सुड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑगस्ट २०१५

सुड - मराठी कथा | Sud - Marathi Katha

असंगाशी संग, प्राणाशी गाठ! ही म्हण, आपण ऐकली असेल; पुस्तकातही वाचली असेल पण प्रत्यक्ष अनुभवायची असेल तर वाचा सात्विक आणि गोपाळरावांची ही कथा.

मुळचे हुशार असलेल्या गोपाळरावांनी वडीलांच्या तालमीत व्यापारातील सर्व खाचाखोचा समजुन घेतल्या होत्या.

गोपाळराव गावातील एका सुखवस्तु कुटुंबात जन्मलेले एक प्रतिष्ठित व्यापारी. लहानपणापासून मागतील ते मिळाल्यामुळे थोडेसे हेकेखोर स्वभावाचे. व्यापाराचे बाळकडु लहानपणापासूनच मिळाले असल्यामुळे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणे अगदी उत्तम रितीने त्यांच्या अंगवळणी पडले होते. गोड बोलून माल ग्राहकाच्या गळ्यात मारणे म्हणजे त्यांच्यासाठी ‘बाए हाथ का खेल’ झाले होते. जेमतेम दहावी पास झाले असतील आणि त्यांच्या वडीलांनी म्हणजेच भगवानदासांनी त्यांना आपल्या पिढीजात कापडधंद्यात ओढले. मुळचे हुशार असलेल्या गोपाळरावांनी वडीलांच्या तालमीत व्यापारातील सर्व खाचाखोचा समजुन घेतल्या होत्या. कुठे स्वस्त आणि चांगल्या प्रतीचे कापड मिळते, कापडाचा पोत कसा ओळखावा, ग्राहकाला गरज नसलेली वस्तुपण त्याला बोलण्यात गुंगवून त्याच्या गळ्यात कशी मारावी, बाजारातील मंदीतही धंदा कसा टिकवावा असे एक ना अनेक फंडे भगवानदासांनी त्यांना शिकवले. स्वकर्तुत्वावर गोपाळरावांनी धंदा वाढवला. दोनाची चार दुकाने झाली. सुरत, पैठण, इचलकरंजी, मालेगाव, मुंबई अशा अनेक शहरात ते एकटेच जाऊन डील यशस्वी करून यायचे. भगवानदासांना आता खात्री पटली की गोपाळराव धंदा सांभाळण्याइतके तरबेज झाले आहेत. गोपाळरावांनी वयाची एकविशी ओलांडताच भगवानदासांनी त्यांचे दोनाचे चार हात करुन टाकले. वर्षभरात गोपाळरावांना पुत्ररत्न पण प्राप्त झाले.

असेच एका संध्याकाळी मुंबईतील कापड खरेदीचा व्यवहार आटपून गोपाळराव एका बारमधे महागड्या स्कॉचचे पेग रिचवत रिलॅक्स बसले होते. इतक्यात त्यांची नजर भिंतीजवळील एका टेबलकड़े गेली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. दहावीतील त्यांचा वर्गमित्र सात्विक दारु पित बसलेला दिसला. इतक्या वर्षांनी जुन्या मित्राला पाहुन गोपाळरावांचे मन अलगद भुतकाळात गेले. नाव जरी सात्विक असले तरी स्वभावाने अगदी विरुद्ध असलेला कुलकर्ण्यांचा हा कार्टा पुरता अवली होता. याच्या अंगी नाना कळा होत्या. कधी शांत म्हणुन बसणे नाही, सतत मुलींच्या खोड्या काढणे, मास्तरांच्या नकला करणे, तास बुडवून पोहायला जाणे, मुलांच्या आपापसात मारामाऱ्या लावून गंमत बघत बसणे, परीक्षेत कॉप्या करणे, इतरांचे डबे गपचुप चोरून खाणे हे असले याचे आवडीचे उद्योग. म्हणतात ना, “समान शीले व्यसने सु सख्यम”. गोपाळरावांना तो एखाद्या हीरोप्रमाणे आदर्श वाटायचा कारण जे त्यांच्या मनात असायचे सात्विक ते कृतीत उतरवायचा. वडीलांच्या धाकामुळे गोपाळराव थोडे कंट्रोलमधे असायचे पण सात्विक बरोबर असताना त्यांच्यातील खरा गोपाळ बाहेर पडायचा. हळुहळु दोघांची चांगलीच गट्टी जमली आणि दोघे मिळून मास्तरांच्या नाकी नऊ आणु लागले. कधी एकदा दाहावीची परीक्षा होते आणि दोघे शाळेतून आपले तोंड काळे करतात असे सर्वांना झाले होते. आपल्या मुलाचे प्रताप भगवानदासांच्या वेळोवेळी कानावर येत असत पण लहान आहे अजुन असे म्हणुन ते कानाडोळा करत असत. आणि शेवटी तो दिवस आला. दहावीच्या परीक्षेत दोघे काठावर पास झाले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे दिवटे शाळेतून कायमचे जाणार या आनंदात स्वखर्चाने संपुर्ण शाळेला पेढे वाटले.

रिझल्टच्याच दिवशी सार्वजनिक महिला शौचालयाच्या भिंतीवर चढुन आत वाकुन पाहाताना काही लोकांनी या दोघांना रंगे हाथ पकडले आणि लाथा बुक्क्यांचा यथेच्छ प्रसाद देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हे कमी होते की काय म्हणुन भगवानदासांच्या कानावर ही बातमी जाताच त्यांनी पोलिस स्टेशनमधे जाऊन दोघांना बेदम चोपले, इतके की शेवटी इन्स्पेक्टर आणि चार हवालदारांना मधे पडावे लागले. भगवानदास एक प्रतिष्ठित व्यापारी होते. समाजात त्यांना खुप मान होता, त्यामुळे आपल्या मुलाच्या या कृत्याचा त्यांना मोठा धक्का बसला होता, शरमेने त्यांची मान खाली गेली होती. इन्स्पेक्टरने त्यांची समाजातील पत पाहुन त्या दोघांना केवळ वॉर्निंग देऊन सोडुन दिले. त्या दिवसानंतर गोपाळरावांना आज सात्विक दिसत होता.