सुड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑगस्ट २०१५

सुड - मराठी कथा | Sud - Marathi Katha

गोपाळरावांनी रुबीची सुपारी द्यायची योजना त्याला सांगितली. क्षणभर विचार करुन त्याने त्या योजनेतील त्रुटी त्यांना सांगितल्या.

सात्विकची दिवसभर मोठ्या अधिरतेने ते वाट पाहात होते, शेवटी संध्याकाळी पाच वाजता तो लॉजवर आला. गोपाळरावांनी रुबीची सुपारी द्यायची योजना त्याला सांगितली. क्षणभर विचार करुन त्याने त्या योजनेतील त्रुटी त्यांना सांगितल्या. एक म्हणजे रुबीचे बॉडीगार्ड सतत तिच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. दोन म्हणजे जर का सुपारी घेणारा पकडला गेला तर रूबी कडुन जिवाला आणि इज्जतीलाही धोका होऊ शकतो आणि तिसरे म्हणजे पोलिसांपर्यंत ही गोष्ट गेली तर अटक व्हायची भिती पण आहे. “मग काय तिला असेच सोडुन द्यायचे आणि आयुष्यभर तिची भर करत राहायचे”? गोपाळराव कडाडले. “नाही! एक उपाय आहे ज्याने साप पण मरेल आणि काठी पण नाही तुटणार”, सात्विक म्हणाला. त्याने आपली योजना सांगताच गोपाळरावांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित पसरले.

जवळपास दोन तास त्यांची कार धावत होती. एक तीव्र वळण घेऊन एका झोपडीवजा घराजवळ ती थांबली तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. दाराची कडी वाजवताच एका चाळीशीच्या आसपास वय असलेल्या एका उघड्याबंब माणसाने दरवाजा उघडला. सात्विकने त्याला कानात काहीतरी सांगताच मान हलवून त्यांना बाहेरील बाकावर बसायला सांगुन तो आत गेला. पाचच मिनिटांत तो परत आला आणि त्यांना घेऊन आत गेला. घर एकदम साधे सुधेच होते. शेणाने सारवलेल्या जमिनीवर एका कोपऱ्यात एक चटई टाकलेली होती समोरच एक जुनी खाट होती त्यावर एक अत्यंत वृद्ध पुरुष झोपला होता. असे वाटत होते की तो शेवटच्या घटका मोजतोय. नुसती घरघर ऐकू येत होती. एका कोपऱ्यात एका माठात पाणी भरून ठेवले होते आणि भिंतीवर एक बल्ब लटकत होता ज्यातून रोगट पिवळसर प्रकाश बाहेर पड़त होता. एकंदर वातावरण कुबट, उदास आणि नकारात्मक उर्जेने भरले होते. हे सर्व पाहुन गोपाळराव संभ्रमात पडले होते. इतक्यात त्या माणसाने दरवाज्याची कडी लावली आणि बल्ब बंद केला. खोलीत अंधाराचे साम्राज्य पसरले. डोळ्यांवर ताण देऊनही काही दिसत नव्हते.

