सुडचक्रभेद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१५

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha - Page 2

एक दिवस छोट्या रोहितला बाथरूममध्ये आंघोळीला बसवुन राधाबाई टॉवेल आणायला म्हणुन बेडरूममध्ये गेल्या आणि रोहितच्या किंकाळीने त्यांच्या हृदयात धस्स्‌ झाले. हातातील टॉवेल तसाच टाकुन त्या बाथरूमकडे धावल्या आणि क्षणभर दारातच थबकल्या. उकळत्या पाण्याने भरलेली बादली रोहितच्या अंगावर उपडी झाली होती आणि...

घरी आल्यावर विश्रांती घेत असताना पुन्हा एक वाऱ्याचा थंड झोत अंगावरुन गेल्यामुळे त्यांची निद्रा भंग झाली आणि झालेल्या प्रसंगावर ते विचार करू लागले. शेरुचे दरवाज्याकडे पाहत विचित्र गुरगुरणे, घाबरणे, वाऱ्याचा झोत आकस्मिकपणे आत शिरणे आणि त्यांना व शेरुला त्याने कस्पटासारखे उडवणे सगळेच अनाकलनिय वाटत होते. काहीच संदर्भ लागत नसल्याने शेवटी त्यांनी तो विचार झटकुन टाकला व झोपेच्या अधीन झाले. इतर कोणाच्याही लक्षात आले नसले तरी त्या इमानी प्राण्याने बरोबर ओळखले होते. भगवानदास परत येताना आपल्या सोबत काहीतरी अमंगळ आणि अमानवीय घेऊन आले होते. जे चांगले तर नव्हतेच पण भगवानदास आणि कुटुंबियांना त्रास देण्यासाठी आले होते आणि ते खुप ताकदवान होते. भगवानदासांवरील हल्ला ही त्या घरातील सदस्यांवर येऊ घातलेल्या संकटांची नांदीच होती. त्या दिवसानंतर घरात खुप विचित्र अनुभव येऊ लागले.

एक दिवस छोट्या रोहितला बाथरूममध्ये आंघोळीला बसवुन राधाबाई टॉवेल आणायला म्हणुन बेडरूममध्ये गेल्या आणि रोहितच्या किंकाळीने त्यांच्या हृदयात धस्स्‌ झाले. हातातील टॉवेल तसाच टाकुन त्या बाथरूमकडे धावल्या आणि क्षणभर दारातच थबकल्या. उकळत्या पाण्याने भरलेली बादली रोहितच्या अंगावर उपडी झाली होती आणि तो त्यामुळे गंभीर भाजला होता. त्याचे शरीर लाल लाल झाले होते आणि त्याच्या शरीरातुन वाफा निघत होत्या. राधाबाईंनी पटकन थंड पाण्याचा नळ सुरु करुन पाईपने त्याची धार रोहितच्या डोक्यावर धरली. लहानगा रोहित वेदनेने कळवळत होता त्याला राधाबाईंनी उचलुन छातीशी कवटाळले तसा तो प्राणांतिक वेदनेने किंचाळला व रडु लागला. राधाबाईंनी चमकुन पाहीले तर त्याच्या पाठीवरची कातडी निघुन त्यांच्या हातावर चिकटली होती. ते पाहुन त्यांचा जीव गलबलला आणि काय करावे ते न सुचल्यामुळे त्या ढसाढसा रडु लागल्या. रामा गड्याने फोनवर सगळा वृत्तांत भगवानदासांना कळवताच ते तातडीने डॉक्टरांना सोबत घेऊनच घरी आले. रोहित दुसऱ्या डिग्रीपर्यंत भाजला होता त्यामुळे डॉक्टरनी त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवायचा निर्णय घेतला. सगळ्यांचा लाडका असलेल्या रोहितची ती अवस्था घरातील नोकर माणसांपासुन सर्वांचेच काळीज हेलावून गेली.

हॉस्पिटलमध्ये रोहित सोबत राधाबाई थांबल्या होत्या आणि मदतीला शेवंता होतीच. भगवानदास रोज सकाळ संध्याकाळ जातीनं जेवणाचा डबा घेऊन येत असत, चौकशी करुन काय हवं नको ते पाहुन जात असत. दुकानाकडेही त्यांना लक्ष द्यावे लागत होते. पंधरा दिवसांच्या सेवा सुश्रुशेनंतर हळुहळु रोहितची त्वचा पुर्ववत होऊ लागली. त्याला पुर्ण बरे व्हायला महिन्याहुन जास्त कालावधी लागला. सुदैवाने तो लहान असल्यामुळे सर्व जखमा लवकर भरल्या आणि शरीरावर कुठेच व्रण राहीले नव्हते. स्पंज बाथ देताना होणाऱ्या गुदगुदल्यांमुळे रोहितच्या चेहऱ्यावर हसु येत असे ते पाहुन राधाबाईंच्या जीवाला खुप शांतता मिळत असे. इतके दिवस आपल्या प्राणप्रिय मुलाला भोगाव्या लागलेल्या यातनांबद्दल मनातल्या मनात त्या स्वत:लाच दोष देत होत्या. रोहितला डिस्चार्ज मिळाल्यावर त्या आपल्या सासऱ्यांना म्हणाल्या की माझेच चुकले. मी रोहितला बाथरूममध्ये एकटे सोडुन जायलाच नको होते. त्याने गरम पाणी अंगावर घेतले असणार आणि नको तो अनर्थ घडला. भगवानदास त्यांची समजुत घालणार इतक्यात त्यांच्या मांडीवर निजलेला रोहित पटकन म्हणाला की, “आई! मी तर पाण्याला हात पण लावला नव्हता, तु बाहेर गेल्यावर गरम पाण्याची बादली आपोआप हवेत वर गेली आणि सगळे पाणी माझ्या डोक्यावर सांडले. खरच तुझी शप्पथ”!. त्याचे ते उदगार ऐकताच भगवानदासांच्या अंगावर सरकन काटा आला. ‘चल, काहीही सांगु नकोस. तुच खोडी केली असणार म्हणुन भाजलास. बादली अशी हवेत आपोआप कशी काय वर जाईल? उगीच माझी खोटी शप्पथ घेऊ नकोस’, राधाबाई रोहितला दटावत म्हणाल्या. ‘अगं आई खरच!’ रोहित काकुळतीला येऊन म्हणाला. तसे “बरं बरं तसेच असेल जा खेळ जा”, म्हणत भगवानदासांनी विषयाला तिथेच पुर्णविराम दिला.