सुडचक्रभेद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१५

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha - Page 6

सत्यजितच्या बेडरूमचा दरवाजा उघडुन सुलोचना बाई पाणी घेऊन आत आल्या आणि आपल्या मुलाचा छताडावर बसुन त्याचा गळा आवळणाऱ्या त्या भयंकर जाखिणीला पाहुन त्यांची बोबडीच वळली...

सत्यजितच्या बेडरूमचा दरवाजा उघडुन सुलोचना बाई पाणी घेऊन आत आल्या आणि आपल्या मुलाचा छताडावर बसुन त्याचा गळा आवळणाऱ्या त्या भयंकर जाखिणीला पाहुन त्यांची बोबडीच वळली, त्या दरवाज्यातच गोठून गेल्या. सुलोचना बाईंना पाहाताच तिने सत्यजितला सोडले आणि वेगाने त्यांच्यावर झडप घेतली. सुलोचना बाईंना आठ दहा फुट दूर उडवून हिडीस हास्य करत मुख्य दरवाज्यातून ती आरपार निघुन गेली. त्यांच्या हातातील तांब्या जाऊन टिपॉय वर पडल्याने मोठा आवाज करत त्याच्यावरील काच फुटली. सुदैवाने सुलोचना बाई सोफ्यावर पडल्या त्यामुळे त्यांना फारसे काही लागले नाही पण मोठा झटका बसल्याने मानेचे आणि कंबरेचे स्नायु चांगलेच दुखावले होते. कसेबसे त्या धक्क्यातून सावरत त्या उठुन उभ्या राहतात तोच बेल वाजली. लंगडत लंगडत त्यांनी दरवाजा उघडला. पाहतात तर दारात मोठ्या आवाजामुळे जागे झालेले आजु बाजुचे शेजारी जमा झाले होते. काय झाले? कसला आवाज झाला? या त्यांच्या प्रश्नावर ‘सत्यजित’! एवढे बोलुन त्या बेशुद्ध झाल्या. काही बायकांनी त्यांना सावरले. पुरुष मंडळी आत जाऊन पाहिले तर त्यांना सत्यजित जमिनीवर निचेष्ट पडलेला आढळला. काही जण त्या दोघांना जवळच्या हॉस्पिटलमधे घेऊन गेले. डॉक्टरांनी सत्यजितला लगेचच CPR दिला, परंतु मेंदुला काही वेळासाठी ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्यामुळे तो कोमामधे गेला होता. त्याला सर्व कळत होते पण त्याचे शरीर कोणताही प्रतिसाद द्यायला असमर्थ होते. डॉक्टरनी सांगितले की हा पुढच्या मिनिटाला पण कोमातुन बाहेर येऊ शकतो किंवा काही वर्ष पण लागू शकतात, नक्की किती वेळ लागेल हे सांगणे अवघड आहे.

घडल्या प्रकाराने सुलोचना बाई एवढ्या धास्तावल्या की त्यांनी आपल्या मुलाला घेऊन गावी जाण्याचा निर्णय घेतला. फोन करुन त्यांनी महादुला आपण सत्यजितसह गावी येत असल्याचे कळविले. मुळातच लाघवी असलेल्या सत्यजितला त्याच्या लहानपणी अंगाखांद्यावर खेळवले असल्यामुळे महादु आणि रखमा या निपुत्रिक दांपत्त्याचा त्याच्यावर खुप जीव होता. मालकीण बाई आणि सत्यजित येणार हे कळल्यावर साफसफाई करुन त्यांनी घर आरशासारखे लख्ख केले. घरात लागणारा सर्व जिन्नस भरून ते त्यांची वाट पाहू लागले. ट्रॅफिकचा त्रास वाचावा म्हणुन सत्यजित आणि एका नर्सला सोबत घेऊन सुलोचना बाई भल्या पहाटे एका अ‍ॅमब्युलंस मधुन गावी निघाल्या. पहाटेच्या गार वाऱ्यामुळे त्यांच्या डोळ्यावर झापड येऊ लागली होती. बसल्या बसल्याच त्या डुलकी घेऊ लागल्या. गाडी मुंबईतुन बाहेर पडणार इतक्यात ड्रायव्हरने करकचुन ब्रेक लावल्यामुळे त्यांचे डोके डॅशबोर्ड वर दाणकण आपटले. मेंदुला झिणझिण्या आल्या होत्या. आधारासाठी पट्टा लावलेला असुनही त्यांच्या मानेला एक जोराचा हिसडा बसला. सत्यजितला व्यवस्थित बांधले असल्यामुळे सुदैवाने तो खाली पडला नाही. पण त्याच्या जवळ बसलेली बेसावध नर्स मात्र ड्रायव्हर शेजारील सीटवर चांगलीच आपटली. कपाळ चोळत सुलोचना बाईंनी ड्रायव्हरकडे काय झाले म्हणत पाहिले. तो नखशिखांत थरथरत होता. उत्तरादाखल त्याने फक्त समोर बोट दाखवले. सुलोचना बाईंनी त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिले आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

