सुडचक्रभेद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१५

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha - Page 4

सात्विकने गोपाळरावांचा लुबाडलेला पैसा तो स्वत: बरोबर वर घेऊन जाऊ न शकल्यामुळे तो पण सत्यजितलाच मिळाला होता. एकंदर सत्यजित एक ऐशारामी आयुष्य जगु शकेल एवढा पैसा जवळ बाळगुन होता.

सुडाने पेटलेल्या सात्विकचा आत्मा भगवानदासांच्या घरात धुमाकुळ घालत असताना त्याच्या मुंबईतल्या घरात वेगळेच सुडनाट्य सुरु झाले होते. मुंबईतील त्याच्या 2 BHK फ्लॅटमधे त्याची विधवा आई सुलोचना आणि धाकटा भाऊ सत्यजित राहात होते. सत्यजित एक देखणा आणि तडफदार तरुण होता. कॉलेजमधुन मास्टर्स डिग्री घेतल्यावर आता Ph.D करत होता. फावल्या वेळात तो खाजगी शिकवण्या घ्यायचा. बऱ्यापैकी पैसे मिळायचे सोबत वडीलांची पेंशन होती. वडीलांच्या आणि भावाच्या विम्याचे पैसे मिळाले होते ते वेगळेच. सात्विकने गोपाळरावांचा लुबाडलेला पैसा तो स्वत: बरोबर वर घेऊन जाऊ न शकल्यामुळे तो पण सत्यजितलाच मिळाला होता. एकंदर सत्यजित एक ऐशारामी आयुष्य जगु शकेल एवढा पैसा जवळ बाळगुन होता. पण तो सात्विकच्या अगदी उलट स्वभावाचा होता. निर्व्यसनी, आईची काळजी घेणारा, मेहनती आणि परोपकारी वृत्तीचा एक चांगला मुलगा होता. एकदा शिकवणी आटपल्यावर मित्रांबरोबर सहज फिरायला म्हणुन तो मुंबईतील एकदम पॉश भागात गेला होता. सुंदर आणि टुमदार बंगले पाहुन आपला पण असा एखादा बंगला असावा असे नकळत त्याच्या मनात येऊन गेले. फिरता फिरता ते सर्व एका दगडविटांच्या ढिगाऱ्याने भरलेल्या मोठ्या खड्यापाशी आले. सर्वत्र जळल्याच्या खुणा दिसत होत्या. त्या आलिशान बंगल्याच्या मधोमध असलेल्या त्या ढिगाऱ्याला पाहुन सर्वांनाच आश्चर्य वाटले. काळोखही दाटत होता आणि सर्वांना एक प्रकारची उदासिनता पण जाणवु लागल्यामुळे तिथुन निघावे असे सर्वानुमते ठरले पण सत्यजितचे पाय तिथेच खिळले होते. भान हरपुन तो त्या ढिगाऱ्याच्या दिशेने पाहात होता.

अमरने त्याला हाताला धरून हलवले तसा तो भानावर आला. त्याची नजर परत त्या ढिगाऱ्याकडे वळली आणि नकळत त्याच्या तोंडुन शब्द निघाले, ‘वॉ, व्हॉट अ ब्युटी’! त्याबरोबर त्याचा मित्र अमर सत्यजितला वेड तर नाही ना लागले अशा नजरने त्याच्याकडे पाहात म्हणाला, “तु ठीक आहेस ना! या दगडविटांच्या ढिगाऱ्यात तुला ब्युटी दिसतेय? चल घरी जाऊ, उशीर होतोय”. त्याने सत्यजितला जवळ जवळ ओढतच नेले. चालताना पण सत्यजित सतत वळुन वळुन पाहात होता जणु तो पछाडला होता. रात्री त्याच्या आईने त्याला जेवायला ये म्हणुन तिन वेळा हाक मारली पण हा आपल्याच तंद्रित होता. जेवताना पण तीच गत. सुलोचना बाईंना थोडे विचित्र वाटले पण असेल काही म्हणुन त्यांनी दुर्लक्ष केले. रोजच्या सवयीने जेवण झाल्यावर सत्यजित शतपावली करायला खाली आला तेव्हा त्याला काळोखात एका बाकड्यावर ती एकटीच बसलेली दिसली. ही इकडे एवढ्या लांब कशी आली असा विचार करत असतानाच नकळत त्याची पावले तिच्या दिशेने वळली. तो जवळ जाताच ती उठली आणि चालु लागली, सत्यजित भुरळ पडल्यासारखा तिच्या मागे चालु लागला.

अमरने, ‘ए सत्त्या’! अशी हाक मारली पण ती हाक सत्यजितच्या कानापर्यंत पोहोचलीच नाही. तो तसाच तिच्या मागे चालत राहीला. हा असा भंजाळल्यासारखा कुठे निघाला? संध्याकाळपासुन याची लक्षणे काही ठीक नाही दिसत असे म्हणत अमर त्याच्या मागे हाक मारत चालु लागला. सत्यजित सोसायटीच्या गेट मधुन बाहेर पडुन आता मुख्य रस्त्यावर आला. अर्धा रस्ता पार केल्यावर उजवीकडे वळुन रस्त्याच्या मधोमध चालु लागला. मोठ्याने हॉर्न वाजवत “ए मरायचय काय रे” असे त्याच्या अंगावर खेकसत वाहनचालक त्याच्या बाजुने जाऊ लागले. समोरून एक मोठा ट्रक सुसाट वेगात येत होता तरी सत्यजित तसाच त्याच्या रोखाने जात होता. तो ट्रक त्याला चिरडणार इतक्यात अमरने त्याला बाजुला खेचले आणि तो ट्रकवाला कर्कश हॉर्न वाजवत सत्यजितला एक सणसणित शिवी हासडत त्याच वेगात निघुन गेला. तोल जाऊन दोघेही खाली पडले. कोपराला आणि गुडघ्याला खरचटुन रक्त आले होते तरी सत्यजित उठुन रस्त्याच्या दिशेने जाऊ लागला. रस्त्याच्या पलीकडे उभी राहुन ती त्याला बोलवत होती. अमरने त्याला मागे खेचले आणि एक खाडकन त्याच्या थोबाडीत लगावली. जशी सत्यजितची नजर तिला शोधत रस्त्यापलीकडे पोहोचली तशी ती हवेत विरघळुन गेली. भानावर आलेला सत्यजितचा हात आपल्या दुखऱ्या गालावर गेला. अमर, मी इथे कसा आलो? मी तर सोसायटीत होतो. तु इथे काय करतोस? माझा गाल का दुखतोय? तु माझ्याकडे असा काय बघतोस? अशा अनेक प्रश्नांनी त्याने अमरला भंडावून सोडले. त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत अमर सोसायटीच्या दिशेने चालु लागला. बुचकाळ्यात पडलेल्या सत्यजितची पावले पाठमोऱ्या अमरला गाठण्यासाठी वेगात पडु लागली.