सुडचक्रभेद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१५

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha - Page 7

...म्हणतात ना त्या विधात्याच्या मनात काय चालले आहे हे आपण सामान्य माणसे नाही जाणु शकत!

चौथ्या वेळेसही सत्यजित आपल्या हातुन वाचल्यामुळे रूबी जाम चवताळली होती. आता तर ते तिच्या सीमेच्या बाहेर निघुन गेले होते त्यामुळे असहाय्यपणे ती नुसती धुसफुसत होती. तिच्या बंगल्याच्या भग्नावशेषांजवळ जेव्हा सत्यजित अपघातानेच आपल्या मित्रांसह गेला होता तेव्हा तिच्याकडे सात्विकचा सुड उगवायची आयती संधी सत्यजितच्या रुपात चालून आली होती. आपल्या सौंदर्याची मोहिनी सत्यजित वर टाकण्यात ती यशस्वी झाली होती पण दोन वेळा अमर आणि सुलोचना बाईंमुळे तो वाचला होता. तिसऱ्यावेळी ती यशस्वी होणार इतक्यात सुलोचना बाई बेडरूममध्ये आल्याने तिचा तोही डाव फसला होता आणि आता तर सुलोचना बाईंनी भीती दूर सारुन तिच्या विरुद्ध दंड थोपटले होते त्यामुळे ती सुडाच्या आगीत ऊभी जळत होती. जिवंत असताना अप्सरेला लाजवेल अशी ती रूपगर्विता आज मृत्यूनंतर सुडाने पेटलेली एक जखिण बनुन आपल्या बंगल्याच्या भग्नावशेषांजवळ सत्यजितच्या परतण्याची वाट पाहु लागली.

रात्री साधारण आठ वाजता ते चौघे आपल्या गावी पोहोचले. रखमाने सर्वांसाठी रूचकर स्वयंपाक बनवला होता पण सर्वजण प्रचंड तणावाखाली असल्यामुळे जेमतेम दोन-तीन घास पोटात ढकलुन झोपायला गेले. लाडक्या सत्यजितची ती अवस्था पाहुन रखमा आणी महादुच्याही घशाखाली घास उतरला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यजितला गावातील हॉस्पिटल मध्ये चेकपसाठी सोडुन सखाराम नर्स सोबत मुंबईला रवाना झाला. म्हणतात ना त्या विधात्याच्या मनात काय चालले आहे हे आपण सामान्य माणसे नाही जाणु शकत! आपल्या सुन आणि नातवाला घेऊन भगवानदासही त्याच दिवशी हॉस्पिटल मध्ये आले होते. रोहित आता पुर्ण बरा झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच तिघांच्याही चेहऱ्यावर हसु फुलले. डॉक्टरांना धन्यवाद देत ते त्यांच्या केबिन मधुन बाहेर पडले. ते आपल्या कारमधे बसायला जाणार तोच रोहितची नजर चेकअप संपवून महादुची वाट पाहात उभ्या असलेल्या सुलोचना बाईं आणि व्हिलचेअर वर बसलेल्या सत्यजितवर पडली. त्याला काय वाटले कुणास ठाऊक तो धावतच त्यांच्या जवळ गेला आणि त्यांची विचारपुस करू लागला. त्या गोंडस आणि चुणचुणीत मुलाला आपली आपुलकीने चौकशी करताना पाहुन आज आपला नातू असता तर याच्या एवढाच असता असे सुलोचना बाईंच्या मनात येऊन गेले. सात्विकच्या आठवणीने त्यांचे डोळे भरले. त्यांना पदराने डोळे पुसताना पाहुन भगवानदास आणि राधाबाई त्यांच्याजवळ आले. व्हिलचेअर वर बसलेल्या सत्यजितला पाहुन दोघांनाही गोपाळरावांची आठवण आली आणि नकळत त्या दोघांचेही डोळे भरले.

भेटीची सुरवात एकदम भावुक झाल्यामुळे दोन्ही कुटुंबाना एकमेकांबद्दल आपलेपणा वाटला. भगवानदासांनी स्वत:हुन सुलोचना बाईंना घरापर्यंत लिफ्ट देण्याची तयारी दर्शवली. ‘चला ना आजी’! म्हणत छोट्या रोहितनेही लकडा लावल्यामुळे सुलोचना बाईंनी पण फार आढेवेढे न घेता होकार दिला. हॉस्पिटलच्या ब्रदरनी (पुरुष नर्स) सत्यजितला कार मधे बसवण्यास मदत केली. महादुला फोन करुन न येण्यास सांगुन त्या कारमध्ये बसल्या. गावात नवीन दिसता, या आधी कधी पाहिल्याचे आठवत नाही! भगवानदास म्हणाले. आम्ही इथलेच पण गेली नऊ दहा वर्ष मुंबईत वास्तव्याला आहोत. काल रात्रीच आलोय. हा माझा मुलगा सत्यजित, Ph.D करतोय आणि खाजगी शिकवण्याही घेतो मुंबईत. सुलोचना बाई उत्तरल्या. पण हे असे झोपलेले का आहेत? काय होतय त्यांना? राधाबाईंचा काळजीयुक्त प्रश्न ऐकुन भगवानदासानी चमकुन त्यांच्याकडे पाहिले तशा त्या वरमल्या. नकळत सुलोचना बाईंचे डोळे भरले. ते पाहुन सर्वच गप्प झाले. घर जवळ येताच सुलोचना बाईंनी सर्वांना चहाचे आमंत्रण दिले. त्याचा स्विकार करत सर्वजण घरात आले. महादुने सत्यजितला उचलून घरात नेले. रखमाने दिलेला चहा प्यायल्यावर राधाबाईंनी न राहवुन परत सत्यजितची चौकशी केली तेव्हा सुलोचना बाईंनी सत्यजित वर बेतलेल्या प्रसंगाचे सव्विस्तर वर्णन केले. ते ऐकुन राधाबाई आणि सुलोचना बाईंचे आभार मानत निरोप घेतला. घराबाहेर पडताना अचानक भगवानदासांना कोणीतरी धक्का मारल्यासारखे जाणवले क्षणभर ते धडपडले पण राधाबाईंनी त्यांना सावरले. सात्विकचा विचार त्यांच्या मनात चमकुन गेला तशी भगवानदासांच्या शरीरातून एकदम एक थंड शिरशिरी उमटली पण तसे काही न दर्शवता, `भेटु परत! काही मदत लागली तर संकोच न बाळगता फोन करा' म्हणत ते घराकडे मार्गस्थ झाले.