Loading ...
/* Dont copy */

वारसाहक्क (मराठी भयकथा)

वारसाहक्क, मराठी भयकथा - [Varsa Hakka, Marathi Bhaykatha] मत्सराने पेटुन उठलेले बहीण भाऊ आपल्या मनसुब्यात ते यशस्वी होतात का? याची रंजक कहाणी म्हणजेच वारसाहक्क.

वारसाहक्क - मराठी भयकथा | Varsa Hakka - Marathi Bhaykatha
वारसाहक्क (मराठी भयकथा), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
वारसाहक्क (मराठी भयकथा) - मोठ्या भावाने कष्टाने उभे केलेले वैभव आयते घशात घालायला न मिळाल्याने मत्सराने पेटुन उठलेल्या धाकट्या बहीण भावाने आपल्या सख्ख्या नात्याचाही मुलाहिजा न ठेवता, लहानपणापासुन आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या मोठ्या भावाचाच काटा काढायचे ठरवले आणि यासाठी त्यांनी मदत घेतली अमानवीय शक्तीची. आपल्या मनसुब्यात ते यशस्वी होतात का? की मोठा भाऊच त्यांना पुरून उरतो याची रंजक कहाणी म्हणजेच वारसाहक्क.

श्री राजाराम कांबळे आणि सौ सरोजिनी कांबळे या दाम्पत्याला तीन मुले झाली. मोठा समीर, दुसरी सरला आणि सर्वात धाकटा सोहन. श्री कांबळे हे भुमापन विभागात अधिकारी होते, आणि त्यांच्या पत्नी सौ सरोजिनी या शाळेत हेडमास्तर होत्या. कामानिमित्त कांबळे साहेबांना सतत फिरतीवर राहावे लागायचे. त्यांच्या गैरहजेरीत सरोजिनी बाईच सगळे काही बघायच्या. राजाराम हे साक्षात जमदग्नीचा अवतार होते, ते कधी आणि कोणत्या गोष्टीवर भडकतील याचा काही भरवसा नसायचा. त्यांच्या या स्वभावाला घरातील सर्वच लोक टरकुन होते. नातेवाईकांच्यातही त्यांचा तसाच दरारा होता. वरकरणी जरी राजाराम स्वभावाने तापट असले तरी मनाने मात्र ते खुप प्रेमळ होते. फक्त राग आला की मग त्यांचा स्वतःवर संय्यम राहत नसे. घरी असले की ते सर्वांची आस्थेने विचारपुस करत असत. कोणाला काय हवे, काय नको याची जातीने काळजी घेत असत. कठोर असले तरी खुप प्रेमळ आणि हौशी होते. त्यामुळे त्यांच्या स्वभावातील या दोषाकडे सर्वजण जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असत.

सरोजिनी बाईंनी आपल्या तिन्ही मुलांवर चांगले संस्कार केले होते. मोठा मुलगा समीर हा मितभाषी पण आपल्या भावंडांवर खुप प्रेम करणारा, त्यांना सांभाळुन घेणारा होता. त्यामुळे जरी सरोजिनी बाईंचे यजमान कमी वेळ घरी असले तरी समीरमुळे त्या आपल्या इतर दोन मुलाच्या बाबतीत निर्धास्त असायच्या. समीर खरच एक आदर्श मुलगा आणि प्रेमळ भाऊ होता. आपल्या वडीलांच्या अनुपस्थितीत तो आपल्या आईची आणि भावंडांची खुप चांगली काळजी घ्यायचा. त्यांना काय हवे नको याकडे लक्ष द्यायचा. आपल्या वाट्याचा खाऊ देखील तो भावंडाना द्यायचा. प्रसंगी स्वतः मार खायचा आणि वडीलांच्या रागापासुन त्यांना वाचवायचा. सोहन आणि सरलाचा स्वभाव मात्र समीरच्या अगदी उलट होता. आपल्या स्वार्थी, भांडकुदळ, सुडबुद्धी ठेवणाऱ्या आणि कृतघ्न स्वभावामुळे दोघेही इतरांमध्ये अप्रिय होते. त्यांचे आपापसातही पटायचे नाही. सतत भांडणे व्हायची. सरोजिनी बाईंना आपल्या मुलांचे स्वभाव ठाऊक होते पण अजुन लहान आहेत, मोठे झाले की येईल समज असा विचार करून त्या त्यांच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करायच्या. पण जसजसे ते मोठे होत गेले तसतसे तिघांचेही स्वभाव पक्के होत गेले.

समीर आपल्या भावंडाना अभ्यासात मदत करायचा, पण मुळातच मंद असलेल्या सोहनची शिक्षणातील प्रगती यथातथाच होती. अभ्यासापेक्षा त्याचे सर्व लक्ष किचनकडेच असायचे. तो जणु काही दुसरा बकासुरच होता. बोबडा असल्यामुळे वर्गात सर्व मुलेच नाही तर शिक्षकही त्याची चेष्टा करायचे, खिल्ली उडवायचे. सततच्या चिडवण्यामुळे सोहन इतरांना टाळत असे. त्यांच्या मनात इतरांबद्दल चीड आणि द्वेष वाढत चालला होता. तो सतत तणावात असे त्यातुनच त्याला अती खाण्याची सवय लागली. खाल्ल्यावर त्याला शांतता लाभायची. त्यांच्या मनावरचा ताण कमी व्हायचा. परिणामी तो जास्तीत जास्त वेळ खाण्यातच घालवू लागला. वाढत्या वयामुळे आपल्या मुलाची भुक पण वाढत असेल असा विचार करून सरोजिनी बाई त्याला इतर दोघांपेक्षा जास्त खायला देत असत. सोहनचा आहार वाढवायला नकळत त्यांची आंधळी ममता देखील हातभार लावत होती. समीरच्या प्रयत्नांमुळे सोहन काठावर का होईना पण दहावी पास झाला आणि त्याने शिक्षणाला रामराम ठोकला तो कायमचा. सरला कॉलेजला गेली पण मुळात चंचल असल्यामुळे तिचेही लक्ष अभ्यासात कमी आणि नटणे, मुरडणे, फॅशन व मुलांमध्ये जास्त होते. फार काही मार्क्स मिळायचे नाहीत पण नापास होत नव्हती एवढेच. समीरही काही स्कॉलर नव्हता पण नेहेमी ६० टक्क्यांच्या आसपास असायचा. आपल्या मुलांची शिक्षणातील अधोगती, हेडमास्तर असलेल्या सरोजिनी बाईंसाठी नेहेमीच लाजीरवाणी गोष्ट ठरायची.

समीर कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना, त्याला बँकेत क्लार्कची नोकरी लागली. सकाळचे कॉलेज असल्यामुळे शेवटच्या तासाला न बसण्याची परवानगी घेऊन समीर बँकेत काम करू लागला. त्यावेळी कांबळे कुटुंब चाळीतील दहा बाय दहाच्या दोन रूम असलेल्या घरामध्ये राहत होते. आत एक मोरी आणि कॉमन शौचालय, एवढेच काय ते घर, पण त्यातही ते आनंदी होते. बँक बंद झाल्यावर समीर RD कलेक्शनसाठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडे जात असे. रोजच्या कमाईतुन काही रक्कम ते बाजुला टाकत असत. त्यांना बँकेत जायला वेळ नसल्यामुळे, समीर बँकेतर्फे ते पैसे गोळा करून त्यांना रिसीट देत असे आणि दुसऱ्या दिवशी ती रक्कम ज्याच्या त्याच्या खात्यामध्ये टाकत असे. त्या बदल्यात बँक त्याला कमिशन देत असे. तेवढीच समीरची वरकमाई होत असे. आपले स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न समीरने उराशी बाळगले होते. त्याच्या आईवडीलांनी आत्तापर्यंतचे सर्व आयुष्य भाड्याच्या खोलीत काढले होते त्यामुळे त्यांचे उर्वरित आयुष्य तरी आपल्या हक्काच्या घरात जावे अशी त्याची प्रामाणिक इच्छा होती आणि त्यासाठीच तो दिवसरात्र एक करत होता.

बघता बघता समीर पंचवीस वर्षांचा झाला. त्याचे मन आपल्या आईच्या जवळच्या मैत्रिणीच्या मुलीवर, राधिकावर जडले होते. तिलाही तो पसंत होता. अडचण तशी काहीच नव्हती पण कांबळे साहेबांच्या हुंड्याच्या अपेक्षा मात्र अवाजवी होत्या त्यामुळे अडचण येत होती. शेवटी होय नाही करत एकदाचे लग्न पार पडले. राजाराम कांबळेंना चार बहीणी आणि दोन भाऊ होते सोबत मोठा गोतावळाही होता. सर्वांचे मानपान करता करता वधु पक्षाच्या तोंडाला फेस आला होता. पण आपली मुलगी सुखात राहील या अपेक्षेने त्यांनी यथाशक्ती लग्न लावुन दिले. लग्नाच्या पहिल्या रात्रीच समीरच्या एका आत्येने राधिकाकडुन तिच्या पाया पडायचे गडबडीत राहुन गेल्याने रागाच्या भरात तिच्या मुस्काटात ठेऊन दिली. रडत रडत राधिका तिच्या पाया पडायला वाकली तेव्हा झाले ते पुरेसे नव्हते म्हणुन की काय दुसऱ्या आत्येने वरून पाठीत एक गुद्दा हाणला तो वेगळाच. वर आईबापाने हेच संस्कार केले का म्हणुन त्यांचाही उद्धार केला. बिचारी राधिका त्या प्रकाराने हादरून गेली. सोहन आणि सरला मात्र आपल्या आत्येने वहीनीचे केलेले स्वागत पाहुन निर्लज्जासारखे हसत होते. समीर या सर्वापासुन अनभिद्न्य होता कारण की तो चाळीसमोर घातलेल्या मांडवात पुरुष मंडळीत बसला होता. झालेल्या प्रकाराबद्दल राधिकाने समीरला काहीही न सांगण्याचे ठरवले व अपमान निमुटपणे गिळुन अश्रु पुसले.

दुसऱ्या दिवशी पुजा झाल्यावर समीर आणि राधिका मधुचंद्रासाठी उटीला रवाना झाले, आणि घरात जमलेल्या बायकांमध्ये मानपानावरून चर्चेला उधाण आले. "असली कसली सुन बघीतलीस गं सरू? फक्त पाचच तोळे सोने दिले? चांगले पन्नास तोळे तरी वाजवुन घ्यायचे होतेस. समीरला मोटारसायकल पण नाही दिली त्यांनी. आपल्या समीरमध्ये असे काय कमी आहे गं म्हणुन एवढी गरिबाघरची मुलगी केलीस देव जाणे! मेलीवर संस्कारच केलेले दिसत नाहीत घरच्यांनी." वगैरे म्हणत जमलेल्या बायकांनी राधिकाच्या माहेरच्यांच्या नावाने शिमगा सुरू केला. जेमतेम एकोणीस वर्षाच्या त्या बिचाऱ्या निष्पाप आणि सरळ स्वभावाच्या मुलीचे संस्कार वगैरे काढुन त्या बायका मोकळ्या झाल्या. बाईच बाईची शत्रु असते म्हणतात तेच खरे. नातेवाईकांची मुक्ताफळे ऐकुन सरोजिनी बाईंना आपण राधिकाला सुन करून घेऊन मोठी चुक केली असे वाटू लागले. नकळत त्यांच्या मनात राधिकाबद्दल अढी निर्माण झाली. "सुनेला डोक्यावर जास्त चढवु नकोस, नाहीतर तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल ती! तिला सुरुवातीपासुनच अंगठ्याखाली नीट दाबुन ठेव!" वगैरे मोलाच्या सुचना सरोजिनी बाईंना देऊन त्यांच्या नणंदा दुसऱ्या दिवशी आपापल्या सासरी निघुन गेल्या. चार पाच दिवसातच समीर आणि राधिका मधुचंद्राचे धुंद क्षण आपल्या मनात साठवुन घरी परतले.

