसाहक्क

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ ऑगस्ट २०१६

वारसाहक्क - मराठी कथा | Varsa Hakka - Marathi Katha - Page 13

समीपच्या देखभालीसाठी आईने आपल्या सोबतच राहावे असे सोहनने समीरला सुचवले. समीरने ते लगेचच मान्य केले. सीमाचे दिवसकार्य उरकल्यावर तो आपल्या नोकरीवर परत रुजु झाला. सोहन आणि सरलाने आपला कुटील डाव नव्या जोमाने सुरू केला. सरोजिनी बाईंना काय हवे नको ते व्यवस्थित पाहिले जाऊ लागले, त्यांची चांगली बडदास्त ठेवली जाऊ लागली. सरलाचा दिवसातुन दोन चार वेळा चौकशीचा फोन असायचाच. आपल्या मुलांचे बदललेले वागणे त्यांच्या लक्षात आले होते. पण त्यांचे दिवस चांगले चालले असल्यामुळे त्याही शांत होत्या. दोन महिने त्या सोहनकडे राहील्यावर सरलाने त्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. तिथेही त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाऊ लागली. सरलाच्या मुलांसाठी त्यांनी सोन्याच्या चेन्स केल्या. सरलाला बांगड्या केल्या त्यामुळे सरला पण खुश होती. दोन महिने त्यांचा पाहुणचार केल्यावर सरलाने सोहनला आपल्या सासरी बोलावुन घेतले. विजय आणि सरलाने खोटे खोटे भांडण उकरून काढले. भाड्याचे घर अपुरे पडत असल्याने स्वतःचे मोठे घर बांधावे असा सरलाने हट्ट धरला होता आणि विजयने घर तर बांधु पण जागेसाठी कर्ज कोण देणार? असा सुर लावला होता. त्यांची अपेक्षा होती की वादाचा विषय लक्षात आल्यावर सरोजिनी बाई स्वतःच म्हणतील की "आहे ती जागा कधी कामी येईल? मी तुम्हाला वाटणी करून देते." पण बिचाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले, जेव्हा त्यांना कळले की सरोजिनी बाईंनी ती जागा बक्षीसपत्र करून केव्हाच समीरच्या नावे केली होती.

विजय, सरला आणि सोहन तिघेही सरोजिनी बाईंना अद्वा-तद्वा बोलु लागले, दुषणे देऊ लागले. सरला तर इतकी भडकली होती की तिने रात्रीच आपल्या आईला हाताला धरून घराबाहेर काढले. रडवेल्या झालेल्या सरोजिनी बाईंनी तसेच बस स्टॅन्ड गाठले आणि मिळेल ती गाडी पकडुन समीरच्या गावचा रस्ता धरला. तोंडचा घास गेल्यामुळे सोहन, सरला आणि विजयची प्रचंड चरफड झाली. सुडभावनेने विजय पेटुन उठला होता. काहीही करून समीरला धडा शिकवायचाच असे त्याने मनोमन ठरवले. दुसऱ्या दिवशी झाला प्रकार समजल्यावर समीर खुप चिडला होता. आपल्या भावंडांचा स्वभाव तो पुरता ओळखुन होता. दुरदृष्टी ठेवुन त्याने आईकडुन योग्य वेळी आपल्या नावावर बक्षीसपत्र करून घेतल्यामुळे त्याच्या भावंडांचा डाव त्याने उधळुन लावला होता. त्याच दिवशी दुपारी समीरला बँकेत सोहनचा फोन आला. "बऱ्या बोलाने जागेचे तीन हिस्से करून एक ताईच्या आणि एक माझ्या नावावर कर नाहीतर आम्ही काहीही करू शकतो हे ध्यानात ठेव, तुला आठ दिवसांची मुदत देतो. तुझे ऊत्तर काय ते कळव." अशी धमकी सोहनने आपल्या बोबड्या स्वरात समीरला दिली. त्यावर समीरनेही, "जागा आणि घर मी माझ्या कष्टातुन उभं केलंय ते काही वडीलोपार्जित नाही. तुला एक छदामही मिळणार नाही. तेव्हा तुला काय करायचय ते करून घे", म्हणत सोहनला धुडकावून लावले.