सुड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑगस्ट २०१५

सुड - मराठी कथा | Sud - Marathi Katha

त्या खविसाचे ते भयानक रूप आठवुन अजुनही गोपाळरावांच्या अंगावर काटा येत होता पण आपल्या डोक्यावरची रूबी नावाची टांगती तलवार आता कायमची नाहीशी होणार हा विचार त्यांना सुखावुन गेला.

लॉजवर परतेपर्यंत कोणी काहीच बोलले नाही. त्या खविसाचे ते भयानक रूप आठवुन अजुनही गोपाळरावांच्या अंगावर काटा येत होता पण आपल्या डोक्यावरची रूबी नावाची टांगती तलवार आता कायमची नाहीशी होणार हा विचार त्यांना सुखावुन गेला. लॉजवर पोहोचायला साडे अकरा वाजले होते. दोघांनाही कडकडून भूक लागली होती त्यामुळे त्यांनी मटण बिर्याणी वर मनसोक्त ताव मारला. सात्विकने मोठ्या संकटातून वाचवल्याबद्दल गोपाळरावांनी कृतज्ञतेने त्याला घट्ट मिठी मारून आभार व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी भेटायचे कबुल करुन सात्विकने गोपाळरावांची आज्ञा घेतली पण जाता जाता रूबीला मरताना पाहायला मिळाले असते तर खऱ्या अर्थाने बदला घेतल्याचे समाधान मिळाले असते असे बोलुन तो निघुन गेला. त्याचे ते वाक्य गोपाळरावांच्या मनात खळबळ उडवून गेले आणि नकळत रूबीला मरताना पहायची इच्छा त्यांच्या मनात जोर धरु लागली.

रात्रीचा एक वाजला होता, गोपाळरावांसारख्या अनेक श्रीमंत शौकिनांना भिकेला लावून रूबी आपल्या आलिशान बंगल्याच्या वातानुकुलित बेडरूम मध्ये गाढ झोपली होती. अचानक तो अक्राळ विक्राळ खविस तिच्या बेडरूम मधे अवतरला. त्याच्या आगमनाबरोबरच हवेचे चलनवलन थांबले. AC सुरु असुनही गरम वाटु लागल्यामुळे रुबीची झोप चाळवली. तिला जाग आली आणि त्या बेडरुममधे ती एकटी नाही हे तिला जाणवले. डोळे किलकिले करत ती अंधारात पाहायचा प्रयत्न करू लागली आणि तिच्या बेडसमोर कोणी तरी उभे असल्याचे तिला जाणवले. घाबरल्यामुळे आपसुकच तिच्या तोंडुन स्त्रिसुलभ किंकाळी निघाली. ती ऐकताच तिच्या बॉडीगार्डने तिच्या बेडरुमच्या दरवाज्यावर नॉक करत दरवाजा उघडला व लाईट लावला. CFL च्या प्रकाशात बेडरुम उजळून निघाली आणि समोर उभ्या असलेल्या भयानक खविसला पाहुन रूबीला तर भोवळच आली. तिच्या बॉडीगार्डने स्वत:जवळील पिस्तुलातून त्या खविसवर गोळी झाडायला आपला हात पिस्तुलाकडे नेण्याआधीच आपल्या राकट पंजाच्या एकाच वारात त्या खविसने त्या बॉडीगार्डची मान धडावेगळी केली. या गडबडीमुळे इतर दोन बॉडीगार्ड पण धावत बेडरूम मध्ये आले. त्या खविसने त्यांच्या शरीराच्या अक्षरशः चिंध्या केल्या. शुद्धित आलेल्या रूबीने किंचाळायला तोंड उघडले पण यावेळी त्यातुन आवाज बाहेर पडायलाही त्या खविसने संधी दिली नाही. त्याच्या हाताची लांब धारधार नखे इतक्या विलक्षण वेगाने फिरली की त्यांनी तिच्या शरीराची खांडोळीच केली. तिचे आ वासलेले मुंडके सोडले तर एकही अवयव शाबूत उरला नव्हता. खिडकीतून हे भयंकर निर्दय हत्याकांड वासलेले दोन डोळे पाहात होते, सूडाच्या समाधानाऐवजी त्यात मूर्तिमंत भिती आणि दुःख दिसत होते. घरातील सर्वांची हत्या करुन तो खविस गायब होणार इतक्यात त्याला काही तरी जाणवले आणि त्याने खिड़कीच्या रोखाने पाहीले, तिथे कोणीच नव्हते. इतक्यात कार सुरु झाल्याचा आवाज आला आणि अत्यंत वेगात एक कार रुबीच्या बंगल्यासमोरून निघुन गेली. खविस त्या घरातून गायब झाला आणि तो बंगला क्षणात आगीच्या ज्वालांमध्ये घेरला गेला आणि घरातील सिलेंडरच्या स्फोटाने सारा परिसर हादरला. बंगल्याच्या नावावर तिथे फक्त दगड विटांच्या ढिगाने भरलेला एक मोठा खड्डा उरला होता.