घरी सुन आल्यावर कांबळे साहेबांनी राजीनामा दिला आणि घरीच राहु लागले. लवकरच राधिकाच्या सासुरवासाला सुरवात झाली. समीर सकाळी लवकर घर सोडत असे. तो गेल्यावर सरोजिनी बाई आपल्या यजमानांचे कान भरण्याचे काम मोठ्या इमानेइतबारे करत असत. आधीच तापट डोके असलेले राधिकाचे सासरे मग तिला घालुन पाडून तोंडाला येईल ते बोलत असत. ती बिचारी निमुटपणे सगळे ऐकुन घेत असे, कधीच त्यांना उलट उत्तर देत नसे. सोहन आणि सरला मात्र त्या प्रसंगांचा मनमुराद आनंद लुटत असत. राधिकाला कधीच पोटभर जेवायला मिळत नसे. ती जेवायला बसली की तिचे सासरे तिच्या पुढ्यात बसत. आमच्या घरात कोणीच जास्त जेवत नाही असे सुचक टोमणे मरत असत, त्यामुळे तिची भुकच मरत असे. पण सोहनसाठी मात्र तिला पहाटे चार वाजता उठुन डबा बनवावा लागत असे. त्याच्या बकासुरी खाण्यामुळे त्याला चार थरांचे मोठे डबे भरून ती देत असे. त्या व्यतिरिक्त कंपनीच्या कँटीन मध्ये सवलतीच्या दरात मिळणारे वडे, भजी, पोहे, उपीट तसेच चिकन, मटण आणि माश्याची थाळी वगैरे तो चापायचा ते वेगळेच. बिचारी राधिका आली आणि कामवालीला कायमची सुट्टी मिळाली हे सांगायला नकोच. लग्न करून रांधा, वाढा आणि उष्टी काढा एवढेच तिच्या नशिबी आले होते. सगळे आवरून झोपायला तिला बारा वाजत, समीर तोपर्यंत तिची वाट पाहुन झोपुन गेलेला असे. परत सकाळी तिला चार वाजता उठावे लागायचे. माहेरी चांगली तब्येत असलेली राधिका अपुऱ्या अन्नामुळे आणि झोपेमुळे सासरी मात्र बहरण्याऐवजी सुकत चालली होती.

समीरने ओळखीच्या जोरावर सोहनला एका फाईल्स बनवणाऱ्या कंपनीत शिकाऊ कामगार म्हणुन चिकटवले होते. बोबड्या सोहनला इथेही कामगारांच्या आणि वरिष्ठांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. सोबतचे कामगार सतत त्याची मस्करी करायचे. एकदा तर दोघा तिघांनी मिळुन जबरदस्तीने त्याची पॅन्ट काढुन घेतली आणि ती मिळवण्यासाठी त्यांच्या मागे तो धावत असताना वरिष्ठांनी त्याला पहिले आणि तडकाफडकी कामावरून काढुन टाकले. समीरने आपली ओळख वापरून आणि त्यांच्या हातापाया पडून सोहनची नोकरी वाचवली होती. पण त्या बदल्यात त्याचे उपकार मानायचे दूरच राहिले उलट सोहन त्यालाच पाण्यात पाहायचा. सोहनच्या उदरातील अग्निहोत्र अहर्निश पेटलेले असल्यामुळे घरातील अन्न कमी पडायचे की काय म्हणुन कंपनीतुन नाश्त्याची आणि जेवणाची जास्तीची कुपन्स घ्यायचा. मित्रांना फुकटात खाऊ घालणे, बक्षीस लागेल या अपेक्षेने लॉटरीची बेसुमार तिकिटे खरेदी करणे, आगाऊ पगार उचलणे या सगळ्या उद्योगांमुळे सोहनच्या हातात पडणारा पगार कायम तुटपुंजा असायचा. सोहनला मिळणारा पगार चांगला असुनही त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमुळे नेहेमी समीरकडे हात पसरावे लागायचे, आणि समीर त्याला वेळोवेळी पैसे द्यायचाही. घरात आपल्या कमाईचा हिस्सा देणे किंवा घराची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेणे तर दूरच राहिले उलट घरातुनच वरखर्चाला तो पैसे घेत असे. हलक्या कानाच्या सोहनला आपले परके काही कळत नव्हते. समीर त्याला खुप समजवायचा पण इतरांचे ऐकुन तो समीरचाच द्वेष करायचा. समीरबद्दल सतत कागाळ्या करून आपल्या वडीलांचे त्यांच्याबद्दलचे मत कलुषित करायची एकही संधी तो सोडत नसे, आणि त्याला साथ द्यायला सरला तत्पर असायचीच.

प्रत्येक नवविवाहीतेप्रमाणेच राधीकालाही आपल्या नवऱ्यासोबत फिरायला जावे, त्याच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा, सिनेमे पाहावे असे वाटायचे. ते दोघे बाहेर जायचेही पण दरवेळी एकतर सरला किंवा सोहन सोबत असायचेच. त्यांना एकांत मिळणार नाही याची सरोजिनी बाई पुरेपूर काळजी घ्यायच्या. सिनेमाला गेले तरी त्या दोघांमध्ये सरला किंवा सोहन बसायचे. राधिकाची खुप चिडचिड व्हायची. तिने वेळो वेळी समीरला सांगायचा प्रयत्नही केला पण तो तिला सांगायचा की ऑफिस मध्ये कटकटी काय कमी असतात जे तू पण कटकट करत बसतेस? ह्या असल्या गोष्टी सांगायच्या असतील तर माझ्या सोबत येऊच नकोस. समीर सोबत समुद्रावर फिरायला गेल्यावर मिळणारे ते क्षणच राधिकाच्या आयुष्यातले सुखाचे क्षण असायचे त्यामुळे तिनेही त्याला काही सांगायचे नाही असे ठरवले. त्याला तिचे हाल दिसत नव्हते असे नाही पण आपल्या वडीलांच्यापुढे बोलायची त्याची छाती व्हायची नाही. समीर बँकेत गेला की सगळी कामे आवरल्यावर कधी कधी राधिका आपल्या त्याच गावात असलेल्या माहेरी जायची. समीरशी बोलता न आल्यामुळे आपल्या मनातील सगळी घुसमट ती आपल्या आईकडे व्यक्त करायची. सुरवातीला सगळ्यांनाच थोडेफार सोसावे लागतेच, नंतर हळुहळु सगळे ठीक होईल असे सांगुन त्याही तिला धीर द्यायच्या. सासरी पोटभर जेवायला मिळताना मारामार मग डोहाळे कोण पुरवणार? म्हणुन राधिकाला डोहाळे लागल्यावर तिची आई तिला जे काही खायची इच्छा होईल ते सगळे पदार्थ बनवुन तिची वाट पाहायची.

एके दिवशी संध्याकाळी समीरने राधिकाला तिच्या आईकडून पिकअप केले आणि समुद्रावर फिरायला गेला. गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते दोघांनाही कळलेच नाही. घरी यायला उशीर झाल्याच्या निमित्ताने समीरचे वडील इतके चिडले होते की घरात पाहुणे असल्याचेही त्यांना भान राहीले नाही व ते घरातील नारळ सोलायची कोयती घेऊन समीरच्या अंगावर धाऊन गेले. ऐनवेळी पोटुशी असलेली राधिका आडवी आली म्हणुन ते थांबले, नाहीतर रागाच्या भरात त्यांच्या हातुन मोठा अनर्थ घडला असता. या प्रसंगाचा समीरच्या मनावर एवढा मोठा आघात झाला की तो राधिका सोबत तडकाफडकी घर सोडून निघुन जायला निघाला. पण राधिकाने त्याला अडवले व थोडे दूर घेऊन गेली. तिने त्याला समजावले की, "आजवर तुम्ही घरासाठी आणि सर्वांसाठी इतके कष्ट उपसले आहेत, त्रास सहन केलाय वेळ प्रसंगी कमीपणा घेऊन अपमानही सहन केलाय. ते सगळे क्षणात मातीमोल होऊन जाईल. आत्ता जर का आपण घर सोडुन बाहेर पडलो तर सगळे आपल्यालाच दोष देतील. बायको आली आणि समीर बदलला म्हणतील. तेव्हा राग सोडा आणि घरी चला." राधिकाने समीरची समजुत काढुन घरी आणले. पुढे राधिकाचे दिवस भरल्यावर तिने एका सुधरूड मुलाला जन्म दिला, आणि घरातील वातावरण हळूहळू पालटू लागले. सगळ्यांनाच पहिला मुलगा झाला म्हणुन खुप आनंद झाला.

यथावकाश सरलाचेही लग्न झाले आणि ती परगावी सासरी गेली. सरोजिनी बाईंना राधिकाच्या विरोधात उसकवणारी आणि पाठिंबा देणारी मुख्य व्यक्ती गेल्यामुळे त्यांचेही आपल्या यजमानांचे कान भरणे कमी झाले. सासु सासऱ्यांना आपल्या सुनेतील गुण दिसु लागल्यामुळे तेही तिचे कौतुक करू लागले. पण कांबळे कुटुंबाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एके दिवशी दुपारी जेवत असतानाच समीरच्या वडीलांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि ते कोसळले. समीर त्यावेळी बँकेत होता तर सरोजिनी बाई शाळेमध्ये आणि सोहन कंपनीत गेला होता. घरात फक्त राधिका आणि तिचे तान्हे बाळ होते. समीरच्या ज्या मित्रांना त्याच्या वडीलांनी भिकार्डे म्हणुन भरल्या ताटावरून हाकलून दिले होते तेच मित्र अशा प्रसंगी मैत्रीला जागुन वेळेला धाऊन आले. समीरच्या वडीलांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यापासुन ते पाळ्या लावुन त्यांना हॉस्पिटलमध्ये सोबत करण्यापर्यंत सर्व काही त्यांनी केले. त्यांना हवे नको ते सर्व काही बघितले. सर्वानी पैसे जमा करून हॉस्पिटलचा खर्च देखील परस्पर भागवला. समीर घेणार नाही एवढी त्यांनी समीरच्या वडीलांची काळजी घेतली.

