सुडचक्रभेद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१५

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha - Page 8

सत्यजितची ‘आई’ ही हाक सुलोचना बाईंच्या कानात शिरली. वळुन पाहतात तर सत्यजित कोमातुन बाहेर आला होता. त्यांनी त्याला छातीशी घट्ट धरले. सर्वांच्याच डोळ्यातुन आनंदाश्रु पाझरु लागले.

जेवण उरकुन सुलोचना बाई वामकुक्षी घेत आपल्या खोलीत पडल्या होत्या अचानक “आई” या हाकेने त्या जाग्या झाल्या. आवाज सात्विकचा वाटल्याने त्या चटकन उठून बसल्या. पाहतात तर सत्यजित त्यांच्या पायापाशी बेडजवळ ऊभा होता. त्याला पाहाताच त्यांना खुप आनंद झाला. त्याला प्रेमाने मिठी मारत त्या म्हणाल्या, “चमत्कारच म्हणायचा, गावी आलो आणि लगेचच तु कोमातुन बाहेर आलास”. आई, मी सत्यजित नाही सात्विक आहे. सात्विकचा आवाज कानात शिरताच त्या सत्यजितच्या मिठीतून दूर झाल्या आणि विस्मयाने त्याच्याकडे पाहु लागल्या. सात्विकचा आत्मा सत्यजितच्या शरीरातून बोलत होता. “तुम्ही इथे आल्याचे जाणवताच मी तुम्हाला भेटायला आलोय. तु अजिबात काळजी करू नकोस मी त्या रूबीचा पुरता बंदोबस्त करेन. ती परत तुम्हाला त्रास नाही देणार. मी सत्यजितच्या शरीरातून बाहेर पडल्यावर तो कोमातुन बाहेर येईल. त्या भगवानदासाला पण मला धडा शिकवायचाय. त्याचं पुरं खानदान नष्ट केल्याशिवाय मला मुक्ती नाही मिळणार. येत्या अमावस्येला माझी शक्ती इतकी वाढेल की मला कोणीच रोखु शकणार नाही”. सुलोचना बाईंनी विचारले कोण रूबी? ‘तिच, जिने सत्यजितला मारायचा प्रयत्न केला आणि तुम्ही येताना तुमची गाडी अडवली होती’. सात्विकच्या आवाजातुन राग व्यक्त होत होता. “पण तु तिला कसा ओळखतोस आणि ती आमच्या जीवावर का उठली आहे? आणि ती असं का म्हणाली की तुझ्या मोठ्या मुलाचा बदला मी तुम्हा दोघांना मारून घेईन? काय केलस तु तिच्या बरोबर? आणि भगवानदासांसारख्या देवमाणसानी काय बिघडवले रे तुझे? हा नक्की काय प्रकार आहे सात्विक? जिवंतपणी काय कमी छळलस जो मेल्यावरही आम्हाला त्रास देत आहेस? तुझ्यामुळे तुझे बाबा गेले, मग तुही गेलास आता माझ्या सत्त्याला पण माझ्यापासून दूर कर, मी एकटी मागे राहुन तरी काय करू? माझाही जीव घे म्हणजे समाधान मिळेल तुझ्या आत्म्याला”! सुलोचना बाईंच्या या प्रश्नांवर उत्तरादाखल एक फ्लॉवर पॉट वेगाने भिंतीवर जाऊन आदळला आणि त्याच्या ठिकऱ्या उडाल्या. अचानक सत्यजित खाली कोसळला. फ्लॉवर पॉट फुटल्याच्या आवाजाने जागे झालेले महादु आणि रखमा धावतच सुलोचना बाईंच्या खोलीत आले. महादुच्या मदतीने सत्यजितला उचलून बेडवर ठेवल्यावर रखमाने फ्लॉवर पॉटचे तुकडे गोळा केले आणि सर्वजण बाहेर जाण्यासाठी वळले तोच, सत्यजितची ‘आई’ ही हाक सुलोचना बाईंच्या कानात शिरली. वळुन पाहतात तर सत्यजित कोमातुन बाहेर आला होता. त्यांनी त्याला छातीशी घट्ट धरले. सर्वांच्याच डोळ्यातुन आनंदाश्रु पाझरु लागले. रखमा आणि महादुही त्या आनंदोत्सवात सामील झाले.

