सुडचक्रभेद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१५

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha - Page 10

गाडी गेटमधून बाहेर पडताच सरळ दिशेत वेगाने जाणारी एक जीप अचानक त्यांच्या दिशेने वळली, ती जीप कारवर आदळणार म्हणुन प्रतिक्षिप्त क्रियेने सर्वांनी डोळे गच्च बंद केले पण...

इन्स्पेक्टर जाधवांनी त्या बाबाशी संपर्क करून त्याला सर्व परिस्थिती समजावुन सांगितली आणि यातुन सर्वांना सुखरूप बाहेर काढल्यास जे मागशील ते मिळेल असे सांगितले. तेव्हा त्या बाबाने गाडीत किती माणसे आहेत? गाडीचा रंग कोणता आहे? आशा तत्सम गोष्टी जाणुन घेतल्या. नंतर आपल्या मदतनिसाला सांगुन त्याने सर्व तयारी करून ठेवण्यास सांगितले. घुबडाच्या विष्ठेपासून बनवलेल्या पावडरने एक वर्तुळ बनवले नंतर काळ्या उडीदाच्या पिठापासुन गाडीची एक प्रतिकृती बनवून त्या वर्तुळात ठेवली आणि त्यावर सहा माणसांसाठी सहा लवंगा उभ्या खोचल्या नंतर त्याने त्या प्रत्येक लवंगेवर अभिमंत्रित पाण्याचा एक एक थेंब टाकला आणि एका तारेत ओवलेले लिंबु, मिरच्या, बीब्बा आणि एक काळे बाहुले मंतरून त्या गाडीच्या प्रतिकृती च्या पुढे खोचले. तयारी पुर्ण झाल्यावर त्या बाबाने हातात भस्म घेऊन प्राणरक्षाकवच मंत्र म्हणण्यास सुरवात केली. १००८ वेळा मंत्र म्हणुन तो सिद्ध होताच त्याने हातातील भस्म त्या गाडीच्या प्रतिकृतीवर टाकले त्याबरोबर ती गाडीची प्रतिकृती हवेत तरंगु लागली आणि त्या भोवती अग्नीचे एक सुरक्षा चक्र तयार होऊन गोल फिरू लागले. मग त्या बाबाने इन्स्पेक्टर जाधवांना फोन करून सांगितले की त्याची तयारी पुर्ण झाली आहे आता भगवानदासांनी निघावयास हरकत नाही.

बाबाने सांगितल्याप्रमाणे भगवानदासांनी सकाळी बरोबर पाच वाजून दोन मिनिटांनी गाडीसमोर एक नारळ वाढवला नंतर धारीवली चार लिंबे गाडीच्या चारही चाकांच्या पुढे ठेवली आणि सर्वांना गाडीत बसायला सांगितले. बरोबर पाच वाजून सहा मिनिटांनी त्यांनी महादेवला गाडी सुरु करून पुढे घ्यायला सांगितली आणि देवाचे नाव घेऊन त्यांच्या प्रवासाला सुरवात झाली. गाडी गेटमधून बाहेर पडताच सरळ दिशेत वेगाने जाणारी एक जीप अचानक त्यांच्या दिशेने वळली, ती जीप कारवर आदळणार म्हणुन प्रतिक्षिप्त क्रियेने सर्वांनी डोळे गच्च बंद केले पण काय आश्चर्य समान धृवांच्या चुंबकांमध्ये जसे प्रतिकर्षण असते तसे ती जीप कार पासून दूर ढकलली गेली आणि तशीच आपल्या रस्त्याने वेगाने निघुन गेली. सर्वांना खूप आश्चर्य वाटले पण भगवानदास समजुन चुकले होते की बाबाच्या सुरक्षा कवचाने त्याचे काम चोख केले होते. सर्वांनी अपघात टळल्यामुळे देवाचे आभार मानले आणि गाडी मुंबईच्या दिशेने धाऊ लागली. कारला साधा चारही पडला नाही हे पाहून सात्विक प्रचंड चिडला होता. त्याने वेगवेगळ्या तऱ्हेने त्या कारला थांबवायचा प्रयत्न केला पण ना तो कारचे नुकसान करू शकला ना आतील माणसांचा केसही वाकडा करू शकला. त्याच्या लक्षात आले की कोणी तरी त्या कारचे रक्षण करतोय आणि तो खुप शक्तिशाली आहे. सात्विक अदृश्य रुपात त्या कारचा पाठलाग करू लागला. रात्री उशिरा कारने जसा मुंबईच्या हद्दीत प्रवेश केला तसे तिच्या स्वागतासाठी रुबी हजर होतीच. तिला पाहताच सुलोचना बाईंच्या छातीत धस्स झाले पण ती गाडी पर्यंत पोहोचु पण शकत नसल्याने त्या निर्धास्त झाल्या. तिने रस्त्याच्या कडेला असलेले दगड धोंडे गाडीवर भिरकावले पण सुरक्षा चक्राला भेदुन एकही दगड गाडीपर्यंत पोहोचलाही नाही. सर्वांना सुखरूप घेऊन गाडी बाबाच्या घराच्या दिशेने निघुन गेली आणि सात्विकचा आत्मा रुबीच्या आत्म्याला सामोरा गेला त्याला पाहताच रुबीच्या सुडाची आग आणखीनच प्रखर झाली पण सात्विकचा आत्मा आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे हे जाणुन त्याच्याशी लढण्याऐवजी त्याचा बदला त्याच्या कुटुंबाकडून घेणे जास्त सोपे आहे हे तिने ताडले आणि कधी तरी त्या कार मधुन ती माणसे बाहेर पडतीलच त्यावेळी माझ्या तावडीतुन ती सुटणार नाहीत असा विचार करून ती त्या कारचा पाठलाग करू लागली. सात्विकही तिच्या मागोमाग जाऊ लागला.