समीरचे वडील हॉस्पिटल मधुन जेव्हा घरी आले तेव्हा ते पुर्वीचे राजाराम कांबळे राहिले नव्हते. ते पुर्णपणे बदलुन गेले होते. त्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली. आपल्या मोठ्या मुलाचा आणि सुनेचा त्यांना एवढा अभिमान वाटला की त्यांनी सर्वांसमक्ष त्यांची माफी मागितली. समीर आणि राधिकाच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले. आत्ता सर्व उलट झाले होते. समीरचे वडील राधिकाचे कौतुक करू लागले होते, तिची सर्वतोपरी काळजी घेऊ लागले होते. सरोजिनी बाईंची मात्र ते काहीही शिल्लक ठेवत नसत. त्यांनीच त्यांच्या मनात राधिकाबद्दल विष जे कालवले होते. पण राधिकाने मोठ्या मनाने आपल्या सासु सासऱ्यांना माफ केले. सासऱ्यांचेही मन वळवले. राधिकाच्या आईने दिलेला सल्ला योग्य ठरला होता एवढे दिवस बाळगलेला संयम आज कामी आला होता. आपल्या चांगल्या वागणुकीने राधिकाने घरात आणि सर्वांच्या मनात आपले स्थान मिळवले होते. पण तिचे घरातील वाढणारे महत्व सरला आणि सोहनच्या मनातील द्वेषाला खतपाणीच घालत होते. सरला आपल्या सासरी खुश नव्हती. ती आपल्या नवऱ्याची तुलना आपल्या भावाच्या कर्तृत्वाशी करायची त्यामुळे मुळचाच प्रवृत्तीने वाईट असलेला विजय नकळत आपल्या मोठ्या मेव्हण्याचा द्वेष करू लागला होता. सरला, सोहन आणि विजयच्या मनात खदखदणाऱ्या द्वेषाबद्दल काहीच कल्पना नसलेले कांबळे कुटुंब आपल्या घरात एका नवीन व्यक्तीचा समावेश करण्यासाठी विवाह संस्थांचे आणि नातेवाईकांचे उंबरठे झिजवु लागले होते.

जवळच्याच गावातील, जातीतीलच पण एका गरीब घरातील सीमाशी सोहनचे लग्न ठरले. सोहनचे शिक्षण, व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व पाहाता त्याला फार सुंदर, सुशिक्षित आणि नोकरी करणारी श्रीमंत घरातील मुलगी मिळणे जरा कठीणच होते. घरची गरिबी, त्यात पदरात तीन बहिणी असलेल्या सुदेशने राजाराम कांबळेंचे घराणे व घरातील माणसांचे राधिकाशी असलेले वागणे पाहुन आपल्या बहिणीचे लग्न बोबड्या सोहनशी लावून दिले. हुंड्यासाठी अट नसणे हे एक मोठे कारण या लग्नामागे होते. सीमा आठवीपर्यंतच शिकलेली होती पण कामाला वाघ होती. तब्येतीने मजबुत आणि घरकामात तर एकदम तरबेज होती. स्वभावाने सीमा एकदम रोखठोक होती, राधिका सारखी शांत, नम्र आणि मृदुभाषी तर बिलकुल नव्हती. दोन देऊन दोन घेऊन राहणाऱ्यांपैकी ती होती. विरुद्ध स्वभाव असुनही सुदैवाने तिचे राधिकाशी खुप चांगले पटले. आपल्या सासु सासऱ्यांच्या स्वभाव तिने चांगलाच ओळखला होता. ती त्यांची हुकुमत बिलकुल चालु देत नव्हती. सासरे तिला जे काही वाईट बोलायचे त्याला ती बिनधास्त उलटी उत्तरे द्यायची. राधिका तिला समजवायची की मोठ्या माणसांना अशी दुरुत्तरे करू नये. पण ती तिलाच सांगायची की तुम्ही खुप साध्या आहात म्हणुन हे लोक तुमचा खुप गैरफायदा घेतात. यांच्याशी असेच वागले पाहिजे नाहीतर हे आपल्याला आपल्या घरच्यांसकट विकुन खातील. तुम्ही नका काळजी करू, मी आलेय ना आत्ता, यांना बरोबर सरळ करते की नाही ते बघा! राधिका सीमाला आपल्या धाकट्या बहिणीप्रमाणे वागवायची, सीमा देखील तिच्यावर खुप माया करायची. तिची काळजी घ्यायची. दोघी जावा एकमेकींशी खुप प्रेमाने राहायच्या.

प्रमोशन मिळाल्याने समीर आता कॅशियर झाला होता. आपल्या आई वडीलांसाठी घर बांधायची उर्मी त्याला स्वस्थ बसु देत नव्हती. जागा घेण्यासाठी त्याने वडीलांकडे पैशाच्या मदतीची मागणी केली पण त्यांनी ती पार धुडकावून लावली व एक फुटकी कवडी पण मिळणार नाही, वर तुझे तु काय ते बघ असेही सांगितले. पहिल्या प्रयत्नालाच वडीलांनी अनपेक्षितरित्या सुरुंग लावल्यामुळे समीर कमालीचा हताश झाला. तेव्हा राधिकाच्या केवळ एका शब्दावर तिचा मामा त्याच्या मदतीसाठी धाऊन आला. एक रुपयाही व्याज न घेता त्याने त्याला पाच लाख रुपयांची मदत केली. स्वतःचे वडील पाच पैशाची मदत करत नाहीत आणि कोण कुठला परका माणुस मदतीचा हात पुढे करतो याचे समीरला खुप नवल वाटले. बँकेतुन कमी व्याज दरावर त्याने घर बांधण्यासाठी कर्ज घेतले. नव्या जोमाने तो कामाला लागला. थोडी स्वस्तात मिळाल्यामुळे वस्ती पासुन पाच किलोमीटर दूर एका माळावरील जागा त्याने घेतली. बाजुला केवळ दोनच घरे होती बाकी पुर्ण उजाड माळ होता. अधुन मधुन समीरच्या वडीलांचा मुळचा स्वभाव उफाळुन येत असे मग ते त्याला सतत टोचुन बोलत असत, "कुठे मसणात जागा घेतलीन आहे! काय भुतासारखे राहायचे काय तिथे?" वगैरे. त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरूच असायचा पण समीर त्याकडे दुर्लक्ष करत असे.

बँक सुटल्यावर RD कलेक्शन आटपुन घर बांधण्याकडे लक्ष द्यायला समीरला वेळ कमी पडू लागला. कॉन्ट्रॅक्टरच्या भरवशावर सगळे सोपवून निर्धास्त राहणे समीरला चुकीचे वाटू लागले तेव्हा दुसऱ्यांदा पोटुशी असलेली त्याची अर्धांगी त्याच्या मदतीला आली. RD कलेक्शनची जवाबदारी तिने स्वतःवर घेतली त्यामुळे समीरला बँक सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्यावर उशिरापर्यंत बांधकामाकडे लक्ष देत येऊ लागले. सुरवातीला समीरच्या सततच्या सुचनांमुळे त्रस्त झालेल्या काँट्रॅक्टर आणि गवंड्यानी समीरला चांगलाच चुना लावायचे ठरवले होते पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे समीरचा चांगुलपणा, परोपकारी वृत्ती, त्यांच्या बरोबरीने काम करणे, मालक असल्याचा कसलाच माज नसणे या गोष्टींमुळे त्यांचे त्यांच्याबद्दलचे मत बदलले. आणि त्यांनी त्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरवले. समीरच्या मोकळ्या स्वभावामुळे कॉन्ट्रॅक्टर आणि गवंडी आता त्याच्याशी एकदम मोकळेपणाने बोलत असत. त्याच्या सुचनांवर आपले मत देत असत. काही चुकत असल्यास त्याला योग्य तो सल्ला देत असत. रविवारी राधिका समीरसाठी जेवण घेऊन जात असे तेव्हा ते सर्व एकत्र जेवण करत असत. बरे वाईट अनुभव गाठीला बांधत घर बांधणीचे काम समीर नेटाने पुर्णत्वाकडे नेत होता.

बांधकामावर पाणी मारण्यास वेगळे पैसे द्यावे लागु नयेत म्हणुन समीरने सोहनला विनंती केली की तु फक्त बांधकामावर पाणी मार. पण समीरच्या वडीलांनी सोहनला जाण्यास विरोध केला. समीरने त्या घरासाठी स्वतःचे रक्त आटवले होते. आपला आवडता रेबॅनचा गॉगल ४००० रुपयात विकला होता. टेम्पोचे भाडे वाचावे म्हणुन लोखंडी शिगा स्कुटरच्या स्टेपनीला अडकवुन भर दुपारी रस्त्यावरून ओढत नेल्या होत्या. खर्च भागवताना तो बिचारा पार मेटाकुटीला आला होता. उगीच नाही म्हणत, "घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून तेव्हा कळते!" ज्या आई-वडिलांसाठी तो घर बांधत होता त्यांची मदत तर सोडा पण विरोधच जास्त होत होता. मग कोणासाठी म्हणुन घर बांधायचे? एका क्षण तर असा आला की तो इतका संतापला की घर पेटवून द्यायला निघाला. तेव्हा त्या गवंड्यानीच त्याला धीर दिला. "तुम्ही फक्त मालाचे पैसे द्या, आमचे पैसे नंतर जमेल तेव्हा द्या पण आपण घर बांधायचेच". घरचे तर दूरच राहीले पण बाहेरचेच त्यांच्या जास्त उपयोगी पडत होते. शेवटी प्रयत्नांची शर्थ करत वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्याने घर बांधुन पुर्ण केले आणि सर्व कांबळे कुटुंब नवीन घरात राहायला गेले.

नवीन घरात समीरच्या दुसऱ्या मुलग्याचा जन्म झाला. सर्वांना आनंद झाला पण सरोजिनी बाईंना यावेळी मुलीची इच्छा होती म्हणुन त्या थोड्या नाराज झाल्या होत्या. समीरच्या वडीलांना तोंडाचा कॅन्सर होता. त्यांचे तंबाखु खाणे त्यांच्या जिवावर उठले होते. सहा महिन्यातच राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. काही महिन्यांकरीता का होईना पण समीरची आपल्या वडीलांनी स्वतःच्या हक्काच्या घरात राहावे ही इच्छा पुर्ण झाली. समीरचे वडील गेल्यावर समीरच्या आईचे मानसिक संतुलन जरा ढासळले, त्यांचा शरीर धर्मांवरचाही कंट्रोल गेला. लघवीला किंवा संडासला झालेले त्यांना कळेनासे झाले. त्यामुळे सीमा आणि सासुची भांडणे खुप वाढु लागली होती. सीमा सासुकडे ढुंकुनही बघायची नाही त्यामुळे आपल्या मोठ्या व लहानग्या धाकट्या मुलाला सांभाळुन राधिकाला त्यांचे सर्व काही बघावे लागायचे. भरीत भर म्हणुन सीमा आणि सोहनने वेगळे राहण्याचे ठरवले. सीमा गर्भार असुनही दोघे वेगळे झाले आणि भाड्याच्या खोलीत राहु लागले. सोनोग्राफीत मुलाच्या मेंदुची वाढ नीट झालेली नाही हे लक्षात आले. जन्माला येणारे बाळ मतिमंद होईल असे डॉक्टरांनी सांगीतल्यावर राधिकानेही सीमाला बाळ पडायचा सल्ला दिला. पण सोहनने ऐकले नाही आणि हट्टाने त्याने मुलाला जन्माला घालण्यास सीमाला भाग पाडले. शेवटी व्हायचे तेच झाले. स्वानंद मतिमंद जन्माला आला. सुदैवाने त्याला कोणतेही शारीरिक व्यंग नव्हते पण त्याची बौद्धिक वाढ खुपच मंद होती.