सुलोचना बाईंचा निरोप घेऊन भगवानदास आणि राधाबाईं आपल्या घरी परतले पण दरवाजातून आत पाऊल टाकताना सात्विकने ‘आज काय वाढुन ठेवलय देव जाणे’ हा विचार दोघांच्या मनात थोडी भिती उत्पन्न करुन गेला. तसे सात्विकच्या बंदोबस्तासाठी गावातील भगत आला होता पण त्याला काही यश आले नाही उलट सात्विकचे प्रताप आणि वाढले होते. मन घट्ट करुन त्यांनी आत प्रवेश केला. दुपारचे जेवण करुन घरातील सर्वजण थोडे सुस्तावले होते, तोच फोनच्या घंटीने सगळ्यांची झोप चाळवली. “कोणी सुलोचना म्हणुन बाई आहेत फोनवर तुमच्याशी काहीतरी अर्जंट बोलायचे आहे म्हणाल्या” रामाचे हे वाक्य ऐकताच भगवानदास गडबडीने उठले. फोनवर ते फक्त ऐकत होते, आम्ही लगेचच निघतो म्हणुन त्यांनी फोन ठेवला. भगवानदासांनी राधाबाईंना रोहितला पटकन तयार करुन बाहेर घेऊन येण्यास सांगुन महादेवलाही फोन करुन लगेच घरी येण्यास सांगितले. भगवानदासांची कार सुलोचना बाईंच्या घरासमोर थांबली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. महादुच्या मागे उभ्या असलेल्या सत्यजितशी राधाबाईंची नजरानजर झाली आणि नकळत दोघांची नजर एकमेकांत गुंतली पण क्षणभरच. ‘माफ करा मी आपल्याला असे तातडीने बोलवले पण विषय खुप महत्वाचा आहे म्हणुन नाईलाज झाला’ म्हणत सुलोचना बाईंनी आपली दिलगिरी व्यक्त केली. सकाळी तर सत्यजित कोमात होता आणि आता आपल्या समोर चक्क ऊभा आहे याचे राधाबाई आणि भगवानदास दोघांनाही मोठे नवल वाटले. सत्यजितच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली असता आधी चहा तर घ्या, मग आपण सविस्तर बोलुच म्हणत सुलोचना बाईंनी महादुला सर्वांना चहा देण्यास सांगितले.

“तुम्ही सात्विक कुलकर्णीला ओळखता का”? सुलोचना बाईंच्या या प्रश्नाने भगवानदासांना एक जोराचा ठसका लागला. उबळ शांत झाल्यावर भगवानदास म्हणाले, “हो! पण तुम्ही हा प्रश्न विचारण्या मागचे कारण नाही समजलो”. “सात्विक माझा मोठा मुलगा, तो आता हयात नाही”, या सुलोचना बाईंच्या वाक्याने भगवानदास आणि राधाबाईंना मोठा धक्काच बसला. दुपारी घडलेला सर्व प्रसंग सुलोचना बाईंनी त्यांना सांगितला, घरात क्षणभर शांतता पसरली. सुलोचना बाईं पुढे म्हणाल्या, “सात्विकचा आत्मा माझ्या सत्यजितच्या शरीरातून बाहेर पडला आणि सत्यजित कोमातुन बाहेर आला ही एक चांगली गोष्ट घडली पण सात्विक तुमच्या जीवावर का उठलाय ते मला नाही समजले. येत्या अमावस्येला तो काहीतरी विलक्षण करणार आहे म्हणाला. तुम्हाला सावध करण्यासाठी म्हणुन मी तातडीने बोलावुन घेतले कारण परवाच अमावस्या आहे”.