सुडचक्रभेद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१५

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha - Page 11

आपल्या सौंदर्याच्या तालावर कितीतरी श्रीमंत धेंडांना तिने हवे तसे नाचवले होते पण आज त्या बाबासमोर ती अगदीच आगतिक वाटत होती. बाबाने आपल्या घनगंभीर आवाजात रुबीसमोर दोन पर्याय ठेवले.

पहाटेच्या गार वाऱ्यावर सर्वजण डुलक्या घेत असताना महादेवने त्यांची कार बाबाच्या घरासमोर थांबवली. इतका मोठा प्रवास करून आल्यामुळे सर्वांचेच अंग दुखत होते. पुऱ्या प्रवासात जेमतेम तीन वेळा त्यांनी गाडी थांबवली होती तीही नाईलाजाने कारण कितीही भीती असली तरी शरीरधर्म आजवर कोणाला चुकलाय? पण बाबाच्या मदतनीसाने त्यांना घाई करण्यास सांगितल्यामुळे अंग मोकळे करायचा विचार बाजूस सारून सर्वजण त्याच्या मागोमाग त्या तळघरातील गुप्त खोलीत गेले. बाबा त्यांची वाटच पाहत होता. त्याने सर्वांना तिथे आधीच बनवून ठेवलेल्या सुरक्षाचक्रात प्रवेश करण्यास सांगितले. जीव मुठीत धरून सर्वजण त्या रिंगणात आत शिरतात न शिरतात तोच रुबी भयानक हास्य करत तिथे प्रकटली त्याबरोबर बाबाने हातातील भस्म मंत्रुन रुबीच्या आत्म्यावर फेकले त्यामुळे ती एका अदृश्य बंधनात बांधली गेली. आपण पुरते अडकल्याची जाणीव होताच ती एकदम बेफाम झाली, बाबाला सोड म्हणु लागली. तिचा तो अवतार काळजाचा थरकाप उडवणारा होता. छोट्या रोहितचा विचार करून बाबाने मंत्राने त्याला वेळीच झोपवून टाकले होते. रुबी वेगाने वरखाली होऊ लागली. ती बाबाचा गळा पकडायचा प्रयत्न करू लागली तसे बाबाने तिच्यावरील बंधन अधिक आवळत तिच्या वर पुन्हा एकदा भस्म मंत्रुन फेकले त्याबरोबर तिचा रुद्रावतार शांत होवून भयंकर किंचाळत ती भेसूर रडू लागली. जिवंतपणी अप्सरेप्रमाणे सुंदर असणाऱ्या रुबीला खाविसाकडून मृत्यु प्राप्त झाल्यामुळे ती एक जखिण बनली होती. स्वत:च्या सौंदर्याचा तिला कोण गर्व होता! आपल्या सौंदर्याच्या तालावर कितीतरी श्रीमंत धेंडांना तिने हवे तसे नाचवले होते पण आज त्या बाबासमोर ती अगदीच आगतिक वाटत होती. बाबाने आपल्या घनगंभीर आवाजात रुबीसमोर दोन पर्याय ठेवले. एकतर तिने कुलकर्णी कुटुंबाचा सुड घेण्याचा विचार सोडुन द्यावा म्हणजे तो तिच्या मुक्तीसाठी प्रयत्न करेल आणि तिला पुनर्जन्म घेता येईल आणि हे जर मंजुर नसेल तर तो तिला अनंत काळासाठी बंधनात ठेवेल आणि तिला प्रचंड शिक्षा भोगावी लागेल. रुबी सत्यजित आणि सुलोचना बाईंकडे कडे रागाने पाहत होती, आपला बदला पुरा व्हायची शक्यता धुसर होत चालली असल्याचे तिच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. असे जखिण बनुन शिक्षा भोगत सडण्यापेक्षा मुक्ती घेऊन पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करून घेणे हा नक्कीच फायद्याचा सौदा होता. तिने सुडाचा विचार कायमचा सोडुन दिल्याचे बाबाला सांगितले आणि आपल्याला मुक्ती देण्याची विनंती केली. त्याबरोबर त्या बाबाने तिची बंधनातून मुक्तता केली आणि पिशाच्च मुक्ती मंत्र म्हणायला सुरवात केली, मंत्र पुर्ण होताच त्या तळघरात एक दिव्य प्रकाश उत्पन्न झाला ज्याने सर्वांचेच डोळे दिपुन गेले. बाबाने तिला त्या प्रकाशात विलीन होण्यास सांगितले आणि पाहता पाहता ती त्या प्रकाशात लुप्त झाली. रुबीचा आत्मा मुक्त होताच सुलोचना बाई आणि सत्यजितने सुटकेचा निश्वास सोडला पण भगवानदासांच्या कुटुंबावरती अजुनही टांगती तलवार लटकतच होती.