दोन वर्षांनी समीरला प्रमोशन मिळाले आणि त्याची बाहेरगावी बदली झाली त्यामुळे तो आई, पत्नी आणि दोन्ही मुलांना घेऊन परगावी गेला. पण जाताना त्याने आपल्या भावाला भाड्याच्या खोलीत राहण्यापेक्षा आपल्या घरात राहण्यास सांगीतले. जेणेकरून त्याला दर ११ महिन्यांनी नवीन घरासाठी भटकावे लागणार नाही आणि आपल्या घराची काळजीही घेतली जाईल. पण समीरला कुठे माहीत होते की ज्या भावाचा तो एवढा विचार करत आहे त्या बोबड्या भावाच्या मनात काही भलतेच शिजत आहे. समीर परगावी जाऊन जेमतेम सहाच महिने झाले असतील. सरला, तिचा नवरा आणि सोहनने समीरच्याच घरात एक बैठक घेतली. घर जरी समीरच्या नावावर होते तरी वडीलांच्या दबावामुळे घराची जागा समीरने स्वतःच्या पैशातुन विकत घेतली असुनही त्याला ती आपल्या आईच्या नावावर ठेवावी लागली होती. याचाच गैरफायदा तिघांनी घ्यायचा ठरवले. समीरने २६ गुंठ्याचा प्लॉट विकत घेतला होता आणि त्यात २ गुंठ्यात घर आणि ३ गुंठ्यात आंबा, नारळ, चिकु, लिंबु, सीताफळ, रातांबे, पेरू अशी फळझाडे लावली होती. म्हणजे घर आणि झाडे सोडली तर २१ गुंठे जागा मोकळी होती. जागा आईच्या नावावर असल्यामुळे वारसाहक्क दाखवून त्या २१ गुंठ्यांचे तीन हिस्से करून त्यातील १४ गुंठे लाटावे असा विचार विजयने सरला आणि सोहनच्या डोक्यात सोडला होता. समीर याला सहजा सहजी तयार होणार नाही हे ते जाणुन होते. पण एकदा का सरोजिनी बाईंनी सही दिली की मग समीर काहीही करू शकणार नव्हता. त्यामुळे सरला आणि सोहनने सरोजिनी बाईंना आपापल्या घरी काही काळासाठी नेऊन त्यांना आपलेसे करून घ्यायचे आणि गोड बोलुन जागेचे तीन हिस्से करायला लावुन आपापला हिस्सा विकुन चांगले पैसे मिळवायचे असा प्लॅन ठरला.

त्यांचा हा प्लॅन सीमाच्या कानावर पडला आणि ती कमालीची अस्वस्थ झाली. गरीब असली तरी ती मानी होती. आपल्याच माणसांना फसवुन तिला स्वतःसाठी काहीच नको होते. तिने सोहनच्या नकळत राधिकाच्या कानावर सर्व काही घालायचे मनाशी ठरवले. पण तिच्या दुर्दैवाने तिला चोरून ऐकताना विजयने पाहिले होते. त्याने सरला आणि सोहनला बोलत बोलत बाहेर नेले, आणि ही गोष्ट दोघांच्या कानावर घातली. आपल्या प्लॅनवर पाणी फिरणार हे लक्षात येताच सीमाला आपल्या मार्गातुन बाजुला करण्याचा कट विजयने बोलुन दाखवला. आधी सरला आणि सोहनने त्याला विरोध दर्शविला पण पैसा आल्यावर सीमापेक्षा श्रीमंत आणि सुंदर मुलीशी लग्न करता येईल हे विजयने पटवुन देताच सोहन तयार झाला. सरलालाही हा विचार पटला. दोघांच्या मनातील पैशाची हाव त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला वरचढ ठरली आणि त्यामुळे ते दोघेही त्या कुकर्माला तयार झाले. आता सीमाला मार्गातुन बाजुला करायचे म्हणजे तिला ठार मारणे आले आणि पोलिसांकडुन पकडले जाण्याची भीती पण होती. सीमाला दम्याचा त्रास होता. तिला मृत्यु जर गुदमरल्यामुळे झाला तर दम्याच्या अटॅकमुळे ती मेली असे आपसुकच सिद्ध होईल आणि आपल्यावर कोणाला संशयही येणार नाही, असे विजयने सांगताच दोघांनाही ते पटले. तसेही सीमाला सरोजिनी बाई आवडत नव्हत्या त्यामुळे ती त्यांच्याशी गोड वागायची अपेक्षा करणेच चुकीचे होते, सीमा मेल्यावर स्वानंदची काळजी घेण्यासाठी कोणीतरी हवे हे कारण पुढे करून सरोजिनी बाईंना समीरपासुन दूर करणे शक्य होणार होते. रात्री सीमा गाढ झोपेत असताना आपले काम बिनबोभाट करायचे ठरवुन त्यांची मिटिंग संपली.

जेवताना कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सीमाने बनवलेले माशाचे कालवण मस्तपैकी हादडून तिघेही निर्लज्जासारखे झोपायच्या तयारीला लागले. इकडे सीमा राधिकाला कसे कळवायचे हा विचार करत होती तर तिकडे ते तिघे सीमाला कसे मारायचे त्या प्लॅनची मनात उजळणी करत होते. बिचाऱ्या सीमाला आपण ज्यांच्यासाठी एवढे चांगले जेवण बनवले तेच आपला घात करणार आहेत याची पुसटशी कल्पनाही नव्हती. आपला नवरा असे काही करेल हा विचारही तिच्या मनाला शिवला नव्हता. ती बिचारी आपल्या दीर आणि जावेच्या काळजीने बेचैन झाली होती. एकवेळ सरला आणि विजयचे वागणे आपण समजु शकतो कारण की ते परके होते, पण सोहन तर सीमाचा नवरा होता; साता जन्माचा सोबती. तोच तिच्या जिवावर उठला तर इतरांचे ते काय? आपल्या मतिमंद मुलाचे त्याच्या आईविना काय होईल? दुसरे लग्न केल्यावर येणारी नवी नवरी त्याला आईचे प्रेम देईल का? किंवा तो तिला आई मानु शकेल का? याचा साधा विचारही सोहनच्या मनाला शिवला नाही. आयत्या पिठावर रेघोट्या मारायच्या नादात ते तिघेही अमानुष बनले होते. डोळ्यासमोर दिसणाऱ्या पैशाच्या ढिगाखाली त्यांची सारासार विचारशक्ती दबली गेली होती. मानव हत्येसारखे महान पातक करायला त्यांचे मन धजावले होते. सोहन आणि सरला मनाने जरी वाईट असले तरी कोणाचा जीव घेतील इतके निर्दय नक्कीच नव्हते पण विजयने त्यांचा डोळ्यावर पैशाचा चष्माच असा काही बसवला होता की त्यांच्यातील माणुसकीने त्यांची साथ कधी सोडली ते त्यांचे त्यांनाच कळले नाही.

रात्री साधारण दोन वाजता सीमाला खोकल्याची प्रचंड उबळ आली. घुसमटल्यामुळे तिला श्वासही घेता येईना. मंद दिव्याच्या प्रकाशात तिला संपुर्ण खोली धुराने भरल्याचे दिसले. तिने स्वानंद आणि सोहनच्या दिशेने पाहिले तर ते त्यांच्या जागेवर नव्हते. तिच्या बेडच्या बाजुला डास पळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक कॉइल्स लावलेल्या तिला दिसल्या. त्यांच्याच धुराने खोली भरली होती. सीमाला श्वास घ्यायला खुप अडचण होत होती, ती श्वास घेण्यासाठी तडफडू लागली. तिने तिच्या दम्याचा स्प्रेसाठी हात पुढे केला पण तोही प्लॅनप्रमाणे रिकामा होता. बेडवरुन उठुन ती कशीबशी दरवाजाकडे गेली तर दरवाजा बाहेरून बंद असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने दरवाजा ठोठावला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरवाज्याखालची फटही चादर लावुन बुजवली होती. सीमाच्या सगळा प्रकार लक्षात आला. जन्माच्या जोडीदाराने पैशाच्या लोभापायी आपल्या जिवाचा सौदा केला याचे तिला खुप दुःख झाले. आपण आता काही वाचत नाही हे लक्षात यायला तिला वेळ लागला नाही. त्याही परिस्थितीत आपल्या जावेला आपण सावध करू शकलो नाही याचे शल्य तिला टोचत होते. ती जिवाच्या आकांताने दार ठोठावू लागली पण दरवाजा उघडला नाही. शेवटी दरवाज्यावर आदळणाऱ्या तिच्या हातांचा आवाज क्षीण होऊन बंद झाल्यानंतर काही वेळाने दरवाजा उघडला. सीमा खिडकीखाली जमिनीवर निचेष्ट पडली होती, तिने खिडकी उघडण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता पण तिला दम्याचा तीव्र अटॅक आला होता. ते पाहुन त्या नराधमांच्या चेहऱ्यावर क्रुर हास्य पसरले.

सर्व प्रथम विजयने ट्युब सुरू केली आणि खिडक्या उघडल्या जेणेकरून सगळा धुर बाहेर जावा. नंतर त्याने सोहनच्या मदतीने सीमाचे निपचित पडलेले शरीर उचलुन बेडवर ठेवले. एकच कॉईल जळती ठेऊन सरलाने बाकीच्या कॉइल्स उचलल्या आणि त्यांची पडलेली राखही साफ केली. सोहनने दरवाज्याखालची चादर उचलली. नंतर विजयने खिडक्या पुन्हा लावून घेतल्या. बाहेर हॉलमध्ये झोपलेल्या स्वानंदच्या हे ध्यानीही नव्हते की त्या बिचाऱ्याच्या आई सोबत आत काय घडत होते. पुरावे नष्ट केल्यावर सर्व काही ठीक असल्याची खात्रीकरून ते बाहेर पडणार इतक्यात विजयला सीमाच्या पापण्या हलल्याचे दिसले. विजेच्या चपळाईने त्याने तिथलीच एक उशी घेतली आणि सीमाच्या तोंडावर दाबुन धरली. ते पाहताच सोहनने तिचे हात, तर सरलाने पाय धरून ठेवले. अर्धमेली झालेल्या दुर्दैवी सीमाने काही सेकंद शेवटची असहाय तडफड केली आणि मग ती कायमची शांत झाली. सीमाचे निर्जीव शरीर बेडवर पडले होते. तिचे विस्फारलेले डोळे एकटक सोहनकडे पाहात होते. सोहनला ती मृत पण दाहक नजर सहन होईना. त्याने हळुच तिच्या डोळ्यांवरून हात फिरवला तशा सीमाच्या पापण्या मिटल्या. यावेळी मात्र ती मेल्याची पक्की खात्री करून मगच ते तिघे बेडरूमच्या बाहेर गेले. पैशाच्या लालसेने एका निष्पाप जिवाचा बळी घेतला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी फॅमिली डॉक्टरांना बोलावण्यात आले, त्यांनी सीमाला मृत घोषित केले. सीमाच्या निधनाची दुःखद बातमी राधिकावर आभाळ बनुन कोसळली. सोहनचा फोन येताच समीर तातडीने आपल्या पत्नी, आई आणि दोन्ही मुलांसह गावी परतला. सीमाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करून झाल्यावर उत्तर क्रियेसाठी मृतदेह घरच्यांच्या हवाली करण्यात आला. सीमाच्या माहेरचे लोक सोहनला दोष देत होते. "सीमाला दमा असताना मच्छर अगरबत्ती लावायची काय गरज होती? आमची सोन्यासारखी पोरगी तुमच्या हलगर्जीपणामुळे गेली", असा आरोप करत त्यांचा विलाप सुरू होता. प्राथमिक चौकशीसाठी आलेले इन्स्पेक्टर शिंदे सीमाच्या सासरच्या मंडळींच्या चेहऱ्यावरचे भाव फार बारकाईने अभ्यासत होते, खास करून सोहनच्या चेहऱ्यावरचे भाव. डेथ सर्टिफिकेटमध्ये सीमाचा मृत्यु दम्याच्या अटॅकमुळे झाल्याने, नैसर्गिक मृत्यु म्हणुन नमुद करण्यात आलेले पाहुन तिघांच्या जिवात जीव आला होता. दमा असलेली स्त्री, मच्छर अगरबत्ती लावुन का झोपेल? तिचा अस्थमा ओरल स्प्रे रिकामा का होता? बेडरूम मध्ये भरून राहिलेला धुरकट वास हा केवळ एका कॉईलमुळे असणे कसे शक्य आहे? हा मृत्यु नैसर्गिक आहे की प्लॅनिंग करून घडवुन आणलेला मर्डर आहे? असे अनेक प्रश्न इन्स्पेक्टर शिंदेंना स्वस्थ बसु देत नव्हते.

