सुडचक्रभेद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१५

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha - Page 3

सात्विक परत आलाय! भगवानदासांच्या तोंडुन अचानक आलेल्या या वाक्याने राधाबाईंचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला.

रात्री जेवण झाल्यावर भगवानदासांनी रोहितला झोपवून झाल्यावर राधाबाईंना काही महत्वाचे बोलायचे असल्यामुळे आपणास भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे राधाबाई हॉलमध्ये आल्या. झोपाळ्यावर चिंताक्रांत बसलेल्या आपल्या सासऱ्यांना पाहुन त्यांचे मन निरनिराळ्या शंकांनी ग्रासले. “काय झाले मामंजी”?. राधाबाईंच्या प्रश्नाने भगवानदास भानावर येत म्हणाले, “सुनबाई! रोहितच्या वाक्याने मी आज नखशिखांत हादरलो”. राधाबाई काही बोलणार तोच त्यांना हातानेच थोपवत ते पुढे म्हणाले, “तु हॉस्पिटलमध्ये होतीस म्हणुन तुला काही सांगितले नाही पण आता सांगणे मला गरजेचे वाटते. गोपाळचे वर्षश्राद्ध केल्यापासून घरात खुप विचित्र घटना घडु लागल्या आहेत. रोहितला हॉस्पिटलमध्ये भरती केल्याच्याच रात्री माझा डोळा लागतो न लागतो तोच शेरुच्या भुंकण्याने माझी झोप चाळवली. मी तो शांत व्हावा म्हणुन त्याला हाका मारू लागलो तसा त्याचे भुंकणे थांबले आणि विचित्र गुरगुरणे सुरु झाले. थोड्याच वेळात जमिनीवर नखे घासल्यासारखा आवाज येऊ लागला नंतर शेरू एकदाच मोठ्याने विव्हळला आणि शांत झाला. थकल्यामुळे मी उठण्याचा आळस केला आणि तसाच झोपुन गेलो. सकाळी जाग आल्यावर बेडवरून उतरण्यासाठी म्हणुन अंगावरचे पांघरुण बाजुला केले आणि पाहतो तर काय! गदगदलेल्या कातर स्वरात ते म्हणाले, आपला शेरू माझ्या बाजुला झोपला होता, पण कायमचा! असे वाटत होते कोणीतरी अजस्त्र ताकदीने त्याची मान पिरगळली होती, ती पुर्णपणे उलटी फिरली होती. या माझ्या हातांनी मी त्याला मुठमाती दिली” आणि ते एखाद्या लहान मुलासारखे रडु लागले. हे ऐकताच राधाबाईंचे पण डोळे भरले आणि त्यांच्या डोळ्यातुन टपटप आसवे गळु लागली. शेरुने सर्वांनाच जीव लावला होता. त्याचे जाणे घरातील एखाद्या व्यक्तीच्या जाण्याइतकेच दु:खदायक होते.

दु:खाचा भर ओसरल्यावर भगवानदास स्वत:ला सावरत म्हणाले, “त्याला बाहेर साखळीने बांधलेले असताना तो माझ्या अंथरूणात कसा काय आला काही कळले नाही. शेरुचा मृत्यु ही तर सुरवात होती. आपले एक कापड दुकान आगीत पुर्णपणे जळुन खाक झाले. आपल्या सुंदरी गायीने एका कालवडीला (स्त्री बछड़ा) जन्म दिला होता. तिला कोणीतरी काटेरी तारेने बांधले, त्यातुन सुटायच्या प्रयत्नात फास बसुन तिचा मृत्यु झाला. गंगु रात्री तिच्या खोलीत झोपली असताना दोन गड्यांना हलणारही नाही असे लोखंडाचे जड कपाट तिच्या अंगावर कोसळले, नेमकी त्याचवेळी कुस बदलल्यामुळे ती वाचली. थोड्याशा मुक्या मारावर निभावले. त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी सकाळी तुमचा डबा घेऊन घरातुन बाहेर पडतच होतो तेवढ्यात रस्त्यावरून सरळ जाणारी एक जीप अचानक आमच्या दिशेने आली आणि घराच्या चौथऱ्यावर इतक्या वेगाने आदळली की तिचा एक्सलच तुटला, महादेवाने वेळीच मला मागे खेचले नसते तर आज तुझा सासरा जिवंत नसता. त्या जीपच्या चालकाला विचारले की असा कसा साईड सोडुन या बाजुला आलास तर म्हणाला की मी तर बरोबरच जात होतो पण कोणीतरी गाडीचे स्टेअरिंग अचानक उजवीकडे फिरवल्याचे मला व्यवस्थित जाणवले”. हे सर्व ऐकुन राधाबाई सुन्नच झाल्या. हे सर्व काय घडतय आपल्या बाबतीत हेच त्यांना समजत नव्हते.

सात्विक परत आलाय! भगवानदासांच्या तोंडुन अचानक आलेल्या या वाक्याने राधाबाईंचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला. काय? त्यांचा प्रश्न घशातच अडकला. होय. आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटनांना तोच जवाबदार आहे. एक्सिडेंटच्या रात्री मी माझ्या रूममध्ये झोपलो होतो. साधारण दोन अडीच वाजले असतील, हवेत अचानक खुप गारवा आला होता, माझा बेड कोणीतरी एका बाजुने वर उचलुन वेगाने जमिनीवर आदळल्यासारखे मला जाणवले. मी जमिनीवर कोसळलो. सावरतो तोच मला माझा गळा कोणीतरी खुप ताकदीने आवळतय असे जाणवु लागले. माझ्या गळ्यावर हातांची पकड मला स्पष्ट जाणवली. मी घुसमटल्यामुळे त्या पकडीतुन सुटण्याचा प्रयत्न करू लागलो तेवढ्यात आवाज ऐकुन आलेल्या रामाने आपल्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ माझ्या अंगावर टाकल्याबरोबर माझ्या गळ्यावरील पकड सुटली पण अचानक रामा धाडकन भिंतीवर फेकला गेला. तो सावरतो न सावरतो तेवढ्यात त्याच्या चेहऱ्यात अमुलाग्र बदल झाला त्याच्या चेहऱ्याचा जागी सात्विकचा चेहरा दिसु लागला होता. रामाच्या तोंडुन सात्विक बोलला, की तो मृतांच्या जगातुन आपला सुड घेण्यासाठी परत आलाय आणि आपल्या कुटुंबातील माणसांपासुन पाळीव प्राण्यांपर्यंत एकालाही तो जीवंत सोडणार नाही. अर्धवट राहीलेला बदला पुर्ण केल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही. आपल्या रोहितच्या अंगावर गरम पाण्याची बादली त्यानेच उपडी केली होती. सुदैवानेच रोहित वाचला. आपण वेळीच त्याचा बंदोबस्त नाही केला तर आपल्यापैकी कोणीच वाचणार नाही हे नक्की. हे सर्व ऐकल्यावर राधाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली.