सुड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑगस्ट २०१५

सुड - मराठी कथा | Sud - Marathi Katha

आजपर्यंत डान्सबारबद्दल केवळ ऐकले होते पण आज प्रत्यक्ष डोळ्यांनी हे सगळे पाहिल्यावर गोपाळराव एकदम बुजुन गेले.

टिचकीच्या आवाजाने भानावर येत गोपाळरावांनी आवाजाच्या दिशेने पाहिले तर सात्विक त्यांच्याकडे पाहात स्माईल करत उभा होता. दोघांनी एकमेकांना कडकडुन मिठी मारली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत दोन दोन पेग झाल्यावर जेवण करुन दोघे बार मधुन बाहेर पडले तोपर्यंत रात्रीचा एक वाजुन गेला होता. सात्विकचा निरोप घेण्यासाठी गोपाळरावांनी चल भेटुया परत, म्हणत शेकहॅंडसाठी हात पुढे केला तर सात्विक त्यांना म्हणाला, “अरे यार! इतक्या वर्षांनी भेटला आहेस आणि लगेच काय जायच्या गोष्टी करतोस”? उशीर झाला असुन सकाळी लवकर उठुन गावी परतायचे असल्याचे गोपाळरावांनी त्याला सांगितले. “जाशील रे! चल माझ्यासोबत”, असे म्हणत सात्विकने जबरदस्तीने गोपाळरावांना कार मध्ये बसवले. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने जॉब वर जायचे तसेही त्याला टेंशन नव्हतेच. साधारण पंधरा मिनिटातच गाडी एका डान्सबार समोर थांबली. बाहेरून काहीच वाटत नव्हते पण बेहऱ्याने दरवाजा उघडताच आत मोठ्या आवाजातील फिल्मी गाण्यांच्या तालावर थिरकणाऱ्या आठ दहा मुली, त्यांच्यावर नोटा उडवणारे लोक व कस्टमर्सशी लगट करत त्यांच्या ऑर्डर्स सर्व्ह करणाऱ्या वेट्रेस पाहुन गोपाळराव दरवाज्यातच थबकले. आजपर्यंत डान्सबारबद्दल केवळ ऐकले होते पण आज प्रत्यक्ष डोळ्यांनी हे सगळे पाहिल्यावर गोपाळराव एकदम बुजुन गेले. त्यांची ती अवस्था लक्षात येताच सात्विकने त्यांना जवळ जवळ ढकलतच आत नेले. कोपऱ्यातील एका टेबलवर ते बसताच लगेचच एक वेट्रेस ऑर्डर घेण्यासाठी आली. सात्विकने तिला छेडत गोपाळरावांना काय घेणार म्हणुन विचारले. गोपाळराव इतके बुजले होते की मान खाली घालुनच बसले होते. त्यांच्याकडुन उत्तर येत नाही असे लक्षात येताच सात्विकने दोन बियर आणि मसाला पापडची ऑर्डर देऊन गोपाळरावांना रिलॅक्स होऊन एन्जॉय करण्यास सांगितले. पोटात बियर गेल्यावर गोपाळरावांना थोडी तरतरी आली आणि जवळपास अर्ध्या तासानी त्यांची भीड चेपली. पुढे दोन तास त्या दोघांनी फुल टु धमाल केली. पोरीँवर नोटा उडवल्या, त्यांच्या सोबत नाचले, अजुन दोन दोन बियर प्यायले. बाहेर पडले तेव्हा साडेचार वाजले होते.