रस्ता अडवुन ती गाडीसमोर तरंगत होती. सुलोचना बाईंकडे पाहात ती दात विचकुन कुत्सित हसली. “भाग रही हो? तुम मुझसे बच नही सकती। मैं तुम्हारे बडे बेटेका बदला तुम्हे और तुम्हारे छोटे बेटेको मारकर लुंगी। तिन बार वो मुझसे बच गया था मगर इस बार नही बचेगा। तुम यहाँसे आगे नही जा सकती। तुम्हे मरना होगा”। असे कर्कश आवाजात म्हणत ती खदाखदा हसु लागली. ते ऐकुन सुलोचना बाईंचे तर हातपायच गार पडले. नर्स मागुन ओरडली, ‘सखाराम! गाडी पळव’. त्याबरोबर भानावर आलेल्या ड्रायव्हरने एक्सीलरेटर दाबला पण अ‍ॅमब्युलंसची पुढची चाके जणू लॉक झाली होती, मागची चाके जोरात फिरत असल्यामुळे अ‍ॅमब्युलंस डावी उजवीकडे नाचु लागली होती. तो प्रकार पाहुन मागुन येणाऱ्या तुरळक गाड्यानी आपला मार्ग बदलला. भीतीने घसा कोरडा पडलेल्या सुलोचना बाई मनात आपल्या कुलदेवतेचा धावा करत होत्या. डॅशबोर्ड वर लावलेल्या हनुमानाचा फोटो नजरे समोर पडताच त्या हनुमानचालीसा म्हणु लागल्या त्याबरोबर परिस्थितीत फरक पडु लागला. त्या जखिणीची ताकद कमी पडु लागली हे लक्षात येताच त्यांची हिंमत वाढली. मुलाच्या प्राणांच्या रक्षणासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ती माऊली गाडीतून खाली उतरली आणि सोबत आणलेले पवित्र गंगाजल त्यांनी त्या जखिणीवर शिंपडले त्याबरोबर भयाकारी किंचाळत ती तिथुन नाहीशी झाली. थोडे गंगाजल अ‍ॅमब्युलंस वर शिंपडून त्या पटकन आत शिरल्या आणि अ‍ॅमब्युलंस वेगाने मार्गस्थ झाली. झाल्या प्रकाराने सर्वच जण शॉक मधे होते. हा सर्व प्रकार जेमतेम पाच सात मिनिटांत आटपला होता पण त्याचा परिणाम इतका जबरदस्त होता की तासभर कोणीही काहीच बोलले नाही. सुलोचना बाईंनी सत्यजितकडे पाहात मोठ्या संकटातून वाचवल्याबद्दल मनोमन कुलदेवतेचे आभार मानले. अ‍ॅमब्युलंस वेगाने एक एक गाव मागे टाकत होती जणु आतील लोकांसारखीच तिलाही घरी पोहोचायची घाई लागली होती.