त्या माणसाने ती चटई बाजुला केली आणि एक कळ फिरवली. त्याबरोबर जमिनीतील एका गुप्त तळघराचा दरवाजा उघडला आणि खालुन वर येणाऱ्या प्रकाशात पायऱ्या दिसु लागल्या. ते पाहुन गोपाळराव आणि सात्विक दोघेही स्तिमित झाले. त्या माणसाने त्यांना आपल्या पाठोपाठ येण्यास सांगितले आणि पायऱ्या उतरत त्यांनी त्या तळघरात प्रवेश केला. तळघरातील वातावरण एकदम थंड होते. नकळत गोपाळरावांच्या मनात भिती निर्माण झाली पण सात्विकसोबत असल्यामुळे त्यांना खुप आधार वाटत होता. खाली गेल्यावर एक प्रशस्त आणि स्वच्छ खोली होती. हवेच्या आवागमनासाठी केलेल्या योजनेमुळे श्वास घ्यायला मुळीच त्रास होत नव्हता. एका तेजस्वी पुरुषाने त्यांचे स्वागत केले. त्याच्या डोळ्यातील तेज, त्याचे सामर्थ्य उजागर करत होते. त्याने कपाळावर, दंडावर, मनगटांवर आणि छातीवर भस्म लावलेले होते आणि अंगावर फक्त एक धोतर नेसले होते. निघताना सात्विकने फोन केल्यामुळे त्याने सर्व तयारी आधीच करुन ठेवली होती. एका अग्निकुंडाभोवती हळद, कुंकु, समिधा, काळे उडिद, दारु, काळ्या दूर्वा, भस्म अशा नानाविध साहित्य भरलेले द्रोण व्यवस्थित रचुन ठेवले होते. एका कोपऱ्यात एक ताट झाकून ठेवले होते त्यातून ठिबकणाऱ्या रक्ताने जमिनीवर थारोळे साचले होते. ते पाहुन गोपाळरावांच्या मनात कालवा-कालव झाली पण ते गप्पच राहीले.

त्या बाबाने हात पुढे करताच सात्विकने गोपाळरावांना दोन लाख रुपये भरलेले पाकिट बाबाच्या हातात देण्यास सांगितले पण त्या बाबाने ते हातात न घेता अग्निकुंडाजवळ ठेवण्यास सांगितले. नंतर ते उचलुन आपल्या मदतनिसाकडे देण्यास सांगितले. आता वेळ न दवडता त्याने अग्निकुंड प्रज्वलित केला. स्वतःच्या गळ्यात अस्थिमाला घातली, गावठी कडक दारुचा एक पेला आपल्या घशात रिता केला आणि प्राणरक्षा मंत्र म्हणत त्या अग्निकुंडात तिथे रचलेल्या वस्तुंची आहुती देऊ लागला. मंत्र पुर्ण होताच त्याने भोग लावण्यासाठी आणलेल्या कोंबडयाची मान एका झटक्यात उडवली आणि त्यातुन गळणारे रक्त एका द्रोणात जमा केले आणि त्याच्या मदतनिसाने पाचच मिनिटात सराईतासारखे त्या कोंबडयाला साफ करुन त्याचे मांस, त्याच्या रक्ताने भरलेला तो द्रोण आणि दारुने काठोकाठ भरलेला एक द्रोण असे सर्व एका ताटात भरून त्या बाबासमोर आणून ठेवले. तसेच कोपऱ्यात ठेवलेले बोकडाचे चार किलो मांस पण समोर आणून ठेवले. त्या कोंबडयाच्याच पिसांचे एक रिंगण त्या दोन्ही ताटांभोवती केले. त्यानंतर त्या बाबाने आवाहनाला सुरवात केली आणि थोड्याच वेळात त्या तळघरातील वातावरण एकदम बदलून गेले. ते एकदम जड वाटू लागले, हवेचा संचार थांबला आणि एक भयानक खविस तिथे प्रकट झाला. त्याबरोबर बाबाने प्रथम त्या खविसासाला रक्त, कोंबड़ा, बोकडाचे मांस आणि दारुचा भोग लावला. ते सर्व फस्त करुन तृप्त झालेल्या खविसाने बाबाला ‘काय काम आहे?’ असे विचारले तेव्हा त्याने कोणत्याही परिस्थितीत आज रात्री रूबीला ठार मारुन मार्गात जो आडवा येईल त्यालाही संपवुन सर्व पुरावे नष्ट करण्यास सांगितले. ‘जो हुक्म’ म्हणुन तो खविस डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तिथुन गायब झाला. ‘तुमचे कार्य आज रात्रीच पुर्ण होईल’, असे सांगुन बाबाने त्यांना निघण्यास सांगितले तसेच झाल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तुमचा मृत्यु निश्चित आहे हे ही सांगितले.