सुड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑगस्ट २०१५

सुड - मराठी कथा | Sud - Marathi Katha

एकाच घरात राहुनही पितपुत्राला एकमेकांचे दर्शन ही दुर्लभ झाले. या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. वडीलांचा अंकुश हटल्यामुळे गोपाळरावांचे वागणे पुर्णपणे बेताल आणि एखाद्या जंगली मदमस्त हत्तीसारखे बेमुर्वत झाले.

भगवानदासदासांनी पैशाबद्दल विचारताच प्रवासात हरवल्याचे सांगुन त्यांनी वेळ मारून नेली. पण भगवानदासदासांना संशय येऊ लागला होता. पुढे पुढे गोपाळरावांच्या मुंबई वाऱ्या खुपच वाढल्या. भगवानदासांनी एक दिवस चांगलेच फैलावर घेतल्यावर पहिल्यांदाच गोपाळरावांनी त्यांना दुरुत्तरे केली. इतक्या वर्षांपासून मनात साचलेले सर्व काही त्यांनी आज वडीलांसमोर ओकुन टाकले. आपले स्वातंत्र्य हिरावून घेऊन आपल्यावर जबरदस्तीने स्वतःची मते लादल्याबद्दल त्यांनी वडीलांना खुप दोष दिला. मुलाचे ते आरोप ऐकुन भगवानदास मनातुन खचले. त्यांना गोपाळरावांचा प्रत्येक शब्द बाणासारखे टोचत होता. साश्रु नयनांनी त्यांनी गोपाळरावांना ‘तुला जसे वाटेल तसे तु जग, यापुढे तु आणि तुझे नशीब’ असे म्हणुन दोन दुकाने त्यांना सांभाळायला दिली आणि दोन स्वतःला ठेवली. एकाच घरात राहुनही पितपुत्राला एकमेकांचे दर्शन ही दुर्लभ झाले. या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. वडीलांचा अंकुश हटल्यामुळे गोपाळरावांचे वागणे पुर्णपणे बेताल आणि एखाद्या जंगली मदमस्त हत्तीसारखे बेमुर्वत झाले. आता ते मुंबईत रुबीकडेच पंधरा पंधरा दिवस मुकाम ठोकु लागले.

असेच एकदा ते मुंबईतुन गावी परतले आणि दुकानात बसले असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर रूबीने पाठवलेल्या एका क्लिपचा MMS मिळाला ज्यात त्यांनी रुबीसोबत घालवलेले बेधुंद क्षण चित्रित केले होते. क्लिप पाहाताच गोपाळरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. क्लीप पाहुन होते न होते तोच रूबीचा फोन आला. तिने गोपाळरावांना ‘आपली अब्रु वेशीवर टांगली जाऊ नये असे वाटत असेल तर दर महिन्याला नियमित पणे दहा लाख रूपये ढीले करत जा’ असे धमकावले. गोपाळरावांना चढलेली इश्काची धुंदी खाडकन उतरली. त्यांच्या तळ पायाची आग मस्तकात गेली पण गावात इज्जतीचा पंचनामा होण्यापेक्षा रुबीच्या मागण्या गुपचुप पुर्ण करणेच आपल्या हिताचे आहे असे वाटुन ते गप्प बसले. त्यांचे मन या नसत्या फंदात अडकवल्याबद्दल सात्विकला दोष देत होते पण त्याची तरी काय चुक? रुबीच्या हातात त्यांनी स्वत:हुन आपली मान दिली होती आणि आता ती तिला हवी तशी पिरगळत होती. आपल्या पत्नीशी प्रतारणा केल्याचा आणि वडीलांचा अपमान केल्याचा त्यांना प्रचंड पश्चात्ताप झाला पण कोणत्या तोंडाने माफी मागणार होते. पुढे पुढे रुबीच्या मागण्या वाढु लागल्या आणि त्या पुरवताना त्यांच्या तोंडाला फेस येऊ लागला. लाखांची खाक व्हायला वेळ नाही लागला. ते कर्जबाजारी झाले, तब्येत खालावली. त्यांची ती अवस्था भगवानदासांचे काळीज चिरत होती पण ते कारणापासून पुर्णपणे अनभिज्ञ होते.

शेवटी एक दिवस रूबीने पन्नास लाखांची मागणी करताच गोपाळरावांचा संयम संपला, त्यांनी सात्विकशी भेटुन या समस्येवर कायमचा तोडगा काढायचे ठरवुन मुंबई गाठली. सात्विकला सोबत घेऊन त्यांनी रुबीशी तडजोड करायचा प्रयत्न केला पण तिने ते साफ धुडकावून लावले आणि आपल्या गुंडाना सांगुन त्या दोघांना धक्के मारून बाहेरचा रस्ता तर दाखवलाच वर नियमित पैसे न दिल्यास घरी आणि दुकानासमोर येऊन तमाशा करायची धमकी द्यायला ती विसरली नाही. अपमानाने धुमसत गोपाळराव सात्विक सोबत बाहेर पडले. बाहेर पडताना सात्विक आणि रुबीची झालेली नेत्रपल्लवी गोपाळरावांच्या लक्षातही आली नाही. ते आपल्या अपमानाच्या आगीत जळत होते. जिच्यावर आपण इतका जीव लावला, ती म्हणेल तितका पैसा दिला त्या रूबीने आपल्याशी असे वागावे हे त्यांना सहन झाले नाही.

रूबीला शिव्या घालत आणि चरफडत ते सात्विक सोबत एका बारमधे आले. दोन निप पिऊन सुद्धा आज त्यांना जरादेखील नशा आली नव्हती. सात्विकने सध्या रूबीला थोडे पैसे देऊन गप्प करू मग शांतपणे विचार करू काय करायचे ते असे सुचवताच, गोपाळरावांना ते पटले आणि त्यांनी सोबत आणलेले दहा लाख रूपये सात्विककडे रूबीला देण्यासाठी सुपुर्द केले. दहा लाख पाहताच सात्विकच्या डोळ्यात क्षणभरासाठी पुन्हा एकदा तीच चमक तरळुन गेली. गोपाळरावांना लॉजवर सोडुन, उद्या संध्याकाळी भेटु असे सांगुन सात्विक दहा लाख रुपयांनी भरलेली ब्रिफकेस घेऊन प्रसन्न मुद्रेने बाहेर पडला. गोपाळरावांना रात्रभर झोप लागली नाही, विचार करुन त्यांचे डोके फुटायची पाळी आली होती. पहाटे पहाटे त्यांना थोडी झोप लागली. दुपारी बारा-साडे बाराला त्यांना जाग आली आणि रूबीला आपल्या रस्त्यातून अलगद दूर करायची एक योजना त्यांच्या मनात आकार घेऊ लागली.