मोठ्या मुश्किलीने कशी बशी गाडी चालवत ते गोपाळराव उतरलेल्या लॉजपाशी आले. दारु खुपच जास्त झाली असल्यामुळे सात्विक पण लॉजवरच झोपला. दोघांना जेव्हा जाग आली तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. मोबाईल वर बायकोचे आणि भगवानदासांचे जवळपास वीस एक मिस कॉल्स पाहुन गोपाळरावांच्या तोंडचे पाणीच पळाले. त्यांची ती धावपळ पाहुन सात्विक ने त्यांना शांत होण्यास सांगितले. “अजुन किती दिवस वडीलांना घाबरत आणि असे मन मारत जगणार आहेस? काल तु किती खुश होतास आणि आत्ता तुझी अवस्था बघ! अरे आपले आयुष्य आपल्या मर्जीने जग”! सात्विकची ती वाक्य गरम शिश्यासारखी गोपाळरावांच्या कानात शिरत होती. त्यांच्या मेंदुला झिणझिण्या आल्या. सात्विक बरोबरच तर बोलत आहे, अजुन किती दिवस? हा प्रश्न त्यांच्या मेंदुत प्रतिध्वनित होत राहीला. काल सात्विकमुळे पहिल्यांदा त्यांनी इतके एन्जॉय केले होते. दहावीच्या रिझल्टच्या दिवसापासून आजतागायत केवळ काम आणि कामच करत होते. बस! ठरले तर आता, आपण पण सात्विकप्रमाणे आयुष्य एन्जॉय करायचे असे मनाशी ठरवून त्यांनी परत यायला अजुन दोन चार दिवस लागतील असे घरी कळवुन टाकले. इतकी वर्ष गोपाळराव कधीच आपल्या आज्ञा बाहेर न गेल्याने व धंदा व्यवस्थित सांभाळत असल्याने, असेल काही काम असा विचार करुन भगवानदासांनी पण जास्त चौकशी केली नाही.

गोपाळरावांमधे आलेला बदल लक्षात येताच सात्विकचे डोळे एका वेगळ्याच तेजाने चमकले. मनातल्या मनात त्याने स्वतःची पाठ थोपटली. रात्रीच्या हँगओव्हर वर उतारा म्हणुन एक एक बियर पिऊन दोघे जेवायला गेले. रात्री पुन्हा एकदा दुसऱ्या एका डान्सबारमध्ये सात्विक गोपाळरावांना घेऊन गेला. तिथे रूबी नावाच्या एका अप्रतिम सौंदर्य लाभलेल्या बारबालेला गोपाळराव आपले हृदय देऊन बसले. त्या रात्री जवळ जवळ लाखभर रुपये तिच्यावर ऊधळुन गोपाळराव पहाटे पहाटे लॉजवर परतले. पुढचे दोन दिवस हेच चालु होते. तिसऱ्या दिवशी नाईलाजाने ते घरी परतले पण रूबीचा मोबाइल नंबर घेऊनच. गोपाळरावांचे धंद्यातील लक्ष उडाले. ‘जळी स्थळी काष्ठी पाषाणी’ त्यांना रूबीच दिसत होती. तिच्या समवेत घालवलेल्या सुखद क्षणांच्या आठवणी त्यांना स्वस्थ बसु देत नव्हत्या. थोड्या थोड्या वेळाने ते रूबीला कॉल करत असत, सुरवातीला ती कॉल घेत असे पण दोनच दिवसानंतर ती त्यांचा फोन टाळु लागली त्यामुळे ते आणखीनच व्याकुळ होऊ लागले. त्यांच्यातील हा बदल भगवानदास आणि गोपाळरावांच्या पत्नीच्या लक्षात यायला वेळ नाही लागला पण धंद्याचे टेंशन सांगुन त्यांनी वेळ मारून नेली. कसाबसा शुक्रवार गेला आणि धंद्याच्या नावाखाली गोपाळरावांनी मुंबई गाठली. सात्विकला सोबत घेऊन पुन्हा एकदा रूबीला भेटले. कस्टमर्स मुळे फोनवर जास्त बोलता येत नसल्याचे सांगुन रूबी त्यांना समजावत आत घेऊन गेली आणि आपल्या अदांनी त्यांचा रुसवा काढुन टाकला. दोन दिवसांनी गोपाळराव घरी परतले ते रुबीवर तीन लाख रुपये उडवूनच.