परिस्थितीजन्य पुराव्यात जरी मच्छर अगरबत्तीची एकच कॉईल आढळली असली तरी पोस्ट मॉर्टेमच्या रिपोर्टमध्ये फुफ्फुसात आढळलेले मच्छर अगरबत्तीच्या धुराचे अती जास्त प्रमाण, हा मृत्यु नैसर्गिक नसुन घातपात असावा या शंकेला बळ देत होते. घरातील सदस्यांची चौकशी करून, "गरज वाटल्यास पुन्हा त्रास द्यायला येईन'' असे सांगून इन्स्पेक्टर शिंदे निघाले. सीमाचा मृत्यु नैसर्गिक असल्याचे जरी प्रथमदर्शी दिसत असले तरी त्यांचा पोलिसी मेंदु त्यांना सतत सांगत होता की काहीतरी गडबड आहे. आपला पुढील प्लॅनही या प्लॅन प्रमाणे यशस्वी होणार असा विचार विजयच्या मनात तरळुन गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक सुक्ष्म विजयी स्मित चमकुन गेलेले इन्स्पेक्टर शिंदेंच्या चाणाक्ष नजरेने जाता जाता टिपले होते. सीमाच्या माहेरच्यांपैकी कोणीही कांबळे कुटुंबीयांवर केस केली नसली तरी इन्स्पेक्टर शिंदेनी पुढे तपास सुरू ठेवायचा आणि हाती सबळ पुरावा लागल्यावरच सीमाच्या भावाला सुदेशला FIR करायला सांगायचे असे ठरवले. तपासाची चक्रे इन्स्पेक्टर शिंदेंच्या डोक्यात एव्हाना वेगाने फिरू लागली होती. ज्या डॉक्टरांनी पोस्टमॉर्टेम केले त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी इन्स्पेक्टर शिंदेंची जीप मार्गस्थ झाली.

स्वानंदच्या देखभालीसाठी आईने आपल्या सोबतच राहावे असे सोहनने समीरला सुचवले. समीरने ते लगेचच मान्य केले. सीमाचे दिवसकार्य उरकल्यावर तो आपल्या नोकरीवर परत रुजु झाला. सोहन आणि सरलाने आपला कुटील डाव नव्या जोमाने सुरू केला. सरोजिनी बाईंना काय हवे नको ते व्यवस्थित पाहिले जाऊ लागले, त्यांची चांगली बडदास्त ठेवली जाऊ लागली. सरलाचा दिवसातुन दोन चार वेळा चौकशीचा फोन असायचाच. आपल्या मुलांचे बदललेले वागणे त्यांच्या लक्षात आले होते. पण त्यांचे दिवस चांगले चालले असल्यामुळे त्याही शांत होत्या. दोन महिने त्या सोहनकडे राहील्यावर सरलाने त्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. तिथेही त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाऊ लागली. सरलाच्या मुलांसाठी त्यांनी सोन्याच्या चेन्स केल्या. सरलाला बांगड्या केल्या त्यामुळे सरला पण खुश होती. दोन महिने त्यांचा पाहुणचार केल्यावर सरलाने सोहनला आपल्या सासरी बोलावुन घेतले. विजय आणि सरलाने खोटे खोटे भांडण उकरून काढले. भाड्याचे घर अपुरे पडत असल्याने स्वतःचे मोठे घर बांधावे असा सरलाने हट्ट धरला होता आणि विजयने घर तर बांधु पण जागेसाठी कर्ज कोण देणार? असा सुर लावला होता. त्यांची अपेक्षा होती की वादाचा विषय लक्षात आल्यावर सरोजिनी बाई स्वतःच म्हणतील की "आहे ती जागा कधी कामी येईल? मी तुम्हाला वाटणी करून देते." पण बिचाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले, जेव्हा त्यांना कळले की सरोजिनी बाईंनी ती जागा बक्षीसपत्र करून केव्हाच समीरच्या नावे केली होती.

विजय, सरला आणि सोहन तिघेही सरोजिनी बाईंना अद्वा-तद्वा बोलु लागले, दुषणे देऊ लागले. सरला तर इतकी भडकली होती की तिने रात्रीच आपल्या आईला हाताला धरून घराबाहेर काढले. रडवेल्या झालेल्या सरोजिनी बाईंनी तसेच बस स्टॅन्ड गाठले आणि मिळेल ती गाडी पकडुन समीरच्या गावचा रस्ता धरला. तोंडचा घास गेल्यामुळे सोहन, सरला आणि विजयची प्रचंड चरफड झाली. सुडभावनेने विजय पेटुन उठला होता. काहीही करून समीरला धडा शिकवायचाच असे त्याने मनोमन ठरवले. दुसऱ्या दिवशी झाला प्रकार समजल्यावर समीर खुप चिडला होता. आपल्या भावंडांचा स्वभाव तो पुरता ओळखुन होता. दुरदृष्टी ठेवुन त्याने आईकडुन योग्य वेळी आपल्या नावावर बक्षीसपत्र करून घेतल्यामुळे त्याच्या भावंडांचा डाव त्याने उधळुन लावला होता. त्याच दिवशी दुपारी समीरला बँकेत सोहनचा फोन आला. "बऱ्या बोलाने जागेचे तीन हिस्से करून एक ताईच्या आणि एक माझ्या नावावर कर नाहीतर आम्ही काहीही करू शकतो हे ध्यानात ठेव, तुला आठ दिवसांची मुदत देतो. तुझे ऊत्तर काय ते कळव." अशी धमकी सोहनने आपल्या बोबड्या स्वरात समीरला दिली. त्यावर समीरनेही, "जागा आणि घर मी माझ्या कष्टातुन उभं केलंय ते काही वडीलोपार्जित नाही. तुला एक छदामही मिळणार नाही. तेव्हा तुला काय करायचय ते करून घे", म्हणत सोहनला धुडकावून लावले.

एखादा आठवडा गेला असेल समीर बँकेतील काम आटपल्यावर एक क्लायंट व्हिजीट उरकुन घरी उशिरा परतत होता. घरापासून तो जेमतेम १०० एक मीटर दूर असेल आणि अचानक त्याला रस्त्यात मध्यभागी उभी असलेली एक भयानक अशी मानवसदृश्य पांढुरकी आकृती दिसली. ती आकृती वेगाने समीरच्या अंगावर धावुन आली. तिला पाहुन त्याने अर्जंट ब्रेक लावले. डिस्क ब्रेक्स लावल्यामुळे त्याची बाईक जागेवरच थांबली आणि तो मात्र बाईकवरून फेकला गेला. हेल्मेट घातलेले असल्यामुळे त्याचे डोके वाचले पण त्याची उजवी बाजु चांगलीच सणकुन निघाली. पडल्या पडल्याच त्याने रस्त्यावर दोन्ही दिशांना पाहिले पण त्याला रस्त्यावर कोणीच दिसले नाही. आपल्याला भास तर नाही ना झाला असा विचार करत कसाबसा उठत त्याने गाडी उचलायचा प्रयत्न केला पण त्याच्या खांद्यातुन एवढी जिवघेणी कळ उठली की तो मटकन खालीच बसला. गाडी घेऊन घरी जाणे आपल्याला शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्याने राधिकाला फोन लावला. समीरचा अपघात झालाय हे कळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात काहीच न सांगता शेजारच्या घरातील इंजिनीअरिंगला शिकत असलेल्या सचिनला सोबत घेऊन ती आपल्या ऍक्टिवावरून तडक समीरच्या दिशेने निघाली.

रस्त्यात बसलेला समीर आणि त्यांची आडवी पडलेली बाईक पाहुन तिला रडुच कोसळले. तिने आपली गाडी समीरजवळ उभी केली. समीरला कितपत लागलंय याचा अंदाज घेतला. लगेच त्यांच्या फॅमिली डॉक्टर जोशींना फोन करून तातडीने घरी येण्यास सांगितले. सचिनच्या मदतीने तिने समीरला आधार देऊन उभे केले आणि आपल्या गाडीवर बसवुन घरी घेऊन आली. त्यांच्या पाठोपाठ सचिनही समीरची गाडी घेऊन आला. समीरला त्या अवस्थेत पाहुन त्याची आई आणि मुलं सर्वानाच धक्का बसला. ते सगळे समीरची विचारपुस करू लागले. गाडी स्लिप झाली असे सांगुन समीरने वेळ मारून नेली. जोशी डॉक्टरांनी समीरला तपासले. कोणतेही हाड तुटले नव्हते पण मुकामार खुप लागला होता. खांद्याला आणि गुडघ्याला क्रेप बँडेज बांधुन त्यांनी गरम पाण्याच्या पिशवीने शेकायला सांगितले. काही औषधे लिहुन दिली आणि समीरला रात्री झोपताना हळद घालुन गरम दुध देण्यास सांगुन ते निघुन गेले. जाता जाता समीरला आठ दिवसांची सक्तीची विश्रांती घ्यायला सांगायला ते विसरले नाहीत. पण हे सर्व इथेच थांबणारे नव्हते. ही तर केवळ सुरवात होती. कांबळे कुटुंबीयांवर अजुन मोठी संकटे येणे बाकी होते.

