सुडचक्रभेद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१५

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha - Page 12

अर्ध्या तासात अमावस्या सुरु होणार होती आणि तो फक्त त्या क्षणाचीच वाट पाहत होता. अमावस्या सुरु झाल्यावर तो प्रचंड शक्तिशाली होणार होता आणि त्यानंतर तो बाबा त्याचे काहीच बिघडवू शकणार नव्हता.

सात्विक आपल्या शक्तींनी बाबाच्या घराबाहेरूनच तळघरात सुरु असलेला विधी पाहत होता. काही झाले तरी भगवानदासाचा बदला घ्यायचाच असा त्याने निश्चय केला होता. अर्ध्या तासात अमावस्या सुरु होणार होती आणि तो फक्त त्या क्षणाचीच वाट पाहत होता. अमावस्या सुरु झाल्यावर तो प्रचंड शक्तिशाली होणार होता आणि त्यानंतर तो बाबा त्याचे काहीच बिघडवू शकणार नव्हता. जस जसा वेळ सरू लागला तसतसा तो बाबा चिंतीत होऊ लागला कारण एकदा अमावस्या सुरु झाली की तो काहीच करू शकणार नव्हता. घाई करायला पाहिजे हे त्याने ताडले. तो सत्विकच्या आत्म्याचे आवाहन करू लागला तसा सात्विकचा आत्मा बाबाच्या तळघराकडे ओढला जाऊ लागला. तो आपला पुरा जोर लावत होता पण शेवटी बाबा आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्याला तळघरात आणण्यात यशस्वी झाला. या चढाओढीत पंधरा मिनिटे अजुन गेली आणि आता अमावास्या सुरु व्हायला फक्त पंधरा मिनिटे उरली होती. बाबाने सात्विकला बंधनात बांधले आणि रुबी समोर ठेवलेला पर्याय सात्विक समोर ठेवला पण सात्विक मानायला तयार नव्हता. उलट तो बाबालाच धमकी देऊ लागला की ‘माझ्या रस्त्यातून बाजुला नाही झालास तर मी तुला ठार मारेन आणि जर का मला सूड घ्यायला मदत केलीस तर तुला हवी असलेली शक्ती मिळवायला मी लागेल ती मदत करेन’. त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष करुन बाबाने आपली पुरी शक्ती पणाला लावली पण जस जसा वेळ सरत होता तास तशी सात्विकची ताकद वाढायला सुरवात झाली होती. शेवटी सात मिनिटे शिल्लक होती तेव्हा त्या बाबाने भगवानदासांना आता आपल्या हातातून वेळ निघुन चालली असुन आता जर का सात्विकचा बदला घेण्याच्या उद्देशाला आपण काट देऊ शकलो तरच यातुन वाचु शकतो कारण सात्विकला स्वत:हुन मुक्त व्हावेच लागेल आणि सर्वांचा जीव वाचेल नाहीतर तुमच्यासोबत मी सुद्धा वाचणार नाही असे सांगितले. त्या बरोबर सुलोचना बाईंची नजर घाबरलेल्या राधाबाईंना धीर देत असलेल्या सत्यजितवर पडली आणि त्यांच्या डोक्यात एक विचार चमकला की जर का सत्यजितचे राधाशी लग्न झाले तर दोन्ही घराण्यांचा एकमेकांशी संबंध जुळल्यावर वैर संपेल आणि वैरच नष्ट झाल्यावर सात्विक आपल्याच भावाच्या पत्नीचा आणि तिच्या नातेवाईकांचा खुन करण्याचा प्रश्नच उरत नसल्यामुळे त्याला मुक्त व्हावेच लागेल. सुलोचना बाईंनी हा विचार मांडताच भगवानदासांनी राधाबाईंकडे पाहीले. काय बोलावे ते न कळल्यामुळे त्या गप्पच बसल्या तेवढ्यात तो बाबा ओरडला,‘हेच योग्य होईल आता जास्त वेळ दवडू नका, मी याला अजुन बंधनात नाही ठेऊ शकत’. राधाने होकार देताच सत्यजितने द्रोणात ठेवलेल्या कुंकवाकडे आपला हात पुढे केला पण सात्विकने आपल्या सामर्थ्याने तो द्रोणच उडवून लावला आणि गरजला, ‘सत्यजित, मी तुला राधाशी लग्न करू देणार नाही. मी माझा सुड घेणारच’! असे म्हणत सात्विक गडगडाटी हास्य करू लागला. त्याबरोबर आता पुढे काय हा विचार करत असतानाच महादेवाने कोपऱ्यातील तलवारीकडे सत्यजितचे लक्ष्य वेधले. महादेवाला काय म्हणायचे आहे ते लक्षात येताच विजेच्या चपळाईने सत्यजित त्या तलवारीकडे झेपावला. तो काय करतोय हे सत्विकच्या लक्षात यायच्या आत सत्यजितने तलवारीवरून आपला उजवा अंगठा फिरवला आणि आपल्या रक्ताने राधाबाईंचा मळवट भरला. दुसऱ्याच क्षणाला अमावस्या सुरु झाली आणि सत्विकच्या डोक्यावर प्रकट झालेल्या दिव्य प्रकाशात तो ओढला गेला आणि पाहता पाहता गायब झाला. ते पाहताच सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

सात्विकसाठी सुलोचना बाईंचे डोळे भरले होते. कसाही असला तरी तो त्यांचा मुलगा होता. मृत मुलाच्या सुडापेक्षा जिवंत मुलाचे सुख आणि भगवानदासांच्या कुटुंबियांचा जीव त्यांना जास्त मौल्यवान वाटला. सात्विक आता मुक्त झाला असल्यामुळे तेही एक समाधान त्यांना मिळाले होते. नवपरिणीत दाम्पत्याने सुलोचना बाई, भगवानदास, महादेव आणि बाबाच्या पाया पडून त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. आपल्या सुनेच्या बेरंगी पांढऱ्या आयुष्यात सत्यजितच्या रुपात पुन्हा एकदा सुख नानाविध रंग घेऊन येणार आणि आपल्या नातवाला पुन्हा एकदा पित्याचे प्रेमळ छत्र लाभणार या विचाराने भगवानदास आंतरबाह्य सुखावले. त्याचवेळी आज आपली पत्नी हा दिवस पाहायला जिवंत हवी होती हा विचार त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या करुन गेला. माझा गोपाळ जिथे कुठे असेल तिथुन आशीर्वादच देत असेल असा विचार करुन त्यांनी आपले डोळे टिपले. बाबाने मंत्र म्हणुन रोहितला झोपेतुन जागे केल्यावर सत्यजितने त्याला उचलुन घेतले. भगवानदासांनी पुढे केलेले पैशाचे पाकीट नाकारुन बाबाने त्यांचे अभिनंदन करत ते लग्नात त्याच्या वतीने खर्च करण्यास सांगितले. शेवट गोड तर सगळे गोड या उक्तीला धरून, झाले गेले सर्व विसरून दोन्ही कुटुंबिय लग्नाच्या रितसर तयारीसाठी गावाकडे आनंदाने मार्गस्थ झाले. आशा तऱ्हेने दोन्ही कुटुबांच्या मिलनानेच त्या सुडचक्राचा भेद करणे शक्य झाले होते.

आमच्या सत्यजित आणि राधाच्या लग्नाला यायचं हं!

विषेश सुचना : आपल्या लाईक्स आणि कमेंट्स हाच आहेर.