सुडचक्रभेद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१५

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha - Page 9

सात्विक आपल्या वडीलांच्या मृत्युला मला जवाबदार मानत होता. माझा बदला घेण्यासाठी त्याने गोपाळला एका रूबी नावाच्या बारगर्लच्या नादाला लावुन कफल्लक बनवल...

मोठा उसासा सोडत भगवानदासांनी अनेक वर्षांपूर्वी सुरु झालेल्या सुडचक्रावरून पडदा उठवायला सुरवात केली. “महिला शौचालय प्रकरणी पोलिसांनी सोडुन दिले असले तरी माझ्या मुलाचे भवितव्य, वाया गेलेल्या सात्विकपासुन सुरक्षित करण्यासाठी इन्स्पेक्टरला पैसे चारुन मी केस बनवून घेतली आणि सात्विकला बालसुधार गृहात पाठवायची व्यवस्था केली. जेणेकरून गोपाळच्या संपर्कात न राहिल्याने तो त्याला बिघडवु शकणार नाही आणि कदाचित बालसुधार गृहात राहिल्यामुळे स्वत: पण सुधारेल असे मला वाटले होते. पण दुर्दैवाने त्या धक्क्याने तुमचे यजमान गेले. सात्विक आपल्या वडीलांच्या मृत्युला मला जवाबदार मानत होता. माझा बदला घेण्यासाठी त्याने गोपाळला एका रूबी नावाच्या बारगर्लच्या नादाला लावुन कफल्लक बनवले नंतर एका बाबाच्या मदतीने अमानवीय शक्तीच्याद्वारे तिचा खुन करण्याची योजना बनवली आणि गोपाळच्या मनात तो खुन स्वत:च्या डोळ्यांनी बघण्याची इच्छा निर्माण करुन त्या अमानवीय शक्ती कडुन त्याचाही खुन करवला. बरोबर आपल्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी गोपाळच्या आत्म्याने मेंटल असायलम मध्ये सात्विकचा खुन केला आणि आपला सुड उगवला. त्याला मुक्ती मिळाली पण आता सात्विकचा आत्मा सुडासाठी आमच्या पुऱ्या खानदानाचाच विनाश करायला निघालाय. आमच्या घरात त्याने आत्तापर्यंत खुप त्रास दिलाय. एक एक दिवस आम्ही जीव मुठीत धरून काढतोय. पण आता हे सगळे असह्य होत चाललय. हे सुडचक्र इथेच थांबावे असे वाटते कारण यात दोन्ही घराण्यांचा केवळ सर्वनाशच होईल”, एवढे बोलुन भगवानदास शुन्यात हरवल्यासारखे बसुन राहीले.