गोपाळराव रात्री दोन वाजता लॉजमधील आपल्या रूममध्ये धापा टाकत शिरले. घामाने चिंब भिजलेले त्यांचे शरीर लटलटा कापत होते. पाण्याचा अख्खा जग घशात रिकामा करुन त्यांनी आपले शरीर बेडवर झोकून दिले. त्यांच्या डोळ्यासमोरुन अजुनही लाडक्या रुबीचे छिन्नविछिन्न शरीर जात नव्हते. कशीही असली तरी रुबीवर त्यांनी प्रेम केले होते. डोळ्यांसमक्ष झालेला तिचा तो भयानक मृत्यु त्यांचे काळीज पिळवटुन गेला. तिच्या मृत्यूबद्दल ते स्वतःला दोषी मानु लागले. नकळत त्यांचे डोळे भरले, शर्टाच्या बाहीने डोळे पुसताना अचानक वातावरणातील त्यांना परिचित असा जडपणा जाणवू लागला, त्या रुममधील हवा जणू कोणी काढुन घेतली होती. त्यांनी ओळखले की खविसचे आगमन झाले आहे. खविसला पुरावा नष्ट करण्याची बाबाची आज्ञा पाळणे बंधनकारक होते. गोपाळरावांनी आपले डोळे घट्ट मिटले होते. आपल्या गळ्यांवर एक जबरदस्त पकड त्यांना जाणवली आणि श्वासासाठी ते तडफडु लागले. हृदयविकाराचा एक तीव्र झटका बसुन त्यांचा खेळ संपला होता.

गोपाळरावांना गडबडीत लॉज मध्ये शिरताना जवळील बार मध्ये बसलेल्या सात्विकने पाहीले होते, बरोबर रात्री तीन वाजता तो लॉजवर परत आला तेव्हा डोळे फिरलेल्या अवस्थेतील गोपाळरावांचा मृतदेह पोलीस पोस्टमॉर्टेमसाठी घेऊन जात होते. आपली योजना सफल झाल्याचे पाहुन तो मनोमन सुखावला. एका दगडात त्याने चार पक्षी मारले होते. पहिले म्हणजे रूबीला हाताशी धरून गोपाळरावांचा सर्व पैसा काबीज केला. नंतर गोपाळरावांकरवी रूबीला रस्त्यातून बाज़ुला केले. धुर्तपणे रूबीला मरताना पाहण्याची इच्छा गोपाळरावांच्या मनात सोडुन खविस कडुन त्यांचा परस्पर काटा काढुन घेतला. आणि पुत्रशोक करवुन भगवानदासांकडून आपल्या पित्याच्या मृत्युचा बदला घेतला. दहावीच्या रिझल्टच्या दिवशी इन्स्पेक्टरने सोडुन दिले असतानाही दुसऱ्या दिवशी गोपाळरावांच्या नकळत भगवानदासांनी इन्स्पेक्टरला पैसे चारुन सात्विकला बालसुधार गृहात धाडायची व्यवस्था केली. (जेणे करुन परत गोपाळराव आणि सात्विकची कधीच भेट होणार नाही.) त्या धक्क्याने सात्विकचे वडील वारले. बालसुधार गृहातच त्याने बदला घ्यायचा निश्चय केला होता आणि आज त्याने आपल्या पित्याच्या मृत्युचा सुड उगवला होता.

गोपाळरावांवर तो बरेच दिवस पाळत ठेऊन होता, मुंबईतील बार मधे त्यांना तो योगायोगाने भेटला नव्हता. गोपाळरावांना रूबीच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवुन ब्लॅकमेल करण्यापासून ते रूबीचा बाबाकरवी काटा काढुन गोपाळरावांना संपवण्यापर्यंत सर्व प्लॅन मागचा मास्टर माईंड तोच होता.

आपला सुड यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करायला त्याची कार डान्सबारच्या दिशेने मार्गक्रमण करु लागली...

संबंधित उपयुक्त लेखन/दुवे