सुडचक्रभेद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१५

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha - Page 5

पाणी पिण्यासाठी उठलेल्या सुलोचना बाईंनी सत्यजितला दरवाजा उघडुन जिन्याने वर जाताना पाहीले आणि तो कुठे जातोय ते पाहायला त्याच्या मागोमाग त्याही वर आल्या होत्या. आज सत्यजित दोन वेळा नशिबानेच वाचला होता.

घरी पोहोचल्यावर काही न बोलता सत्यजित झोपायला गेला. अंथरुणावर पडल्यावर परत तिचा सुंदर चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. तिच्या विचारात कधी डोळा लागला ते त्याला कळलेच नाही. थोड्याच वेळात तो गाढ झोपी गेला. साधारण दोन वाजले असतील. खिडकीतून येणाऱ्या थंड झुळुकीने सत्यजितला जाग आली. सहज त्याची नजर गेली तर ती खिडकीत उभी होती. चंद्राच्या प्रकाशात तिचे सौंदर्य अधिकच खुलुन दिसत होते. भारल्यासारखा तो तिच्याकडे पाहात होता. मादक हसत ती तिथुन दुर गेली. त्याबरोबर अंगावरील पांघरुण दुर करुन त्याची पाऊले दरवाज्याकडे वळली. दरवाज्याच्या कड्या उघडुन तो बाहेर आला तर त्याला ती जिन्याच्या पायऱ्यांवर उभी असलेली दिसली. तो बाहेर आलेला पाहताच ती वळली आणि पायऱ्या चढत वर जाऊ लागली. सत्यजित तिच्या पाठोपाठ जिना चढुन टेरेसवर आला. ती कठड्यावर उभी राहुन त्याला बोलवत होती. तो तिच्या दिशेने जाऊ लागताच ती हवेत तरंगत इमारतीपासून दुर जाऊ लागली. सत्यजित कठड्यावर चढला आणि पुढे पाऊल टाकणार इतक्यात सुलोचनाबाईंनी त्याला हाताला धरून मागे खेचले. सत्यजित टेरेसवर कोसळला तशी ती गायब झाली. पाणी पिण्यासाठी उठलेल्या सुलोचना बाईंनी सत्यजितला दरवाजा उघडुन जिन्याने वर जाताना पाहीले आणि तो कुठे जातोय ते पाहायला त्याच्या मागोमाग त्याही वर आल्या होत्या. आज सत्यजित दोन वेळा नशिबानेच वाचला होता.

सकाळपासुन सत्यजितला ताप होता. दोन वेळा सणकुन आपटल्यामुळे त्याचे अंग चांगलेच ठणकत होते. तापात तो सतत बरळत होता, ‘मला ती बोलवतेय, मला तिच्याकडे जायचय’. सुलोचना बाई त्याच्या कपाळावरच्या मिठाच्या थंड पाण्यात भिजवलेल्या घड्या बदलत असतानाच अमर तिथे आला. सत्यजितला तश्या अवस्थेत पाहुन, काय झाले याला? असे म्हणत सत्यजितच्या गळ्याला हात लावुन ताप किती आहे ते बघितले. सत्यजित चांगलाच तापला होता. सलोचनाबाईंनी रात्रीच्या प्रकाराबद्दल त्याला सर्व काही सांगितले. ते ऐकल्यावर अमरने आदल्या दिवशी संध्याकाळी पडक्या बंगल्यापाशीचे सत्यजितचे विचित्र वागणे तसेच रात्री रस्त्याच्या मधुन चालण्याच्या प्रसंगाबद्दल सगळे काही तपशीलवार त्याच्या आईला सांगितले. सत्यजीतच्या या विचित्र वागण्याने सुलोचनाबाईंना चिंतेने ग्रासले. आधी नवरा आणि मग नुकताच मोठा मुलगा गमावल्यामुळे आजकाल सत्यजितसाठी त्या थोड्या जास्तच हळव्या झाल्या होत्या. त्याला साधी शिंक जरी आली तरी त्यांचा जीव वरखाली होत असे. आदल्या रात्रीपासुन सुरु झालेल्या विचित्र घटनांमुळे त्यांना सत्यजितची जास्तच काळजी वाटु लागली होती. दिवसभर सत्यजितचे बरळणे सुरूच होते. डॉक्टर तपासुन औषधे देऊन गेले होते पण त्याने फारसा फरक पडलेला दिसत नव्हता. रात्री मायलेक उपाशीच झोपी गेले.

साधारण तीन वाजता ती पुन्हा खिडकीपाशी आली. सत्यजितला हाका मारू लागली पण सत्यजित खुप अशक्त झाला होता त्यामुळे त्याच्यात उठायचे त्राण पण उरले नव्हते. तो बाहेर येत नाही हे लक्षात येताच बंद दरवाज्यातून आरपार जात तरंगतच ती त्याच्या जवळ आली. तो भान हरपुन तिच्या डोळ्यात एकटक पाहात होता जणू तिचे लावण्य तो आपल्या डोळ्यांनी पित होता. आपल्या मादक अदांनी ती त्याला घायाळ करू लागली. त्याच्या रुंद छातीवर फिरणारे तिचे हात हळुहळु वर सरकु लागले. त्याच्या गळ्याभोवती तिच्या हातांची पकड अधिकाधिक घट्ट होऊ लागली. सत्यजितला श्वास घेणे जड होऊ लागले आणि तो खोकु लागला. त्या आवाजाने सुलोचना बाई जाग्या झाल्या. इकडे तिच्या चेहऱ्यावरचे मादक भाव नाहीसे होऊन त्यांच्या जागी हिंस्त्र भाव आले होते. तिचा सुंदर चेहरा आता बिभत्स आणि भयानक दिसु लागला होता. अस्ताव्यस्त पसरलेल्या केसांमुळे तिच्या भयानकतेत भरच पडत होती. प्रमाणबद्ध, सुंदर आणि रेखीव शरीर बदलुन जळल्या सारखे काळे आणि विद्रुप दिसु लागले होते आणि त्याला सडल्यासारखी घाण येऊ लागली होती. पुर्ण ताकदीने ती सत्यजितचा गळा आवळु लागली. सत्यजितचे डोळे फिरू लागले होते. शरीरातील सर्व शक्ती गेल्यासारखा तो मलुल पडुन होता आणि गळ्यावर वाढत्या दबावाबरोबर हळुहळु मृत्यु त्याच्या समीप येत होता.