रात्री जेवणानंतर बेडवर लवंडला असता, समीर झाल्या प्रकाराची मनात उजळणी करू लागला. त्याने ती मानवसदृश्य आकृती आपल्या डोळ्यांनी पहिली होती. तो भास नक्कीच नव्हता. त्याचा भुताखेतांवर विश्वास नव्हता पण तो भयानक चेहरा आठवल्यावर त्याच्या अंगावर काटाच आला. एकदम थंडी भरून आली. घरातील आवरा आवार करून राधिका झोपायला आली तेव्हा तिला समीरला हुडहुडी भरून ताप भरल्याचे लक्षात आले. तिने त्याला तापाचे औषध दिले पण ताप वाढतच होता. रात्रभर ती त्याच्या डोक्यावर मीठ घातलेल्या थंड पाण्याच्या घड्या बदलत होती. पहाटे चार वाजता समीरचा ताप उतरला आणि मग त्या दोघांना झोप लागली. साधारण दोन तास झाले असतील आणि काही विचित्र आवाजांमुळे राधिकाची झोप चाळवली. डोळे चोळत तिने समीरकडे पाहिले तर समीरच्या छातीवर एक मानव सदृश्य भयानक पांढुरकी आकृती बसलेली तिला दिसली. ती आकृती समीरचा गळा आवळत होती आणि समीर बेडवर असहाय पडुन श्वास घेण्यासाठी धडपडत होता. त्याच्या तोंडातुन बाहेर पडणाऱ्या विचित्र आवाजानेच राधिकाची झोप चाळवली होती. ते दृश्य पाहिल्यावर राधिका किंचाळलीच. त्यासरशी ती आकृती समीरच्या छातीवरून गायब झाली आणि समीर मोठमोठ्याने श्वास घेऊ लागला. समीरचे दैव बलवत्तर म्हणुन तो दुसऱ्यांदा वाचला होता. पण या दुसऱ्या घटनेमुळे त्याची खात्री पटली की त्याला भास झाला नव्हता. कोणीतरी नक्कीच त्याच्या जिवावर उठलय.

राधिकाच्या किंचाळण्यामुळे सरोजिनी बाई जाग्या झाल्या आणि गडबडीने समीरच्या बेडरूममध्ये आल्या. राधिकाकडुन झाला प्रकार कळल्यावर त्याही धास्तावल्या. आपल्या धाकट्या लेकाचे आणि लेकीचेच हे प्रताप असावेत हे त्यांनी मनोमन ओळखले पण राधिका घाबरेल म्हणुन त्या काही बोलल्या नाही. ह्या प्रकरणाचा लवकरच छडा लावला पाहिजे नाहीतर समीरच्या किंवा घरातील कोणाच्या तरी जिवावर बेतेल हे त्यांनी ओळखले आणि राधिकाला धीर देऊन मनाशी काहीतरी ठरवत त्या त्यांच्या खोलीत गेल्या. काही फोन केल्यावर त्या पुन्हा समीरच्या बेडरूममध्ये आल्या आणि राधिकाला जवळ घेऊन समजावणीच्या सुरात म्हणाल्या, ''अजुन काही मोठा अनर्थ व्हायच्या आधी आपल्याला समीरला घेऊन लवकरात लवकर आपल्या गावी जायला पाहिजे. आपल्याला जी काही मदत लागणार आहे ती आपल्या गावातच उपलब्ध होईल. माझे बोलणे झाले आहे तु लवकरात लवकर निघायची तयारी कर. आपण आजच आपल्या गावी जाऊया. सरोजिनी बाईंचा विचार समीर आणि राधिका दोघांनाही पटला. मुलांनाही सुट्या लागल्या होत्या त्यामुळे काहीच अडचण नव्हती. राधिका पटकन तयारीला लागली. समीरने आपल्या सिनियर मॅनेजरला फोन करून आपल्या अपघाताबद्दल सांगीतले आणि आपण एक आठवड्याच्या सिक लिव्हवर जात असल्याचे कळवले. समीरची उजवी बाजु पुर्णपणे काळी निळी झाली होती. त्याची अवस्था बघता राधिकाने बसऐवजी एक खाजगी ऍम्ब्युलन्स मध्ये समीरला झोपवुन आपल्या सासु आणि दोन्ही मुलांसह ती आपल्या गावी निघाली.

साधारण पाच तास प्रवास करून दुपारी तीन वाजता ते सर्व आपल्या घरी पोहोचले. घराला कुलुप होते. आपल्याकडील दुसऱ्या चावीने दार उघडून ते आत गेले. बेडरूममध्ये स्वानंद पलंगावर झोपला होता. "अरेच्या! म्हणजे सोहन स्वानंदला घरात एकट्यालाच सोडुन बाहेर गेलाय तर! बिचारा आईविना पोर! आज सीमा असती तर स्वानंदची अशी अवस्था नसती झाली", सरोजिनी बाईच्या या वाक्याने राधिकाला सीमाच्या आठवणीने एकदम भरून आले. राधिकाने स्वतःला सावरले आणि किचन मधले डबे उघडुन पाहिले तर सगळेच रिकामे होते. तिने आपल्या मोठ्या मुलाच्या हातुन थोडे वाण सामान मागवले आणि फटाफट स्वयंपाक केला. भुकेलेल्या स्वानंदला आणि सर्वानाच तिने गरम गरम पोटभर जेऊ घातले आणि सर्वच जण आराम करण्यासाठी लवंडले. तेवढ्यात सोहन तेथे आला. समीर आणि त्याचे कुटुंब तेथे आलेले पाहुन, शिकार स्वतःहुन जाळ्यात अडकायला चालत आली आहे याचा त्याला आनंद झाला. त्याने समीरला विचारले, "काय ठरवलेस? मला झिडकारण्याचा परिणाम बघितलास ना काय झाला तो? हा तर फक्त नमुना होता, तु जर तयार नाही झालास तर आज रात्री तुमच्यापैकी कोणीही वाचणार नाही." त्यावर सरोजिनी बाई पुढे आल्या आणि त्यांनी सोहनच्या एक कानाखाली लगावली. म्हणाल्या, "नालायका वडीलांच्या जागी असलेल्या भावाला असा त्रास देताना तुम्हाला जरा देखील शरम नाही वाटली? त्यानेच तुला नोकरीला लावले ना? सरलाचे लग्न व्हावे म्हणुन किती प्रयत्न केले. तुमच्या दोघांसाठी त्याने लहानपणापासुन किती काय केले, तुमच्यासाठी वडीलांचा मारही खाल्ला. त्याचे उपकार स्मरायचे सोडून तुम्ही दोघे त्याच्याच जिवावर उठलात! आत्ताच्या आत्ता जे काही तुम्ही बहीण भावानी समीरवर उठवले आहे ते पाहिलं जाऊन नाहीसे करा, नाहीतर दोघांना पोलिसात देईन मी!.

त्यासरशी सोहन आपला गाल चोळत, दात ओठ खात म्हणाला, "माझ्या कानाखाली मारलंस काय म्हातारे! आता यांच्या बरोबर तुला पण जिवंत ठेवत नाही. फक्त काही तास थांब आणि बघ मला मारल्याचा काय परिणाम होतो ते! सीमाला तर वर पाठवले आहेच आता तुम्हाला सगळ्यांना पण तिच्याकडे नाही पाठवले तर सोहन नाव नाही लावणार." असे म्हणुन सोहन फणकाऱ्याने तेथुन निघुन गेला. हा सर्व प्रकार चार डोळे गडग्याच्या आडुन गुपचुप पाहात होते. सरोजिनी बाई स्वतःच्या नशिबाला दोष देत होत्या. समीरने त्यांचे सांत्वन केले. सर्व काही ठीक होईल असे आश्वासन देऊन तो आपल्या आईला घेऊन आत गेला. प्रवासाने थकलेले ते जीव अन्न पोटात गेल्यावर सुस्तावले आणि अलगद झोपेच्या अधीन झाले. थोडा वेळ गेला असेल तोच समीरच्या धाकट्या मुलाच्या ओरडण्याने सर्वच जण दचकुन जागे झाले. लहानगा अनुज हवेत तरंगत होता. मधेच तो वर जात होता तर मधेच वेगात खाली येत होता. जमिनीपासुन दोन इंचावर येऊन परत वेगाने वर जात होता. कोणीतरी त्याला एखादे खेळणे वर फेकुन झेलावे तसे झेलत होते आणि पुन्हा वर फेकत होते. पण कोणीही दिसत नव्हते. तो बिचारा मात्र जिवाच्या आकांताने "आई, बाबा! मला वाचवा", असे ओरडत होता.

अनुजची ती अवस्था पाहुन राधिकाला भोवळ यायची काय ती बाकी होती. नवऱ्याची अवस्था ती अशी आणि आता पोटाच्या गोळ्याच्या बाबतीतही असला अमानवी प्रकार घडताना पाहुन ती माऊली बिचारी थिजुन गेली होती. अचानक अनुजच्या जवळ तीच भयानक पांढरी आकृती आकार घेऊ लागली, तिने अनुजची मानगुट धरली होती. तिच्या भयानक रूपाचे दर्शन या वेळी सर्वांनाच झाले आणि सगळ्यांचीच बोबडी वळली. आपला भयानक चेहरा आणखीनच भयानक करत ती आकृती भेसुर हसली आणि त्याच वेळी घराबाहेर कुत्रे विव्हळू लागले, उघड्या खिडकीतून एक वटवाघुळ आत आले आणि अनुजच्या डोक्यावरती घिरट्या घालू लागले. सर्व वातावरण एकदम जड झाले होते जणु त्या घरावर अवकळा पसरली होती. त्या भयानक आकृतीने अनुजला समोरच्या भिंतीवर जोरात फेकले. सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. पण काय आश्चर्य! अनुज भिंतीवर आपटला नाही उलट तो एखाद्या पिसासारखा तरंगत अलगद राधिकाच्या मांडीवर विसावला. ती भयानक आकृती त्या भिंतीच्या दिशेने पाहात दात ओठ खाऊ लागली, भेसुर आणि कर्णकटू आवाज काढु लागली ते पाहुन सर्वांचीच नजर ती आकृती पाहात असलेल्या दिशेकडे गेली. तिथे एक तेजस्वी प्रकाशरुपी गोळा तरंगताना त्यांना दिसला.

जसजसा तो प्रकाश अधिकाधिक तेजस्वी होऊ लागला तसतसा त्या भयानक आकृतीचा आकार संकुचित होत गेला आणि मोठी किंकाळी फोडुन ती आकृती गायब झाली. वातावरणातील ताण झर्रकन ओसरला होता. जणु काय काळरात्र सरून सहस्त्ररश्मीचे आगमन झाले होते. वातावरण एकदम प्रसन्न झाले. कुत्र्यांचे विव्हळणे एखादे बटन दाबावे तसे बंद झाले. ते वटवाघुळही नकळत नाहीसे झाले होते. त्या दिव्य प्रकाशाला आता आकार प्राप्त होऊ लागला होता. तो सगळा प्रकार सर्वचजण डोळे विस्फारून पाहात होते. आयुष्यात प्रथमच या अतर्क्य घटनांचा सामना करावा लागत असल्यामुळे राधिका आणि समीर दोघेही पुरते गोंधळून गेले होते. त्या प्रकाशातुन सीमाची आकृती बनली. तो सीमाचा आत्मा होता. सीमाला पाहिल्यावर राधिकाचे डोळे भरून आले. सीमामुळे आपला अनुज वाचला हे लक्षात येताच कृतज्ञतेने ती ओक्सा बोक्शी रडु लागली. रडण्याचा भर ओसरल्यावर राधिकाने अनुजचे प्राण वाचवल्याबद्ल सीमाचे आभार मानले. सीमा म्हणाली, "जाऊ बाई, माझ्या उपाशी मुलाला, माझा नवरा घरात डांबून निघुन गेला पण तुम्ही त्याला मायेने खाऊ घातलेत, तुमच्या मुलाच्या जिवाला मी कसा काय धक्का पोहोचु दिला असता?” राधिका म्हणाली," “सीमा, तुझे दिवस कार्य तर आम्ही केले होते मग तुला मुक्ती का नाही मिळाली? तुझी कोणती इच्छा अपुर्ण राहिली आहे ते मला सांग. मी ती नक्की पुर्ण करेन. तु स्वानंदची काळजी करू नकोस, या पुढे मी त्याचा आपल्या मुलांप्रमाणेच संभाळ करेन".