हे सर्व ऐकल्यावर सुलोचना बाईंना आपल्या मुलाच्या कृत्याची प्रचंड चीड आली. सात्विक या थराला जाईल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. भगवानदासांची माफी मागत त्या म्हणाल्या, “माझ्या मुलाच्या कृत्त्याबद्दल मी तुमची मनापासुन माफी मागते. सात्विकच्या वडीलांचा त्याच्यावर खुप जीव होता त्यामुळे जेव्हा जेव्हा मी त्याच्या खोड्यांवर त्याला शिक्षा करायचे तेव्हा तेव्हा ते त्याला वाचवायचे. याचा परिणाम व्हायचा तोच झाला, सात्विक वाया गेला. बालसुधार गृहाचे तर फक्त निमित्त झाले. आपल्या मुलाचे आयुष्य खराब होण्याला आपणच जवाबदार आहोत या भावनेने ते खचले आणि त्यातच ते गेले. जे झाले त्यात तुमचा काही दोष नव्हता उलट तुमचा उद्देश चांगलाच होता. सात्विकला बालसुधार गृहात पाठवण्यामागे तुम्ही होतात हे तर आमच्या ध्यानीही नव्हते. इतकेच काय आम्ही तुम्हाला ओळखतही नव्हतो. तुमचे झालेले नुकसान तर मी भरून नाही देऊ शकत पण अजुन नुकसान होऊ नये म्हणुन प्रयत्न जरूर करू शकते आणि या कामी मला तुमच्या मदतीची फार गरज आहे. तुमच्या कुटुंबाबरोबर माझ्या कुटुंबाचाही जीव धोक्यात आहे त्यामुळे आपल्याला एकत्र मिळूनच या समस्येवर मार्ग काढायला हवा”. सत्यजितनेही आपल्या भावाच्या कृत्याबद्दल भगवानदास आणि राधाबाईंची माफी मागितली. जे झाले ते झाले, माझ्या मुलामुळे तुला तुझा भाऊ आणि तुझ्या आईला आपला मुलगा गमवावा लागला आहे. त्यामुळे तुम्हीही आम्हाला माफ करा. कृपा करुन तुझ्या भावाने सुरु केलेले हे सुडचक्र तु पुढे सुरु ठेऊ नयेस अशी माझी तुला हात जोडून विनंती आहे म्हणत भगवानदासांनी खरोखरच सत्यजित समोर हात जोडले. त्यांचे जुळलेले हात तसेच आपल्या हातात धरून सत्यजितने पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना मिठी मारली. तशा राधाबाईही सुलोचना बाईंना बिलगल्या. छोटा रोहित आपल्या निरागस डोळ्यांनी हा भावुक प्रसंग पाहात होता.

जाधव साहेबांना फोन करुन त्या बाबाची पुन्हा एकदा मदत घेण्याचा सल्ला महादेवाने भगवानदासांना दिला. महादेवाचा सल्ला मनाला पटताच लगेचच भगवानदासांनी इन्स्पेक्टर जाधवांना फोन केला आणि आपला मनसुबा सांगितला व काम झाल्यावर तुम्हाला आणि त्या बाबाला तुमच्या कामाचा योग्य तो मोबादला मिळेल हे सांगावयास ते विसरले नाहीत. हे सर्व होईपर्यंत रात्रीचे नऊ वाजुन गेले होते. रोहित राधाबाईंच्या मांडीवरच झोपी गेला होता. ते पाहुन भगवानदासांनी ‘उद्या सकाळी लवकर तयार राहा आम्ही गाडी घेऊन येतो; आपल्याला तातडीने मुंबईकडे रवाना व्हायचे आहे’ असे सांगितले. ते वळतात तोच सत्यजितने भगवानदासांना घरी परतण्यात धोका आहे तेव्हा आजची रात्र इथेच काढुन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळेजण इथुनच मुंबईला निघणे योग्य होईल असे सांगितले. सत्यजितच्या म्हणण्याला सुलोचना बाईंनी पण दुजोरा दिला. तेवढ्यात जेवणाची पाने तयार असल्याचे सांगत महादुही आला. भगवानदासांनी राधाबाईंकडे पाहिले तर त्या आणि सत्यजित एकमेकांच्या चेहऱ्याकडेच पाहात होते. क्षणभर वाट पाहुन, ‘चला सुनबाई! झाले असेल तर जेवायला बसुया’! असे सुचक वाक्य म्हणत भगवानदासांनी मिशीतल्या मिशीत हसत महादुच्या मागोमाग चालण्यास सुरवात केली. आपल्या फजितीवर राधाबाई पुरत्या ओशाळल्या. सत्यजितने पुढे होत रोहितला उचलुन घेतले आणि राधाबाईंकडे पाहात एक स्मित करत, “चला जेवून घेऊया” म्हणाला. राधाबाई ‘हो’ म्हणत त्याच्याकडे पाहत प्रथमच लाजुन गोड हसल्या आणि त्याच्याबरोबर किचनच्या दिशेने चालु लागल्या. दोघांमधला मुक संवाद सुलोचना बाईंनी आपल्या अनुभवी नजरेने टिपला होता. स्वत:शीच काही विचार करत त्या कामाला लागल्या.