“जाऊबाई, स्वानंदची तुम्ही काळजी घ्याल यात मला काडीचाही संशय नाही. त्या तिघांचा प्लॅन मी तुम्हाला कळवण्या आधीच त्यांनी मला मारले त्यामुळे तुम्हाला हे सर्व सांगण्यासाठीच मी अजुन थांबले होते," असे म्हणत सीमाने सगळी हकीकत राधिकाला सांगितली. सोहन, सरला आणि विजयने समीरची जागा बळकावण्यासाठी केलेले प्लॅनिंग, ते सीमाला कळल्यावर त्यांनी सीमाचा केलेला खुन, त्या खुनाला दिलेले नैसर्गिक मृत्युचे स्वरूप, सरोजिनी बाईंना घोळात घेऊन जागा आपल्या नावावर करून घेता न आल्यामुळे मांत्रिकाच्या मदतीने समीरला त्रास देण्याकरिता त्याच्या मागे सोडलेले पिशाच्च याबद्दल तिने इतंभुत माहिती दिली. ती ऐकून सगळेच सुन्न झाले. सीमाने पुढे सांगितले की,'' जर का समीर भाऊजींनी त्यांची जागा त्या तिघांच्या नावावर नाही केली तर आज अमावास्येला त्या पिशाच्चाला भोग चढवुन त्याच्याकरवी आपल्या पुर्ण कुटुंबालाच मारण्याचा प्लॅन त्या तिघांनी केला आहे." हे ऐकताच समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. “माझे काम झाले, मला आता जायला हवे तुम्ही काळजी घ्या,” असे म्हणुन सीमाचा आत्मा अदृश्य झाला.

असल्या मुलांना जन्म दिल्याबद्दल सरोजिनी बाईंनीही लाजेने आपली मान खाली घातली. ज्यांच्यावर आपण जिवापाड प्रेम केले ते आपले सख्खे बहीण-भाऊ आपल्याच जिवावर उठले तेही आपल्या जागेसाठी, ही गोष्ट समीरला अत्यंत दुःखी करून गेली. आयुष्यात प्रथमच त्याला आपल्या भावंडांचा इतका राग आला होता. आपल्या वहिनीला मारून आता आपल्यासह आपली आई, पत्नी आणि लहान मुलांना पण मारण्याचा प्लॅन आपल्या भावंडानी केल्याचे कळताच समीरच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. इतक्यात दरवाज्याची बेल वाजली म्हणुन राधिकाने दरवाजा उघडला. दारात राधिकाचे आईवडील होते. सोबत भिकारी वाटावा असा पण तेज:पुंज माणुस काखेत झोळी अडकवुन प्रसन्न चित्ताने दारात उभा होता. राधिका आईला बिलगली आणि तिने आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. सरोजिनी बाईंनी फोनवर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मैत्रिणीने म्हणजेच राधिकाच्या आईने आपली कामगिरी चोख बजावली होती. अगदी योग्य वेळी ती ओळखीच्या एका सिद्ध गोसाव्याला सोबत घेऊन आली होती. घरात शिरताच त्या तेजस्वी गोसाव्याला आपसुकच सर्व काही ज्ञात झाले. रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी अमावास्या सुरू होणार होती त्यामुळे आता घाई करायला हवी होती हे त्याने ताडले. त्या गोसाव्याने राधिकाच्या आईवडीलांना तेथुन निघण्यास सांगीतले आणि पुढच्या तयारीला लागला.

त्या गोसाव्याने आपल्या धीर गंभीर स्वरात काही मंत्र उच्चारायला सुरवात केली. प्रत्येक मंत्राबरोबर त्या घरातील वातावरण भारले जात होते. दिकबंध मंत्र उच्चारून त्याने सर्व दिशा सुरक्षित करून घेतल्या. घरात चारी दिशांना मंतरलेल्या उदबत्या लावल्या. त्यांच्या सुवासाने घर भरून गेले होते. प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यात काचेच्या वाडग्यात खडा मीठ आणि काळे उडीद भरून ठेवले. त्या नंतर त्याने घराभोवती चार फुटाचे अंतर ठेऊन मंतरलेल्या विभुतीने एक मंडल काढले. घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवरून त्याने तीन वेळा नारळ ओवाळला आणि तो दक्षिण दिशेला वाढवण्यास समीरच्या मोठ्या मुलास सांगितले. हे सर्व करेपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. घरातील सर्वांना जेवणे आटपुन घेण्यास सांगितले. नंतर त्याने हॉल मध्ये मिठाने एक मंडल काढले, व त्या मिठाच्या मंडलात सर्वाना डोळे बंद करून बसावयास सांगितले. गोसावी म्हणाला, "ईश्वराच्या आशीर्वादाने तुमच्यावर चालुन आलेल्या संकटापासुन मी तुम्हा सर्वांचे रक्षण करेन. पण काहीही झाले तरी तुम्ही कोणीही या मंडलाच्या बाहेर पडायचे नाही. केवळ ईश्वराचे नामस्मरण करत या संकटातुन वाचवण्यासाठी त्याची प्रार्थना करा. जोपर्यंत तुम्ही या मंडलाच्या आत आहात तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात”.

इकडे मांत्रिकांसोबत सोहन, सरला आणि विजय स्मशानात पोहोचले होते. मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे मटण आणि दारूचा भोग त्यांनी मांत्रिकासमोर ठेवला. पिशाच्चाचे आवाहन करण्यापुर्वी मांत्रिकाने त्यांना आपल्या पाठीमागे बसवले तसेच त्या पिशाच्चाने कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरीही न घाबरता जागेवरच बसण्यास सांगितले. जे काही घडेल ते शांतपणे पाहावे, खुपच भिती वाटल्यास डोळे बंद करावे पण पळुन जायचा प्रयत्न करू नये अन्यथा ते पिशाच्च त्यांचाच भोग घेईल अशी तंबी पण दिली. मांत्रिकाने पिशाच्चाचे आवाहन सुरू केल्यावर थोड्याच वेळात किंचाळत, भयानक आवाज करत ते तेथे आले. त्या भयानक पिशाच्चाला पाहुन त्या तिघांची पाचावर धारण बसली पण मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे ते गुपचुप बसुन राहिले. ते पिशाच्च समोर येताच त्या मांत्रिकाने एका धारधार हत्याराने आपली मांडी चिरली त्यातुन उडालेल्या रक्ताची धार थेट त्या पिशाच्चाचा तोंडात उडाली. आपल्या लालभडक जीभेने त्याने ते रक्त चाटुन घेतले. नंतर मांत्रिकाने त्या पिशाच्चाला समोर ठेवलेला भोग घेण्यास सांगितले. समोर ठेवलेले मटण आणि दारू फस्त केल्यावर त्या पिशाच्चाने मांत्रिकाला आपली इच्छा विचारली. मांत्रिकाने त्याला समीरच्या कुटुंबाला संपवायचे काम सोपवले. पिशाच्च तेथुन गायब होताच, त्या मांत्रिकाची चिरलेली मांडी पुर्ववत झाली. तो चमत्कार पाहुन त्या तिघांची तोंडे उघडी पडली होती.

रात्रीचे ११ वाजून ३० मिनिटे झाली होती. मिठाच्या मंडलात समीरचे पुर्ण कुटुंब एकमेकाला चिकटुन पेंगत होते. तो गोसावी पद्मासनात बसुन आपल्या आराध्याचे ध्यान करण्यात मग्न होता. काही काळ गेला आणि त्या गोसाव्याचे डोळे उघडले. "वेळ जवळ आली आहे आता सावध व्हा", असे गोसाव्याचे धीर गंभीर स्वर कांबळे कुटुंबीयांच्या कानावर पडले. डोळे चोळत सर्वजण सावरून बसले. छोटा अनुज गाढ झोपेत होता पण त्याचा मोठा भाऊ कृष्णा टक्क जागा होता. सर्वानी गोसाव्याने दिलेल्या अभिमंत्रित धाग्यांना आपापल्या गळ्यात बांधले होते. आता त्या गोसाव्यावर सर्व हवाला ठेऊन जे होईल त्याला सामोरे जाण्याचे कांबळे कुटुंबीयांनी ठरवले होते. गोसावी मंत्र पुटपुटु लागला होता. ठीक ११ वाजून ३७ मिनिटांनी ते पिशाच्च कांबळे कुटुंबियांच्या घरासमोर येऊन उभे ठाकले. सुक्ष्म रूपाने त्याने घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण घराभोवती घातलेल्या विभुतीच्या मंडलाने त्याचा रस्ता अडवला. प्रचंड चिडलेल्या त्या पिशाच्चाने घराभोवती चक्कर मारण्यास सुरवात केली. घराभोवती घातलेल्या मंडलामुळे ते घरात घुसू शकत नव्हते.

बराच वेळ प्रयत्न केल्यावरही त्या मंडलाला पार करता न आल्याने ते पिशाच्च अत्यंत क्रोधीत झाले होते. रागाच्या भरात त्याने घरामागील पाण्याचा ड्रम उचलून मागच्या दारावर फेकला त्यामुळे ड्रम मधील पाणी सगळीकडे पसरले आणि त्या पाण्याने थोडी विभुती धुऊन गेली आणि त्या पिशाच्चाचा घरात प्रवेश करण्याचा मार्ग सुकर झाला. सुक्ष्म रूपाने दरवाज्याच्या फटीतुन ते पिशाच्च घरात शिरले. पिशाच्च घरात शिरल्याची जाणीव होताच गोसाव्याने मोठ्या आवाजात मंत्र म्हणण्यास सुरवात केली. त्याबरोबर त्या पिशाच्चाला त्रास होऊ लागला. ते पिशाच्च गोसाव्याला काहीच करू शकत नव्हते त्यामुळे त्याने घरातील वस्तू त्याच्या दिशेने फेकण्यास सुरवात केली. गोसावी स्वतःला शिताफीने वाचवत मंत्र म्हणतच होता. तेवढ्यात त्या पिशाच्चाने एक अवजड टेबल गोसाव्याच्या दिशेने फेकले त्याचा धक्का लागुन गोसावी खाली पडला. तसे समीर त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावला पण गोसाव्याने त्याला हाताचा इशारा करून मंडलातच राहण्यास सांगितले. त्या गडबडीमुळे अनुजची झोप चाळवली. आपल्या समोर ते भयानक पिशाच्च पाहुन तो लहानगा प्रचंड घाबरला.

त्याच्या मनातील भितीला आपले हत्यार बनवत त्या पिशाच्चाने अजुनच भयानक रूप धारण केले आणि अनुजच्या अंगावर धावुन गेले. घाबरलेला अनुज राधिकाच्या मागे लपण्यास गेला पण गडबडीत तोल जाऊन तो मिठाच्या मंडलाबाहेर पडला आणि तिथेच त्या पिशाच्चाने डाव साधला. त्याने अनुजच्या शरीरात प्रवेश केला. अनुज उभ्या भिंतीवर चढत छताला जाऊन उलट लटकला ते पाहुन गोसावी नाही म्हणेपर्यंत राधिका मोठमोठ्याने आक्रोश करत मंडलाबाहेर पडली. त्याबरोबर अनुजने तिच्याकडे झेप घेत तिचा गळा आवळण्यास सुरवात केली. गोसाव्याच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत समीर मंडलातुन बाहेर पडला आणि उजवा हात जायबंदी असल्यामुळे आपल्या डाव्या हाताने अनुजच्या पकडीतुन राधिकाला सोडवायचा अयशस्वी प्रयत्न करू लागला त्याबरोबर अनुजने दुसऱ्या हाताने समीरचा गळा पकडला व तो राधिका आणि समीरचा जीव घ्यायचा प्रयत्न करू लागला. अनुज लहान असल्यामुळे त्या पिशाच्चाला आपली पुर्ण ताकद त्याच्या माध्यमातुन वापरता येत नव्हती हे लक्षांत येताच त्या गोसाव्याने आपल्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ मंत्रुन अनुजच्या गळ्यात घातली आणि मंत्र म्हणत तो गोमुत्रात दुर्वा बुडवून अनुजवर गोमुत्र शिंपडु लागला. रुद्राक्षाची माळ गळ्यात असल्यामुळे ते पिशाच्च अनुजच्या शरीरातुन बाहेर पडुन आपली सुटका करू शकत नव्हते आणि गोमुत्राच्या शिडकाव्यामुळे तर ते पुरते भाजुन निघत होते. पण तरीही त्याने समीर आणि राधिकाला सोडले नव्हते. ते पाहुन गोसाव्याने मंत्रोच्चारण सुरूच ठेऊन आपल्या झोळीतील विभुती अनुजच्या कपाळावर लावली, त्यासरशी अनुज भयकारी आवाज करत किंचाळु लागला. तोंडातुन विचित्र आवाज करत तो गोसाव्याला आपणास सोडण्याची विनंती करू लागला. तेव्हा पुन्हा कांबळे कुटुंबीयांना त्रास न देण्याच्या अटीवर गोसाव्याने त्या पिशाच्चास मुक्त करण्याचे कबुल केले.

अनुजने समीर आणि राधिकाच्या गळ्याभोवतीची पकड ढिली करताच गोसाव्याने त्यांना परत मिठाच्या मंडलात जाण्यास सांगितले. मोठमोठ्याने श्वास घेत आणि खोकत ते पुन्हा मंडलात गेले. नंतर गोसाव्याने अनुजच्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ काढुन घेतली पण मंत्रोच्चारण सुरूच ठेवले. अनुजच्या शरीरातुन बाहेर पडताच ते पिशाच्च तिथुन क्षणात नाहीसे झाले आणि अनुज शुद्धीवर आला. समीर आणि राधिकाला सरोजिनी बाई आणि कृष्णाने सावरले. थोडे पाणी पिताच त्यांना हुशारी वाटु लागली. अनुज राधिकाला बिलगला व रडु लागला, तिनेही त्याला छातीशी कवटाळले. आता सर्व काही ठीक झाल्याचे समीरने गोसाव्याच्या प्रसन्न मुद्रेवरून ताडले. सर्वांनीच गोसाव्याला नमस्कार केला आणि मोठ्या संकटातून वाचवल्याबद्दल त्याचे आभार मानले. सर्वांना आशीर्वाद देऊन तो गोसावी आपली दक्षिणा घेऊन मार्गस्थ झाला. समीरच्या घरातुन निघाल्यावर त्या प्रचंड भडकलेल्या पिशाच्चाने थेट स्मशानाची वाट धरली. सुदैवाने हा सर्व प्रकार सुरु असताना स्वानंद मंडलातच थांबला होता आणि शांतपणे जे काही चालले होते ते पाहत होता. तोही बाहेर पडला असता तर मोठा अनर्थ ओढवला असता. सरोजिनी बाईंनी मोठ्या प्रेमाने त्याला जवळ घेतले, त्यांचा मायेचा स्पर्श जाणवुन तोही त्यांना बिलगला.

दुसऱ्या दिवशी कुणीतरी अजस्त्र ताकदीने पिरगळुन टाकावे तसे पिरगळलेले मांत्रिकाचे कलेवर स्मशानाच्या फाटकाबाहेर पडलेले सरला, सोहन आणि विजयला आढळले. ते पाहुन त्यांची बोबडीच वळली. आल्या-पावली ते घरी परतले तर दारात त्यांच्या स्वागताला कांबळे कुटुंबीय व इन्स्पेक्टर शिंदे वॉरन्टसह सज्ज होते. समीरने तिघांच्या विरोधात FIR नोंदवली होती. इन्स्पेक्टर शिंदेनी त्या तिघांवर सीमाच्या खुनाचा कट आखणे, खुन, जादूटोणा करणे, पुरावे नष्ट करणे असे विविध आरोप लावले होते. सीमाचा मृत्यू झाल्यापासून इन्स्पेक्टर शिंदे या तिघांच्या विरुद्ध गुप्तपणे पुरावे गोळा करत होते. चौकशी करत असताना बरेच पुरावे हाती आले. मुख्य दरवाज्याजवळ बोळा करून टाकलेले एक बिल इन्स्पेक्टर शिंदेंना सापडले. त्या बिलावरील तारीख ही तीच होती ज्या दिवशी सीमाचा मृत्यु झाला होता, बिलावरून ज्या दुकानामधुन मच्छर अगरबत्ती खरेदी केली गेली त्या दुकानामध्ये इन्स्पेक्टर शिंदेनी चौकशी केली. मच्छर अगरबत्तीच्या एकाच ब्रॅन्डचे दोन बॉक्स खरेदी केलेहोते. मच्छर अगरबत्तीच्या बॉक्स वरील बार कोड घरातील आणि कचऱ्यात टाकलेल्या मच्छर अगरबत्तीच्या बॉक्सवरील बार कोडशी मॅच झाले होते. आणि घरातील बॉक्स मध्ये केवळ दोनच कॉइल्स शिल्लक होत्या. एकाच रात्रीत तब्बल १८ कॉइल्स जाळण्यात आल्या होत्या. कचऱ्यात फेकलेल्या मच्छर अगरबत्तीची राख सीमाच्या रूममध्ये आढळलेल्या राखेशी मॅच झाली होती. सरलाने सर्व राख एका पुडीत बांधून घराबाहेर टाकली होती. आणि त्यातील राखेचे प्रमाण हे एका कॉईलच्या राखेपेक्षा अनेक अनेक पटीने जास्त होते.

फॉरेन्सिक रिपोर्टनुसार सीमाला मारताना तिच्या हातापायावर उमटलेले हातांचे ठसे आणि पाण्याच्या ग्लासवरून जमा केलेले सरला आणि सोहनच्या बोटांचे ठसे एकमेकांशी मॅच झाले होते. आणि सर्वात मोठा पुरावा होता तो म्हणजे रात्री लघुशंकेसाठी उठलेल्या शेजारच्या घरातील सावंतांनी रात्री कांबळेच्या बेडरूम मधील दिवा सुरू असल्याचे आणि विजयने खिडकी उघडल्यावर मोठ्या प्रमाणात धुर बाहेर पडल्याचे पाहिले होते. तसेच विजय आणि सोहनला सीमाला जमिनीवरून उचलुन बेडवर ठेवताना आणि सरलाला घराबाहेर काहीतरी टाकताना देखील पाहिले होते. पण असेल काहीतरी म्हणुन त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले होते. सावंतांची साक्ष मोलाची ठरली. तसेच सोहनच्या मागावर असलेल्या इन्स्पेक्टर शिंदेनी सोहनला, समीर आणि पुर्ण कुटुंबाला सीमा प्रमाणेच ठार मारण्याची धमकी देताना आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले होते. पोलिसी खाक्या दाखवल्यावर तिघांनीही आपला अपराध कबुल केला. तिघांचा कबुली जबाब, उपलब्ध आणि परिस्थितीजन्य पुरावे आणि शेजारी सावंत यांची साक्ष या आधारे न्यायालयाने त्या तिघांना दोषी ठरवुन आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली व खडी फोडायला पाठवले. स्वानंदसोबत सरलाच्याही दोन्ही मुलांची जबाबदारी राधिका आणि समीरने स्वतःवर घेतली आणि त्यांना पोरके होण्यापासुन वाचवले. अशा रितीने कांबळे कुटुंबीय आपल्यावर कोसळलेल्या संकटातुन थोडक्यात वाचले होते. समीरने आपल्या भावंडांचा कुटील डाव त्यांच्यावरच उलटवला होता. झाले गेले सर्व काही विसरून कांबळे कुटुंबीय पुन्हा नव्या उमेदीने चांगले आयुष्य जगण्याची स्वप्ने पाहत होते, आणि तिकडे जेलमध्ये सोहन, सरला आणि विजय आपल्या पापांची शिक्षा भोगत पश्चात्तापाऐवजी सुडाग्नित जळत होते. सुंभ जळले पण दुर्दैवाने पिळ मात्र तसाच होता. पण आता मात्र त्यांच्या नशिबी उरली होती ती फक्त प्रतिक्षा.

- केदार कुबडे

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,2,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1347,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,3,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1087,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,5,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,14,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,25,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,220,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,13,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,69,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,7,निसर्ग कविता,33,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,36,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,8,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,18,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1130,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,27,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,47,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,286,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,147,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,10,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,55,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: वारसाहक्क (मराठी भयकथा)
वारसाहक्क (मराठी भयकथा)
वारसाहक्क, मराठी भयकथा - [Varsa Hakka, Marathi Bhaykatha] मत्सराने पेटुन उठलेले बहीण भाऊ आपल्या मनसुब्यात ते यशस्वी होतात का? याची रंजक कहाणी म्हणजेच वारसाहक्क.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgbAJhota46Brpwj2Ba9ZmB2cDLBDh-87Pba1uZKO2DQvxBfFt_NpkxkfcGuBIHqKamkGUiMA396LSbo9MLdVnqduOMJVJBc4geWAXgZUE8jxAYFMgSPb2N671KyOUvEA-79xadr2jsfPhI/s1600/varsa-hakka-710x360.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgbAJhota46Brpwj2Ba9ZmB2cDLBDh-87Pba1uZKO2DQvxBfFt_NpkxkfcGuBIHqKamkGUiMA396LSbo9MLdVnqduOMJVJBc4geWAXgZUE8jxAYFMgSPb2N671KyOUvEA-79xadr2jsfPhI/s72-c/varsa-hakka-710x360.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2016/08/varsa-hakka-marathi-bhaykatha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2016/08/varsa-hakka-marathi-bhaykatha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची